केवळ एकाच बाजूचे काँक्रीटीकरण; दोन्ही बाजू जोडण्यासाठी ठिकठिकाणी उतार

मीरा-भाईंदर शहरातील अर्धवट स्थितीतील सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यावर महापालिका प्रशासनाने अजब उपाय शोधून काढल्याने अपघातांना आयतेच निमंत्रण मिळत आहे. अर्धवट स्थितीतील सिमेंट काँक्रीटचे रस्ते तातडीने पूर्ण करणे आवश्यक होते. अनेक ठिकाणी केवळ रस्त्याच्या एकाच बाजूचे काँक्रीटीकरण केले आणि दुसरी बाजू तशीच ठेवण्यात आली. त्यामुळे दोन्ही बाजू वर-खाली झाल्या. याचा नागरिकांना मोठाच त्रास व्हायला लागला. त्यावर उपाय म्हणून प्रशासनाने रस्त्याच्या दोन्ही बाजू एकमेकांना जोडण्यासाठी त्यांना ठिकठिकाणी उतार केले आहेत. या उतारांमुळे अपघातांत वाढ होत आहे.

मीरा-भाईंदर महापालिकेने शहरातील अनेक रस्ते सिमेंट काँक्रीटचे करण्याचे काम हाती घेतले आहे. यातील काही रस्ते विकासकांना टीडीआर देऊन विकसित करण्यात येत आहेत तर काही रस्ते शासनाकडून येणाऱ्या निधीतून केले जात आहेत, परंतु अनेक रस्ते सध्या अर्धवट स्थितीत आहेत. मीरा रोडच्या कनाकिया भागातील रस्ते विकासकाला देण्यात येणाऱ्या टीडीआरमध्ये समस्या निर्माण झाल्याने विकासकाने तसेच अर्धवट सोडले आहेत, तर न्यू गोल्डन नेस्ट भागातील सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम सध्या निधीअभावी बंद पडले आहे. या दोन्ही ठिकाणी रस्त्याची केवळ एकच बाजू सिमेंट काँक्रीटची बनविण्यात आली असून दुसरी बाजू तशी खडबडीत सोडण्यात आली आहे.

सिमेंट काँक्रीटची बाजू उंचावर आणि खडबडीत रस्ता त्याच्यापेक्षा खाली अशी विचित्र परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली आहे.

या रस्त्याच्या उंच-सखल स्थितीमुळे अनेक वेळा वाहनांचे अपघात होत आहेत. कनाकिया येथील शाळेतील विद्यार्थ्यांना तर याचा कायमच त्रास होत असतो. याबाबत अनेक तक्रारी प्रशासनाकडे करण्यात आल्यानंतर प्रशासनाने यावर विचित्र असा तोडगा काढला आहे. रस्त्याची सिमेंट काँक्रीटची उंचावर असलेली बाजू आणि त्याच्या तुलनेत खाली असलेली खडबडीत बाजू एका उताराने ठिकठिकाणी जोडण्यात आले आहेत, परंतु याचा उलटा परिणाम म्हणजे या उतारांमुळे अपघातांना आयतेच निमंत्रण मिळू लागले आहे. रस्त्यांच्या ठिकठिकाणच्या उतारावरून वाहने अचानकपणे दुसऱ्या बाजूवर उतरत असल्याने समोरून येणाऱ्या वाहनांना धडक देण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत.

याबाबत महानगरापालिकेची बाजू समजवून घेण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाशी संपर्क साधला असता अधिकारी बैठकीत व्यग्र असल्याचे सांगण्यात आले.