सुस्थितीतील, शुद्ध पाण्याचे आणि विरार शहराच्या मध्यवर्ती भागात असलेले पापडखिंड धरण बंद करण्याच्या महापालिकेच्या निर्णयाने जनक्षोभ उसलळेला आहे. पिण्याच्या पाण्याचे धरण बंद करून त्यावर ‘वॉटर पार्क’ बनवणारी वसई-विरार ही बहुधा पहिलीच महापालिका असावी. छटपूजेमुळे धरणाचे पाणी प्रदूषित होत असल्याचे पोलीस सांगत होते, परंतु हा प्रस्ताव १५ वर्षांपूर्वीच आखण्यात आल्याचेही आता उघड झाले आहे. शहरात पाण्याची टंचाई असताना धरण बंद करून वॉटर पार्क तयार करणे हे अधोगतीचे आणि प्रशासन सत्ताधाऱ्यांच्या धोरणशून्यतेचे लक्षण आहे.

पाणी हे जीवन आहे आणि पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवायला हवा. हे चिरंतन सत्य असले तरी पर्यावरण वाचवण्याचा नारा देणाऱ्या वसई-विरार महापालिकेला पटलेले दिसत नाही आणि त्यामुळे त्यांनी शहरातील सुस्थितीत असलेले पिण्याच्या पाण्याचे धरण बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पाण्याचे धरण बंद करून या ठिकाणी पर्यटनासाठी वॉटर पार्क विकसित करण्याचा प्रस्ताव आहे. शहरात पाण्याची टंचाई असताना सुस्थितीतील पिण्याच्या पाण्याचे धरण बंद करून ‘वॉटर पार्क’ची संकल्पना मांडणारी वसई-विरार महापालिका ही बहुधा जगातली एकमेव महापालिका असावी. पाण्याचे धरण बंद करण्याच्या निर्णयामुळे वसईकर जनता प्रचंड संतप्त झाली आहे. मात्र तरीही सत्ताधारी आणि प्रशासन या निर्णयावर आजही ठाम असून त्याचे समर्थन करीत आहे हे विशेष. बंदी असूनही या धरणाच्या पाण्यात छटपूजा केली जाते आणि पाणी प्रदूषित होते, हे यामागचे मुख्य कारण मानले जात असले तरी धरण बंद करण्याच्या निर्णय विरार नगर परिषद असताना म्हणजे १५ वर्षांपूर्वीच घेतला होता, ही धक्कादायक बाब आता समोर आली आहे. शहरात पाण्याची टंचाई आहे. या धरणाचं पाणी वाचविणेही सहज शक्य आहे.

illegal building, Kopar Shivsena branch,
डोंबिवलीतील कोपर शिवसेना शाखेजवळ बेकायदा इमारतीचे बांधकाम, व्यापारी गाळे बांधून विक्रीची तयारी
paris 2024 olympics olympic torch lit in greece
खराब हवामानातही ग्रीसमध्ये ऑलिम्पिक ज्योत प्रज्वलित!
heavy traffic in patri pool area in kalyan
कल्याण : पत्रीपुलामुळे पुन्हा मनस्ताप, आता रस्ते कामामुळे अभूतपूर्व वाहतूक कोंडी
Nagpur Central Jail, Notorious Gangster, Chetan Hazare , Assaulted by Inmate, crime news, police,
धक्कादायक! मध्यवर्ती कारागृहात टोळीयुद्ध, टिनाच्या पत्र्याने प्राणघातक हल्ला

विरार पूर्वेचे फुलपाडा येथे पापडखिंड धरण १९७२मध्ये बांधण्यात आले होते. त्या वेळी विरार शहराची लोकसंख्या केवळ १५ हजार होती. पाण्याची गरज लक्षात घेऊन तत्कालीन मंत्री भाऊसाहेब वर्तक यांनी हे धरण बांधून घेतले होते. या धरणातून विरार शहराच्या पूर्वेला दररोज १ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होत आहे. पापडखिंड धरणाबरोबर शहराला उसगाव, पेल्हार धरणातून पाणीपुरवठा करण्यात आला. शिवाय आता सूर्या प्रकल्पाच्या टप्पा क्रमांक दोनमधून शंभर दशलक्ष लिटर अतिरिक्त पाणी येत आहे. शहरात पाणीच पाणी आलेले आहे आणि त्यामुळे पापडखिंड धरण बंद करण्याचे चित्र उभे केले जात आहे ते तद्दन फसवे आणि वसईकरांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे.

गेल्या तीन-चार वर्षांपासून पापडखिंड धरणात छटपूजा केली जाते. विरार पूर्वेला परप्रांतियांची लोकसंख्या वाढत आहे. त्यांनी अन्य ठिकाणी छटपूजा करावी यासाठी महापालिकेने प्रयत्न केले. त्यांना तलाव बांधून दिले. अर्नाळा समुद्रकिनारी व्यवस्था केली. तेथे नेण्यासाठी मोफत बसची व्यवस्था केली. परंतु छटपूजा आयोजक धरणातच पूजा करणार या हट्टाला पेटले. ५० हजारांहून अधिक लोक पिण्याच्या पाणी असलेल्या धरणात छटपूजा करीत असतात. सूर्याला अघ्र्य देण्याच्या नावाखाली तेलाचे दिवे सोडतात. त्यामुळे या धरणाचे पाणी प्रदूषित झाले आहे. स्थानिक आमदार आणि लोकप्रतिनिधी या छटपूजेला उपस्थित राहत असतात. त्यामुळे त्यांचे बळ वाढते आणि बंदी डावलून ते धरणाच्या पाण्यात छटपूजा करतात. आपण धरणाच्या पाण्यात छटपूजा करीत असल्याने पिण्याचे पाणी प्रदूषित होते याचेही भान त्यांना नाही.

पापडखिंड धरण वसई-विरार महापालिका मुख्यालयापासून अवघ्या दीड किलोमीटर अंतरावर आहे. धरणाची सुरक्षा राखण्यात पालिका कमी पडत आहे. होणारे प्रदूषण हे मानवनिर्मित आहे. धरणाकडे सर्व बाजूने जाता येते. धरणाच्या काठावर बसणारे मद्यपी आणि बेपर्वा पर्यटक धरणाच्या पाण्यात कचरा टाकतात. अनेक जण आत्महत्या करण्यासाठी येतात. त्यांना रोखण्यासाठी कुठलीही व्यवस्था नाही. पण या सर्व गोष्टी सहज शक्य आहेत. धरणाभोवती कुंपण घातलं, पुरेसे सुरक्षारक्षक नेमले तर शक्य आहे. धरणाचे पाणी सात-आठ महिनेच पुरते, असा दावा पालिका करते. पण धरणातील गाळ काढला, धरणाची खोली वाढवली, त्याचा विस्तार केला तर नक्कीच पाणीसाठा वाढू शकेल. कित्येक वर्षांत धरणातील गाळ काढलेला नाही.

सध्या सूर्या प्रकल्पाचे पाणी पालघर जिल्ह्यातून येते. तेथील नागरिकांना वसई-विरारने पाणी पळवल्याचा आरोप असून हे पाणी वसईला मिळू नये म्हणून आंदोलन उभे राहिले आहे. वसई-विरार महापालिका पाण्याचे नवनवीन स्रोत शोधत आहे. भविष्यातील गरज ओळखून नव्या पाण्याचे स्रोत शोधले असून त्याद्वारे ४१५ दशलक्ष लिटर पाणी शहरात आणणार आहे. २०१८-१९च्या अर्थसंकल्पात त्यासाठी तरतूद करण्यात आली आहे. सुसरी प्रकल्प, देहरजी प्रकल्प यांशिवाय सातिवली-राजिवली धरण योजना, धामणी-खडकवली धरण योजना आदींवरील प्रकल्प योजनांचा समावेश आहे. एकीकडे नवनवीन जलस्रोत शोधायचे आणि अस्तित्वात असलेले धरण बंद करायचे हा विरोधाभास आहे. धरणाच्या भोवतालच्या जमिनी काही जणांनी कवडीमोल भावाने विकत घेऊन ठेवल्या होत्या. त्यांच्या भल्यासाठी तर हे धरण बंद केले जात नाही ना, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

पालघर तालुक्यातील पाणी पळवायचे आणि स्वत:च्या पाण्याची मौजमजेसाठी उधळपट्टी करायची हे कसले धोरण? पापडखिंड धरण ही शहराची मौल्यवान संपत्ती आहे. हे धरण वाचवण्यासाठी आता प्रत्येक नागरिकाने पुढे यायला हवे. पाण्याचे धरण बंद होणे ही शहरातील सर्वात मोठी अधोगती आणि शोकांतिका ठरणार आहे.

सुहास बिऱ्हाडे @suhas_news