बदलापूर : गेल्या २८ महिन्यांपासून प्रशासकीय राजवटीत असलेल्या अंबरनाथ आणि बदलापूर शहरांमधील विविध राजकीय पक्षांच्या इच्छुकांची निवडणुकीची प्रतिक्षा शिगेला पोहोचली आहे. त्यामुळे जनसंपर्क मोहिमांनाही वेग आला असून गणेशोत्सवानिमित्त गणरायासोबतच मतदारांनाही प्रसन्न करण्यासाठी इच्छुकांनी अनेक युक्त्या लढवल्या आहेत. पुजा साहित्य संच, आरती पुस्तके, मिठाई आणि प्रसाद वाटपासोबतच प्रभागनिहाय घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धांचेही आयोजन केल आहे. त्यात हजारोंची बक्षिसे जाहीर केली असून त्यातून मतदारांना खुश करण्याचा प्रयत्न केला जातो आहे.

मुंबई महानगर क्षेत्रातील अंबरनाथ आणि कुळगाव बदलापूर नगरपालिका या अ वर्ग नगरपालिका आहेत. दोन वर्षांपूर्वी मे २०२० मध्ये या नगरपालिकांच्या सदस्यांचा कार्यकाळ संपुष्टात आला. तेव्हापासून आजतागायत तब्बल २८ महिने या दोन्ही नगरपालिकांवर प्रशासकीय राजवट आहे. निवडणुका विविध कारणांनी पुढे ढकलल्या जात असल्याने इच्छुकांत अस्वस्थता पसरली आहे. मात्र तरीही जनसंपर्क मोहिम अर्ध्यात सोडता येणार नाही हे इच्छुक जाणून आहेत. त्यामुळे जनसंपर्क मोहिमेची कोणतीही संधी सोडली जात नाही.

हेही वाचा : ठाणे : एमएमआरडीएच्या उपनियोजक अधिकाऱ्याला २४ हजारांची लाच घेताना अटक

आता गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या गणेशोत्सवानिमित्त तर या इच्छुकांनी गणरायासोबतच मतदार राजालाही प्रसन्न करण्यासाठी कंबर कसली आहे. त्यासाठीची तयारी इच्छुकांनी महिनाभरापूर्वीच सुरू केली होती. गणेशभक्त मतदारांसाठी इच्छुकांनी आरती पुस्तके आणि पुजा साहित्य संचाचे वाटप केले. आता उत्सव काळात आपल्या प्रभागातील सर्वच घरगुती गणेशाचे दर्शन घेण्यासाठी इच्छुकांची लगबग सुरू आहे. दीड दिवस, पाच दिवस, गौरी, सात दिवसांचे गणपती आणि दहा दिवसांचे गणपती असे वर्गीकरण करून त्याप्रमाणे दर्शनाच्या कार्यक्रमाची आखणी केली जाते आहे. सोबतच यंदा घरगुती गणेश सजावट स्पर्धांना उत आला आहे.

प्रत्येक प्रभागात इच्छुकांच्या माध्यमातून या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. काही प्रभागात तीन ते चार स्पर्धांमध्ये गणेशभक्तांना सहभागी व्हावे लागणार आहे. या माध्यमातून मतदारांची माहिती मिळवण्याचाही छुपा अजेंडा इच्छुकांनी सुरू केला आहे. तर राजकीय पक्षांनीही शहरस्तरावरही स्पर्धा आयोजित केल्या आहेत. त्यात हजारो रूपयांची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. त्यातून अधिकाधिक मतदारांना प्रसन्न करणे हेच उद्दिष्ट दिसते आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने इच्छुकांनी मोठी तारांबळ या काळात उडताना दिसते आहे. कमी वेळात अधिक मतदारांपर्यंत पोहोचण्याची अग्नीपरिक्षा इच्छुकांना पार करावी लागते आहे.

हेही वाचा : गणपती विसर्जन आपल्या दारी उपक्रम ; गणपती विसर्जनासाठी कल्याण डोंबिवली कर्मचारी येणार घरी

पालिकेच्या कामावर प्रसिद्धी

मतदारांना खुश करण्यासोबतच कृत्रिम विसर्जन तलावांची निर्मिती करण्यातही इच्छुक आघाडीवर आहेत. मात्र काही ठिकाणी पालिकेने उभारलेल्या कृत्रिम विसर्जन तलावांचे श्रेय घेण्याचा प्रयत्न काही इच्छुक, माजी नगरसेवक घेताना दिसत आहेत. त्यामुळे अशा पालिकेच्या खर्चातून उभारलेल्या कामाचे श्रेय घेण्यापासून इच्छुकांना रोखण्याची मागणी होते आहे.