‘नुकत्याच चतुरंग प्रतिष्ठानच्या एकांकिका स्पर्धा झाल्यां, तेव्हा मी विद्याधर निमकरांना फोन केला की आकाशवाणीसाठी मला ध्वनिमुद्रण करण्याची परवानगी हवी आहे. ते लगेच म्हणाले, अहो उमाताई आकाशवाणीसाठी मी परवाना नाकारेन का? त्या क्षणी आकाशवाणीच्या नावातील जादू अजूनही सर्वाना मंत्रमुग्ध करते, ८६ वर्षे कार्यरत असलेल्या या संस्थेविषयीचा आदरभाव त्यातून प्रकट होतो आणि मनाला आनंद होतो,’ आकाशवाणीवरील वनिता मंडळ आणि नाटय़ विभागाच्या निर्मात्या उमा दीक्षित यांची ही ‘आकाशवाणी’ तिचे श्रोत्यांच्या मनातील स्थानमाहात्म्यच सांगून टाकते.
तशा अगदी ठरवून उमाताई या माध्यमाकडे त्या वळल्या नाहीत. आई-वडिलांचा शांतिवन, सवरेदय, भूदान अशा सामाजिक चळवळींमधे सहभाग असल्यामुळे ना. ग. गोरे, एस. एम. जोशी अशा थोरामोठय़ांची घरी ऊठबस असे. प्रसारमाध्यमांची यात महत्त्वपूर्ण भूमिका असे. साहजिकच आकाशवाणीवरील बातम्यांकडे सगळ्यांचे ‘कान’ लागलेले असत. इतकेच तेव्हा आकाशवाणीशी नाते. इंग्लिशमध्ये टअ केल्यानंतर प्राध्यापकी करण्याचे मनात घोळत असतानाच स्टाफ सिलेक्शन बोर्डाची परीक्षा उत्तीर्ण होऊन त्या आकाशवाणीत रुजू झाल्या. सुरुवातीला प्रसारण अधिकारी आणि २००३ नंतर कार्यक्रम अधिकारी म्हणून, निर्माती म्हणून त्या काम करू लागल्या.
आकाशवाणीत काम करणे, कार्यक्रमांची आखणी करणे हे भूषणच वाटायचे. वातावरण चांगले होते. जीव ओतून आवडीने काम करणारी माणसे होती. संगीतकार प्रभाकर पंडितांनी तर अगदी पित्याच्या भूमिकेतून मार्गदर्शन केले. कवी वसंत बापट यायचे. चहा पिता पिता ‘एक गीत लिहून द्या’ म्हटले की लोकगीतगंगा कार्यक्रमासाठी गीत लिहून द्यायचे.  कुठलेही नाटक न करता नाटय़विभागाची धुराही त्यांनी आपल्या खांद्यावर घेतली. तेव्हापासून आजतागायत नवनिर्मितीचा सिलसिला अखंड चालू आहे. आकाशवाणीतील याच प्रवासात समीर दीक्षित हा आयुष्याचा जोडीदार भेटला. त्यांच्याशी विवाह झाल्यानंतर  उमाताई ठाण्यात आल्या. सामाजिक, कौटुंबिक, आरोग्यदायी जाणिवांचे प्रतिबिंब वनितामंडळाच्या विविध कार्यक्रमांतून आणि नभोनाटय़ाच्या निर्मितीतून घडू लागले. ‘अहो प्रपंच’ ही कौटुंबिक मालिका, ‘मंत्र जगण्याचा’ ही ९५ भागांची दीर्घमालिका, रंगभूमीचा इतिहास सांगणारे ‘असं घडलं नाटक’ व ‘किस्से रंगभूमीचे,’ ‘या चिमण्यांनो परत फिरा रे,’ ‘पैठणी’, ‘मातृरूपेण’, ‘विठूच्या या तुळशीच्या मंजिऱ्या’, ‘लेकीचा गं जलम’, ‘स्वयंप्रकाशिता’ अशा असंख्य मालिकांतून अनेक विषय हाताळले. त्यानिमित्ताने मोठमोठय़ा कलाकारांना आकाशवाणीवर आमंत्रित केले. त्यामुळे त्यांचा सहवास लाभला. आवाजातले वैविध्य सादर करून उमाताईंनी जणू ‘स्वर’भावयात्रा सुरू केली. विविध क्षेत्रांतील दिग्गजांशी परिचय झाला आणि अनुभवविश्व समृद्ध झाले.
२६ जुलैच्या अतिवृष्टीत पहिल्या पॉइंट वुमनने चांगुलपणाने, समयसचकतेने काम करण्याच्या स्त्रीप्रवृत्तीचे दर्शन वनितामंडळातून घडवले. सोनाली नवांगुळ हिने एखाद्या स्त्रीचा लग्न न करणे, हा निर्णय समाजाने स्वीकारायला हवा, असे परखड मत व्यक्त केले. युनिसेफ प्रायोजित ‘मंत्र जगण्याचा’ या ९५ भागांच्या डेली सोपमध्ये विचारलेल्या प्रश्नाला अचूक उत्तर देऊन बक्षीस मिळवणाऱ्या एक बाई सहकुटुंब केंद्रावर आल्या. बक्षिसाची रक्कम घेण्यापेक्षा उमाताईंशी त्यांना बोलायचे होते. वनिता मंडळात ऐकूनच स्वत:च्या मुलीला शिकविण्याचा निर्णय घेऊन तिला कॅलिफोर्नियाला पाठविण्याची जबाबदारी स्वत:च्या हिमतीवर, नवऱ्याचा विरोध पत्करून तिने पार पाडली होती. हे पंखातले बळ उमाताईंमुळे मिळाले होते. कार्यक्रमांच्या वैविध्यातून सगळे  ‘जीवनदर्शन’च उमाताई जणू घडवत असतात. त्यांची तळमळ आणि आकाशवाणीबद्दलची कलाकारांची विश्वासार्हता यामुळे निर्माती म्हणून समाधानाची मोठी पुंजी निश्चितच गाठीला बांधली आहे.उमाताईंना स्वत:ला पाककृती ऐकायला आवडतात. म्हणून त्यांनी वनितामंडळात रेसिपी शोज, फोनवरून आजची पाककृती असे कार्यक्रम सादर केले. शेफ स्पेशल, प्रांतोप्रांतीची खासियत सांगत श्रोत्यांना रुचकर प्रवास घडवला. ‘वनितामंडळ’ हा स्त्रियांसाठी असलेला कार्यक्रम रोज ५५ मिनिटे सगळ्या केंद्रांवरून सादर केला जातो. स्त्रियांसाठी मनोरंजन, ज्ञान, प्रबोधन आपले प्रश्न मांडण्याचे हे हक्काचे व्यासपीठ. आकाशवाणीने, या सरकारी माध्यमातून स्त्रियांचा जो विचार केला आहे तो अन्य कुठल्याही माध्यमात केला गेलेला नाही, ही वस्तुस्थिती उमाताई अभिमानाने नजरेस आणून देतात. दृक्श्राव्य माध्यमांच्या झगमगाटात आकाशवाणीची ही पणती उमाताईंच्या दर्जेदार कार्यक्रमांमुळे अखंड तेवत राहणार आहे, हेच खरे!  
सुचित्रा साठे