दिल्लीनजीक गाझियाबाद परिसरातून सहा महिन्यांपूर्वी बेपत्ता झालेल्या ११ वर्षीय निशाची ठाणे पोलिसांच्या बाल संरक्षण शाखेने बुधवारी पालकांसोबत भेट घडवून आणली.  सहा महिन्यांपूर्वी घरची वाट चुकून तिने रेल्वेने कल्याण शहर गाठले. मात्र, सर्व शहर तिच्यासाठी अनोळखी असल्याने ती भेदरली होती. यामुळे रेल्वे पोलिसांना तिचा घरचा पत्ता तसेच कुटुंबाविषयी काहीच माहिती देऊ शकली नव्हती. यामुळे पोलिसांनी तिला भिवंडीतील बाल सुधारगृहात पाठविले होते. गेल्या सहा महिन्यांपासून ती तिथेच राहत होती. दरम्यान, चाइल्ड प्रोटेक्शन युनिटच्या तपासामुळे तिला तिचे पालक पुन्हा मिळू शकले आहेत.
दिल्ली येथील गाझियाबाद परिसरात मुख्तार हारुन खान हे कुटुंबासोबत राहतात. पत्नी ताराबेगम, दोन मुली आणि एक मुलगा असे त्यांचे कुटुंब. त्यांची मोठी मुलगी निशा अकरा वर्षांची असून ती थोडीफार गतीमंद आहे. सहा महिन्यांपूर्वी निशा घराबाहेर पडली आणि परिसरात फिरत असताना घरची वाट चुकली. यामुळे घरी परतण्यासाठी तिची धडपड सुरू झाली. घराची शोधाशोध करत असतानाच ती दिल्ली रेल्वे स्थानकात आली. तिथे स्थानकात मुंबईकडे जाणारी एक्स्प्रेस उभी होती. या एक्स्प्रेसमधील एका डब्यात जाऊन ती बसली. काही वेळातच एक्स्प्रेस स्थानकातून सुटली आणि तिचा मुंबईच्या दिशेने प्रवास सुरू झाला. कल्याण रेल्वे स्थानकात ही एक्स्प्रेस येऊन थांबली. त्यावेळी ती गाडीतून खाली उतरली. स्थानकातून बाहेर पडताच तिच्यासाठी सर्वच काही अनोळखी होते. यामुळे ती पुन्हा रेल्वे स्थानकात आली मात्र, तिला घरी परतण्याचा मार्ग उमजत नव्हता. यामुळे स्थानकामध्ये रडत असताना रेल्वे पोलिसांनी तिची विचारपूस केली आणि  रेल्वे पोलिसांनी तिला भिवंडीतील बाल सुधारगृहात पाठविले होते. गेल्या सहा महिन्यांपासून ती तिथेच राहात होती. दरम्यान, ठाणे बाल संरक्षण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुरेश सोनावळकर, महिला पोलीस हवालदार प्रतिमा मनोरे, महिला पोलीस नाईक रोहिणी सावंत यांचे पथक भिवंडीतील बाल सुधारगृहातील मुलांकडे पालकांविषयी विचारपूस करीत होते. त्यावेळी निशाने गाझीयाबादमध्ये राहत असल्याची माहिती दिली. या आधारे पथकाने निशाच्या पालकांचा शोध सुरू केला. शाखेने पालकांशी संपर्क साधून निशा ठाण्यात असल्याची माहिती दिली.