महापालिकेच्या उपक्रमाला यश

विरार : एकीकडे करोनाने थैमान घातले असताना पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथीच्या आजारावर नियंत्रण मिळवण्यात पालिकेला यश आले आहे. मागच्या महिन्यात केवळ दोन डेंग्यू तर चार मलेरियाच्या रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे वसईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

वसई-विरारमध्ये करोना रुग्णाची वाढ झपाटय़ाने होत असताना पावसाबरोबर इतर आजारांचा सामनाही करावा लागत आहे. दरवर्षी वसई-विरार परिसरात पावसाळ्यात डेंग्यू , हिवतापासारख्या आजारांची साथ पाहायला मिळते. या वर्षीची पालिकेची कोविडसंदर्भातील कामगिरी पाहता डेंग्यू, हिवताप हे आजारही थैमान घालणार की काय, अशी भीती वसईकरांना सतावत होती. पण या वर्षी पालिकेने आधीच सावधानता बाळगत या साथीच्या आजारांना डोके वर काढू दिले नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महापालिका आरोग्य विभागाच्या पदाधिकारी डॉ. स्मिता वाघमारे यांनी माहिती दिली की, करोनाबरोबर आम्ही डेंग्यू आणि हिवतापासंदर्भात यंदा अधिक खबरदारी घेऊन काम केले. पावसाळय़ाच्या आगमनाआधीपासून या संदर्भात जनजागृती केली. तसेच पाऊस सुरू होताच पालिकेने घरोघरी पाहणी सुरू केली. त्याचबरोबर फवारणी आणि इतर दक्षता यंत्रणा कामी लावल्या. आरोग्यसेवक-सेविकांना याबाबत माहिती घेण्यास सांगितले. तसेच खासगी आणि शासकीय रुग्णालयात या संदर्भातली औषधे उपलब्ध करून दिली. तसेच रुग्णाची माहिती तातडीने पालिकेला देण्यात यावी, अशी यंत्रणा उभी केली आहे.

यामुळे यंदा साथीचे आजार पूर्णत: नियंत्रणात आहेत. यात नागरिकांचा सहभागही मिळाला असल्याने आम्हाला काम करणे अधिक सोयीस्कर होत असल्याचे त्यांनी सांगितले.