उल्हासनगर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रवादी परिवार संवाद कार्यक्रमाच्या निमित्ताने उल्हासनगर शहरात आलेल्या जलसंपदामंत्री जयंत पाटील आणि गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कार्यक्रमानंतर मध्यरात्री ‘कलानी महल’ गाठत पप्पू कलानी याची भेट घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जाते आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

माजी आमदार ज्योती कलानी यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतिनिधित्व करणारे कलानी कुटुंबात कुणीही नाही. त्यामुळे भाजपपासून दुरावलेल्या ओमी कलानी आणि पूर्वाश्रमीच्या पप्पू कलानीला राष्ट्रवादी काँग्रेसकडे वळवण्यासाठी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आग्रही असल्याचे दिसत आहे. पंधरा दिवसांपूर्वी भाजपचे उल्हासनगरचे आमदार कुमार आयलानी यांच्याशी पप्पू कलानीने चर्चा केली होती. याच वेळी आयलानी यांनी भाजपप्रवेशाचे आमंत्रण दिले होते.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि उल्हासनगर शहरातील राजकारणाच्या केंद्रस्थानी असलेले कलानी कुटुंबीय यांचे घनिष्ठ संबंध आहेत. विधानसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवारीसाठी प्रयत्नशील असलेल्या ज्योती कलानी यांना अखेरच्या टप्प्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेच उमेदवारी दिली. काही दिवसांपूर्वी ज्योती कलानी यांचे निधन झाले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या कलानी कुटुंबात सध्याच्या घडीला कुणीही नाही.

 महापालिका निवडणुकीत भाजपला साथ देणाऱ्या टीम ओमी कलानी यांनीही पक्षापासून अंतर राखले आहे. त्यामुळे शिवसेनाही कलानी कुटुंबाच्या जवळ जाण्याच्या प्रयत्नात आहे. त्यातच जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या पप्पू कलानीने शहरात जनसंपर्क वाढवला आहे. आगामी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर कलानी कुटुंबाला जवळ करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने प्रयत्न सुरू केल्याचे दिसते आहे.

या बैठकीत शहरातील विविध प्रकारच्या समस्यांवर चर्चा झाली. या वेळी ‘टीम ओमी कलानी’ गटाचे २० नगरसेवक, कांबा गावचे सरपंच आणि पदाधिकारी उपस्थित होते. निवडणुका ओमी कलानींच्या नेतृत्वातच लढल्या जाणार आहेत.

– कमलेश निकम, प्रवक्ता, टीम ओमी कलानी.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pappu kalani meeting with ncp leaders zws
First published on: 26-10-2021 at 03:42 IST