संयुक्त आघाडीच्या सोहळ्याकडे कार्यकर्त्यांची पाठ

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कलंकित नेते पप्पू कलानी यांचे पुत्र ओमी आणि भाजपच्या मनोमीलनासाठी येथील गोल मैदान येथे आयोजित करण्यात आलेला जंगी सोहळा समर्थकांच्या तुरळक उपस्थितीमुळे अक्षरश: फसल्याचे चित्र शनिवारी दिसून आले. पक्षप्रवेशाऐवजी भाजपसोबत नवी आघाडी स्थापन करत शहराच्या राजकारणात आपले अस्तित्व कायम राखण्याची कलानी कुटुंबीयांची धडपड या सोहळ्यानिमित्त स्पष्टपणे दिसून आली खरी, मात्र समर्थकांचा पुरेसा प्रतिसाद मिळाला नसल्याने शक्तिप्रदर्शनाचा बार फुसका ठरल्याचे पाहायला मिळाले.

उल्हासनगरातील राजकारणात गेल्या दोन दशकांपासून कलानी आणि आयलानी कुटुंबातील कडवा संघर्ष सर्वश्रुत आहे. मात्र सिंधी मतांची जुळवाजुळव करत शिवसेनेला धक्का देण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून भाजपमधील धुरीणांकडून ओमी कलानी आणि कुमार आयलानी यांचे मनोमीलन घडवून आणण्याचा प्रयत्न गेल्या आठ महिन्यांपासून सुरू होता. भाजपचे राज्यमंत्री रवींद्र चव्हाणांनी त्यासाठी घेतलेला पुढाकार येथील राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. ओमी यांना थेट पक्षात प्रवेश दिला असता तर भाजपवर कलंकित नेत्यांना आश्रय देत असल्याचा आरोप विरोधकांकडून होण्याची भीती व्यक्त करण्यात आली.

भाजपचा सहभाग नावापुरता

आघाडीच्या कार्यक्रमात टीम ओमीचे वर्चस्व राहावे अशी व्यूहरचना करण्यात आली होती. ओमी यांना ताकद लक्षात यावी यासाठी भाजपने आघाडीच्या या सोहळ्यापासून आपल्या समर्थकांना काहीसे दूर ठेवल्याचे चित्र होते. या वेळी टीम ओमीचे उल्लेख असलेले टी-शर्ट वाटण्यात आले होते. तसेच प्रत्येक ओमी समर्थकाला आपले कार्यकर्ते घेऊ न गोल मैदानात येण्याचे आदेश देण्यात आले होते. सुरुवातीला काही प्रमाणात गर्दी दिसली, मात्र मुख्य कार्यक्रम सुरू होण्यावेळी निम्म्याहून अधिक मैदान रिकामे झाले. रिकाम्या खुच्र्यासमोरच राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनीही आपले आश्वासनांचे भाषण आटोपते घेतले. या वेळी ओमी यांनीही भाषण टाळल्याने उरल्यासुरल्या उपस्थितांचाही हिरमोड झाला. आपल्या छोटय़ाशा भाषणात रवींद्र चव्हाणांनी अनधिकृत, धोकादायक इमारती, विकास आराखडा आणि पाणी प्रश्न सोडवण्याचे आश्वासन देत भाषण संपवले. त्यामुळे तासाभरात आटोपता घेतल्या गेलेल्या या कार्यक्रमाच्या यशस्वितेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

आयलानी व कलानीमध्ये सुरक्षित अंतर

कुमार आयलानी आणि ओमी कलानी पहिल्यांदाच एका मंचावर एकत्र येत असल्याने त्यांचा मंचावरील वावर कसा असेल याबाबत उत्सुकता होती. मात्र कार्यक्रमस्थळी कुमार आयलानी यांनी ओमी कलानी यांच्यापासून दूरच राहणे पसंत केल्याचे दिसून आले. मंचावर जाण्यापूर्वी ओमी आमदार गणपत गायकवाड यांच्याशेजारी बसले, तर मंचावर दोन्ही नेत्यांमध्ये रवींद्र चव्हाण असल्याने हे अंतर स्पष्टपणे दिसून आले. त्यामुळे आघाडी झाली, मात्र मनोमीलन नाही, अशीच चर्चा शहरात रंगली होती.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Omi kalani and bjp power display fail
First published on: 31-01-2017 at 00:38 IST