ठाणे : ठाण्यातील सुपरमॅक्स कंपनीच्या सुमारे १ हजारहून अधिक कामगारांना गेले तीन वर्षांपासूनचे थकीत वेतन मिळाले नसल्यामुळे रविवारी कामगारांनी त्यांच्या पत्नींसह तीनहात नाका ते उपमुख्यमंत्री एकनाश शिंदे यांच्या निवासस्थानापर्यंत मुखमोर्चा काढला होता. काही दिवसापूर्वी तुमचे प्रश्न सोडवतो असे आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कामगारांना दिले होते. मात्र, कामगारांना अद्याप कोणत्याच प्रकारची देणी मिळाली नसल्याने नेमकी कोणती मध्यस्थी केली असा थेट सवाल कामगारांनी यावेळी उपस्थित केला. या आंदोलनात कामगरांच्या पत्नी मागण्यांचे फलक घेऊन सहभागी झाले होते. हे सर्वजण मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थाना बाहेर ठिय्या मांडून बसले होते.

ठाण्यातील तीन हात नाका येथे ७० वर्षापासून सुपरमॅक्स ही कंपनी कार्यरत आहे. या कंपनीत दाढीचे ब्लेड तयार करण्याचे काम करण्यात येते . या कंपनीत हजारो कामगार काम करत होते. मात्र, दोन ते तीन वर्षांपूर्वी कंपनी व्यवस्थापनाने कंपनी चालवू शकत नसल्याचे कारण पुढे करत अचानक कंपनी बंद केली. यासंदर्भातील कोणत्याही प्रकारची अधिकृत घोषणा व्यवस्थापनाकडून करण्यात आली नसल्याचा आरोप कामगारांकडून करण्यात आला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कंपनी बंद करताना कामगारांना पगार सुरु राहील असे आश्वासन देण्यात आले होते. पण, केवळ २०१९ पर्यंत सुरळित वेतन मिळाले. त्यानंतर वेतन बंद झाले, अशी माहिती काही कामगारांनी दिली. गेले चार वर्षांपासून कंपनीकडून कामगारांना थकित वेतन मिळाले नाही. वेतन देत नसल्यामुळे कंपनी विरोधात कामगार गेले अनेक वर्षांपासून आंदोलने करत आहेत. परंतू, शासनाकडूनही त्यांना कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळत नसल्यामुळे सर्व कामगारांनी रविवारी आपल्या कुटूंबासह तीनहात नाका ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानापर्यंत मुखमोर्चा काढला होता. उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थाना बाहेर हे कामगार ठिय्या मांडून बसले होते. त्यांची सोमावारी मंत्रालयात बैठक असल्याची माहिती सुत्रांनी दिली.