वसईतील रहिवाशाच्या अवयवदानाने तिघांना जीवनदान; मूत्रपिंड, यकृत यांचे यशस्वी प्रत्यारोपण
मेंदूज्वराने मृत्यू झालेल्या वसईच्या विल्यम लोपिस यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या अवयवाचे दान करण्याचा निर्णय घेतला.. लोपिस यांची दोन मूत्रपिंडे (किडनी) आणि यकृत यांचे प्रत्यारोपण एका महिलेसह तिघांना करण्यात आले. मृत्यूनंतर अवयवदान करण्याच्या त्यांच्या कुटुंबीयांच्या निर्णयामुळे तिघांना जीवनदान मिळाले.
लोपिस हे वसईच्या निर्मळ गावात राहात होते. ते व्यवसायाने इस्टेट एजंट होते. गेल्या आठवडय़ात त्यांना अचानक उलटय़ांचा त्रास सुरू झाला आणि ते घरातच कोसळले. उपचारासाठी त्यांना कार्र्डिनल ग्रेशस रुग्णालयात दाखल करण्यात आले. लोपिस यांची प्रकृतीे खालावत चाललीे होती. त्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी मुंबईच्या हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तपासल्यावर त्यांना मेंदूज्वर झाल्याचे सांगण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न केला, मात्र त्यास यश आले नाही आणि लोपिस यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या मृत्यूने खचून न जाता त्यांच्या पत्नी जॉयसी यांनी पतीच्या अवयवदानाचा निर्णय घेतला.
त्यांचे मूत्रपिंड आणि यकृत काढून घेण्यात आले. हिंदुजा रुग्णालयातच एका तरुणाला एक मूत्रपिंड, तर एका महिलेला दुसरे मूत्रपिंड रोपण करण्यात आले. त्यांचे यकृत अन्य एका तरुणाला देण्यात आले. लोपिस यांचे हृदय, त्वचा आणि डोळे दान करण्याचाही निर्णय घेण्यात आला होता; परंतु ते काढून घेण्याचीे वेळ टळून गेल्याने ते जमले नसल्याची खंत त्यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केलीे आहे. ज्या वेळी त्यांचा मृतदेह गावात आला, त्याच्या आधीच त्यांनी दान केलेल्या अवयवाने तिघांना जीवनदान मिळाले होते. त्यांच्या शस्त्रक्रिया यापूर्वीच झालेल्या होत्या. निर्मळ येथीेल चर्चमध्ये लोपिस यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या कुटुंबीयांनी दाखविलेल्या या औदार्यामुळे त्यांचे ऋण व्यक्त करण्यासाठी हजारो नागरिक चर्चमध्ये अंत्यविधीसाठी उपस्थित होते.

पुतण्याचेही अवयवदान
गेल्या वर्षी मे महिन्यात विल्यम लोपिस यांच्या चुलत भावाचा मुलगा विन्सट लोपिस (१७) याचा अपघाती मृत्यू झाला होता. त्या वेळी त्याचे डोळे आणि त्वचादान करण्यात आले होते. लोपिस यांच्या गावात राहणारे जीवन विकास मंचचे विश्वस्त फ्रान्सिस आल्मेडा यांनी अवयवदानासाठी विवेक मंच स्थापन केला असून त्याद्वारे ते जनजागृती करत असतात. त्यांनी जॉयसी यांचे या कामासाठी मन वळविले होते. पुरुषोत्तम पवार यांचे ‘देहमुक्ती’ या अवयवदानाच्या विषयावरील शिबिरे वसईत होत असतात. त्याचाही सकारात्मक परिणाम होत असून अनेक लोक अवयवदानासाठी तयार होत असल्याचे आल्मेडा यांनी सांगितले.