बारावी परीक्षेचा वसई तालुक्यातील ८८.७८ विद्यार्थी उत्तीर्ण
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल ऑनलाइन पद्धतीने बुधवारी जाहीर करण्यात आला. त्यात पालघर जिल्ह्याचा निकाल ८६.७० टक्के लागला असून वसई तालुक्याचा निकाल ८८.७८ टक्के लागला आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या १२ वीच्या परीक्षेमध्ये पालघर जिल्ह्यातून एकूण ३९, ०४७ विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यापैकी ३३,८५४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेत विद्यार्थिनींनी बाजी मारली असून ९० टक्के विद्यार्थिनी आणि ८४.०१ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. बुधवारी दुपारी १ वाजता हा निकाल जाहीर करण्यात आला. निकालाच्या वेळी बहुतेक विद्यार्थी एकाच वेळी निकाल ऑनलाइन पद्धतीने बघत असल्याने सांकेतिक स्थळावर धिम्या गतीने निकाल येत होता. त्यामुळे काही विद्यार्थ्यांना प्रतीक्षा करावी लागली. शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ यांनी बारावीच्या निकालाबाबत माहिती दिली.