भाईंदर : भाईंदर पूर्व परिसरातील प्रमोद महाजन कोविड केंद्रात साचत असलेल्या जैव वैद्यकीय कचऱ्याची योग्य वेळेत विल्हेवाट लावण्याचे आदेश महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय राठोड यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिले आहेत.
भाईंदर पूर्व परिसरातील प्रमोद महाजन सभागृहात राज्य शासन आणि म्हाडाच्या सहयोगाने ३६६ खाटा असलेले ‘समर्पित कोविड आरोग्य केंद्रा’चे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले होते.
सध्या या कोविड केंद्रात १९६ करोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. परंतु केंद्रात मोठय़ा प्रमाणात जैव वैद्यकीय कचऱ्याचे ढीग साचत असल्याचे दिसून आले होते. जैव वैद्यकीय कचरा साचत असल्याने स्थानिक नागरिक आणि रुग्णांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या संदर्भात लोकसत्ता वृत्तपत्रात बुधवारी बातमी प्रकाशित करण्यात आली होती. त्या बातमीची दखल घेत आयुक्त राठोड यांनी तातडीने वैद्यकीय अधिकाऱ्यांची बैठक बोलावून त्यांना खडे बोल सुनावले. त्याच प्रकारे शहरातील रुग्णालयात आणि कोविड केंद्रात निघणाऱ्या जैव वैद्यकीय कचऱ्याची वेळेत विल्हेवाट लावण्यात यावी अशा सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.