माणकोली उड्डाणपुलासाठी मोठागावमधून ४५ मीटर रूंदीचा पोहच रस्ता तयार करण्यासाठी तेथील जागेची सर्व पक्षीय महापालिका पदाधिकाऱ्यांकडून पाहणी करण्यात येणार आहे. मात्र ही पाहणी अद्याप होत नसून, ती करण्यास अधिकारी उदासीन असल्याचे दिसून येत आहे. या पाहणीसाठी सर्वपक्षीय महापालिका पदाधिकाऱ्यांची वेळ निश्चित करावी, असे आर्जव करणारे पत्र  नगररचना विभागाने सचिव कार्यालयाला पाठवले आहे.
दोन महिन्यापूर्वीच्या सर्वसाधारण सभेत मोठागाव मधील पोहच रस्त्याचा प्रस्ताव जागेची पाहणी करायची आहे, म्हणून सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांनी स्थगित ठेवला आहे. पोहच रस्ता तयार होत नाही, तोपर्यंत मुंबई महानगर विकास प्राधिकरणाला ठाणे-डोंबिवली हे अंतर कमी करण्यासाठी माणकोली उड्डाणपूल तयार करणे शक्य होत नाही. तातडीने या जागेची पाहणी करून पोहच रस्त्याचा विषय मार्गी लावण्याची मागणी पुढे येत आहे. दीड वर्षांपासून मुंबई महानगर विकास प्राधिकरण मोठागाव रेतीबंदर भागातील महापालिकेची आरक्षित तसेच काही खासगी जमिनी भूसंपादन करण्याची मागणी महापालिका प्रशासनाकडे करीत आहे. या जागेतून ३३० मीटरचा ४५ मीटर रूंदीचा रस्ता तयार करण्यात येणार आहे. रेतीबंदर खाडीवर होणाऱ्या माणकोली पुलाला पोहच रस्ता जोडण्यात येणार आहे. माणकोली उड्डाण पुलाची निवीदा प्रक्रिया प्राधीकरणाने सुरू केली आहे. त्यामुळे पोहच रस्ते पहिल्या टप्प्यात पूर्ण करण्यासाठी महानगर विकास प्राधिकरण प्रयत्नशील आहे. महापालिका रस्त्यासाठी जमीन ताब्यात देत नसल्याने प्राधिकरणाची अडचण झाली आहे. दोन महिन्यापूर्वी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत माणकोली पुलाच्या पोहच रस्त्यासाठी जमीन संपादनाचा विषय प्रशासनाने मंजुरीसाठी आणला होता. त्यावेळी सत्ताधारी शिवसेनेने तेथील जागेची आम्हाला पाहणी करायची आहे असे सांगून हा महत्वाचा विषय स्थगित ठेवला आहे. दोन महिने उलटले तरी पदाधिकारी कोणतीच हालचाल करीत नसल्याने हे काम मार्गी लावण्यात एवढी दिरंगाई का, असा सवाल उपस्थित होत आहे.