ठाणे : केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानाचा एक भाग म्हणून ठाणे शहरात गेल्या काही महिन्यांपासून परिसर स्वच्छ करण्याबरोबरच सुशोभिकरणाची कामे केली जात आहेत. परंतु शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या मासुंदा तलावाजवळील परिसरात उघड्यावर लघुशंका आणि नैसर्गिक विधी उरकले जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. या प्रकारामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. केंद्र शासनाकडून स्वच्छ भारत अभियानांतर्गत दरवर्षी पहिल्या दहा स्वच्छ शहरांची निवड कऱण्यात येते. या अभियानात अव्वल स्थान पटकाविण्यासाठी ठाणे महापालिकेकडून गेल्या काही वर्षांपासून सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यासाठी शहर स्वच्छ ठेवण्याबरोबरच विविध उपक्रम राबविण्यात येतात. मात्र, पालिकेला अद्याप पहिल्या दहा शहरांमध्ये स्थान मिळविता आलेले नाही. यंदाही पालिकेने या अभियानात अव्वल स्थान पटकाविण्यासाठी शहर स्वच्छेतेबरोबरच सुशोभिकरणाच्या कामांवर भर दिला. महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी शहरभर दौरे करून या कामांचा आढावा घेतला. असे असतानाही शहराच्या मध्यवर्ती भागातील मासुंदा तलावाजवळील सेंट जॉन द बाप्टीस हायस्कुलच्या संरक्षक भिंतीलगतच्या अस्वच्छतेकडे पालिकेचे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे. याठिकाणी उघड्यावर नैसर्गिक विधी केले जात आहेत. याठिकाणी वाहने उभी केली जात असून त्या आडून लघुशंका केली जात आहे. यामुळे परिसरात दुर्गंधीचे पसरत आहे. यामुळे परिसरात आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची भिती व्यक्त होत आहे. या संदर्भात संगम डोंगरे यांनी महापालिका प्रशासनाला पत्र व्यवहारही केला आहे. मात्र, त्याकडे पालिका प्रशासन लक्ष देत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. याठिकाणी उभ्या असलेल्या वाहनांच्या आडून लघुशंका केली जात आहे. त्यामुळे ही वाहने हटवून त्या जागी घोडागाडीचे वाहनतळ करायला हवे. जेणेकरून त्याठिकाणी कुणाला लघुशंका करता येणार नाही आणि हा परिसर स्वच्छ ठेवण्यास मदत होईल. तसेच घोडागाडीमुळे परिसरात होणारी वाहतूक कोंडीची समस्या वाहनतळामुळे कमी होईल, असा दावाही त्यांनी केला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 24th May 2022 रोजी प्रकाशित
ठाण्याच्या मध्यवर्ती भागात उघड्यावर नैसर्गिक विधी ; पालिका प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष
या प्रकारामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 24-05-2022 at 16:00 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Open defecation in the central part of thane zws