संध्याकाळी प्रचारफेरी, चौकसभा आयोजित करण्याची मागणी
पालघर लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा प्रचार तापला असला तरी कार्यकर्ते मात्र उकाडय़ाने हैराण झाले आहेत. कडाक्याच्या उन्हामुळे सकाळी आणि दुपारी प्रचार करताना दमछाक होते, असे काही कार्यकर्त्यांनी सांगितले. प्रचारफेरी, चौकसभा शक्यतो संध्याकाळी ठेवाव्यात, अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात आली आहे.
पालघर लोकसभेची पोटनिवडणुकीसाठी येत्या २८ मे रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात कार्यकर्त्यांना प्रचार करावा लागत आहे. एरवी वातानुकूलित गाडय़ातून फिरणारे कार्यकर्ते आणि नेत्यांना पक्षाचे झेंडे घेऊन प्रचारासाठी उतरावे लागत आहे. सकाळी ९ पासून प्रचाराला सुरुवात होत आहे. प्रभागात स्थानिक नेत्याच्या नेतृत्वाखाली प्रचारफेरी काढण्यात येत आहे. सकाळपासूनच कडक ऊन पडत असल्याने दमछाक होत असल्याचे कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले. त्यामुळे प्रचारफेरीसाठी निघताना प्रचाराच्या साहित्याबरोबरच बाटलीबंद पाण्याचे खोके सोबत ठेवावे लागत आहे. ‘आम्ही पक्षाचे कार्यकर्ते आहोत. ऊन असले तरी पक्षाच्या कामासाठी त्याची पर्वा करत नाही,’ असे बविआचा वसईतील कार्यकर्ता छोटू आनंद याने सांगितले.
संध्याकाळी प्रभागात नाका बैठका, कार्यकर्त्यांच्या बैठका आयोजित करण्यात येत आहे. अनेकांनी मे महिन्याच्या सुटीत गावी जाण्याचे तसेच उन्हाळी सहलीचे नियोजन केले होते. अशा सर्वाना या सहली रद्द करण्याचे वरिष्ठांकडून सांगण्यात येत आहे.
समाजमाध्यामांवर प्रचार करण्याचे आवाहन
समाजमाध्यमे नागरिकांपर्यंत पोहोचण्याचे प्रभावी माध्यम असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी समाजमाध्यमांचा आधार घेतला आहे. प्रचारफेरी करताना ती फेसबुक लाइव्ह करण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना देण्यात आल्या आहेत, तसेच प्रत्येक प्रचाराची छायाचित्रे फेसबुक, ट्विटरवर, व्हॉट्स अॅपवर टाकण्याचे आदेशच देण्यात आले आहे. ‘समाजमाध्यमे सध्याचे प्रभावी माध्यमे आहेत. व्हॉट्स अॅप आणि फेसबुकचा वापर बहुतेक जण करतात. त्यामुळे याच्या माध्यमातून अधिकाअधिक मतदारांपर्यंत पोहोचणे सोपे असल्याने आम्ही त्याचा वापर करत असल्याचे बविआच्या नेत्याने सांगितले. त्याचा चांगला उपयोग होत असल्याचा दावा त्यांनी केला.
उन्हामुळे आम्ही प्रचाराचे नियोजन केले आहे. दुपारी शक्यतो प्रचारफेरी न काढता घरोघरी कार्यकर्ते पाठवून पत्रके, वचननामे वाटण्याचे काम केले जात आहे. संध्याकाळच्या वेळी प्रचारफेरी आणि चौकसभा आयोजित करण्यात येत आहे. जर मोठे नेते आले, तरच सकाळच्या वेळी प्रचारफेरी काढली जाईल. – मिलिंद चव्हाण, उपशहरप्रमुख, शिवसेना</strong>
कडाक्याच्या उन्हामुळे कार्यकर्ते हैराण होत आहेत. उन्हामुळे आम्ही बहुतेक प्रचार संध्याकाळी करण्याचे ठरवले आहे. सकाळी फक्त ९ ते ११ असे दोन तास प्रचार करतो. मात्र संध्याकाळी ५ ते रात्री साडेनऊ पर्यंत अधिकाअधिक प्रचार करण्यावर आमचा भर आहे. – कॅ. नीलेश पेंढारी, काँग्रेसचे युवा नेते
२८ मे रोजी सार्वजनिक सुट्टी
पालघर लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक २८ मे रोजी होणार आहे. या मतदारसंघातील सर्वाना मतदानाचा अधिकार बजावता यावा यासाठी २८ मे या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.