मुरबाडमधील गाव-पाडय़ांच्या पाणीप्रश्नावर मात

चर आणि बंधाऱ्यांमुळे शेकडो हेक्टर डोंगरावर पडणाऱ्या पावसाचा वेग कमी करून तो बंधाऱ्यांच्या साहाय्याने अडवून पाणी जिरवण्यात यश येऊ  लागले आहे.

डोंगरांवरील ७०० हेक्टर जागेवर समतल चर खोदून बंधाऱ्यांची निर्मिती; जलसंवर्धनामुळे बोडक्या डोंगरांवरही हिरवाई

बदलापूर : विस्तीर्ण डोंगर, शेकडो बंधारे, विहिरी आणि लहान-मोठी धरणे असूनही मुरबाड तालुक्यातील अनेक गाव-पाडय़ांमध्ये दरवर्षी पाणीटंचाईची परिस्थिती ओढावते. या परिस्थितीवर मात करत डोंगरांची धूप टाळण्यासाठी वन विभागाच्या माध्यमातून गेल्या वर्षभरापासून तालुक्यातील सुमारे ७०० हेक्टर डोंगरावर समतल चर खोदून दोन प्रकारचे बंधारे बांधण्यात आले आहेत. या चर आणि बंधाऱ्यांमुळे शेकडो हेक्टर डोंगरावर पडणाऱ्या पावसाचा वेग कमी करून तो बंधाऱ्यांच्या साहाय्याने अडवून पाणी जिरवण्यात यश येऊ  लागले आहे. आसपासच्या परिसरातील कूपनलिका, विहिरींच्या पाणीपातळीत वाढ होण्यास मदत होणार आहे.

गेल्या काही वर्षांत विविध भागातल्या डोंगरांची झालेली धूप आणि त्याचे दुष्परिणाम यंदाच्या पावसाळ्यात विविध ठिकाणी झालेल्या भूस्खलनाच्या घटनांमध्ये पाहायला मिळाले. ठाणे जिल्ह्य़ातल्या विविध तालुक्यांमध्ये विस्तीर्ण डोंगर, भलीमोठी वनसंपदा आहे. मुरबाड तालुक्यात सुमारे शेकडो हेक्टर वनजमीन आहे. त्यासोबतच विविध गावांमध्ये लहान मोठे बंधारे, विहिरी, कूपनलिका आणि धरणेही आहेत. त्यानंतरही मुरबाड तालुक्यात दरवर्षी विविध गावांमध्ये जानेवारी महिन्यापासूनच पाणीटंचाईला सुरुवात होत असते. या भागात होणाऱ्या मुसळधार पावसामुळे या भागातील डोंगरावरील मातीची धूपही मोठय़ा प्रमाणावर होत असल्याचे गेल्या काही वर्षांत दिसून आले आहे. त्याचा थेट परिणाम शेतकऱ्यांच्या शेतजमिनींवर साचलेल्या गाळातून दिसून आला. त्यामुळे ही मातीची धूप थांबवून जलसंवर्धनाची कामे करण्यासाठी वन विभागाने जल व मृदासंधारणाच्या कामांच्या माध्यमातून सुमारे ७०० हेक्टर क्षेत्रावर जमिनीच्या समतल चर खोदून विविध प्रकारचे बंधारे बांधण्यात आले आहेत.

औरंगाबादच्या दिशा फाऊंडेशनचे जलतज्ज्ञ उस्मान बेग यांनी जानेवारी ते ऑक्टोबर या काळात मुरबाड तालुक्यातील ४० हजार हेक्टर वनजमिनींचे सर्वेक्षण करून चर खोदण्याचे आणि बंधारे बांधण्याच्या जागा निश्चित केल्या होत्या. त्यानंतर ही कामे पार पाडली गेली, अशी माहिती जिल्ह्य़ाचे सहायक वन संरक्षक तुळशीराम हिरवे यांनी दिली आहे. चरच्या शेजारी बांबू आणि कोरफडची लागवड करण्यात आली आहे. या चर आणि बंधाऱ्यामुळे डोंगरांवरून येणाऱ्या पाण्याच्या वेगावर नियंत्रण मिळवण्यात यश येत आहे, तसेच जमिनीत पाणी मुरण्यास सुरुवात झाली आहे. बंधाऱ्यामुळे दगड, गोटे आणि गाळही अडकला जात असून त्यामुळे शेतीचे नुकसान टाळणे शक्य झाले आहे.

या मोहिमेत आतापर्यंत अडीच हजार बंधारे बांधण्यात आले असून यात आसोळे, किशोर, वाघिवली, हिरेघर, मासले-बेलपाडा, कोळे, आगाशे, मोहघर, पाटगाव या गावांशेजारच्या वनाचा समावेश आहे.  अतिवृष्टीच्या झाल्याने याचा सकारात्मक फायदा झाला.

– रमेश रसाळ, वन क्षेत्रपाल, मुरबाड

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Overcoming water problem villages murbad ssh