कळंबमधून भाजप हद्दपार; पाणजूत ‘बविआ’चा धुव्वा * परिवर्तन पॅनलचे वसईतील सात ग्रामपंचायतीवर वर्चस्व

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वसई तालुक्यातील सात ग्रामपंचायतीच्या निकालांनी राजकीय समीकरणे बदलून टाकली. सत्ताधारी बहुजन विकास आघाडीच्या विरोधात स्थापन झालेल्या परिवर्तन पॅनलने लक्षणीय विजय मिळवला. पाणजू ग्रामपंचायतील बहुजन विकास आघाडीचा सपशेल पराभव झालाय, तर गेल्या ३० वर्षांंपासून कळंब ग्रामपंचातीत सत्तेवर असलेल्या भाजपाचा विरोधी पक्षांनी एकत्र येऊन धुव्वा उडवला.

वसई तालुक्यातील सात ग्रामपंचायतींसाठी सोमवारी मतदान झाले होते. शिवसेना, काँग्रेस, श्रमजीवी संघटना आणि भाजपाने एकत्र येऊन परिवर्तन पॅनल बनवले होते. त्यांनी सत्ताधारी बहुजन विकास आघाडीच्या विरोधात लढत दिली होती. तिल्हेर ग्रामपंचायतीच्या ११ जागांपैकी ७ जागा परिवर्तन पॅनलले जिंकल्या, तर ४ जागा बहुजन विकास आघाडीने जिंकल्या. परिवर्तन पॅनलच्या कुमारी दुमाडा या सरपंचपदी निवडून आल्या. पारोळ ग्रामपंचायतीत बहुजन विकास आघाडीची सत्ता होती. परिवर्तन पॅनलने सात तर बविआने दोन जागा जिंकल्या. परिवर्तन पॅनलचे नरेश तुंबडा हे सरपंचपदी निवडून आले. काँग्रसने तीन जागा जिंकल्या, वसई कॉंग्रेसचे ग्रामीण अध्यक्ष राम पाटील यांचा त्यांच्या पत्नीसह दणदणीत विजय झाला.

नागला ग्रामपंचायीच्या ९ जागांपैकी ६ जागा परिवर्तन पॅनलले जिंकल्या तर  बहुजन विकास आघाडीने ३ जागांवर विजय मिळवला. सरपंचपदी बहुजन विकास आघाडीचे सदाशीव कोदे निवडून आले. मालजीपाडा ग्रामपंचातीच्या ७ जागांपैकी परिवर्तन पॅनलले ३ तर बहुजन विकास आघाडीने ४ जागा जिंकल्या. या ग्रामपंचायतीत बविआच्या पागे या सरपंच म्हणून निवडून आल्या.

पाणजू ग्रामपंचायतीत बहुजन विकास आघाडीचा धुव्वा उडाला. सात जांगापैकी सर्वच्या सर्व जागा परिवर्तन पॅनलले जिंकल्या. परिवर्तन पॅनलमधील भाजपाचे आशिष भोईर हे निवडून आले. करंजोण ग्रामपंचायतीमधील सात जागांपैकी ५ जागा परिवर्तन पॅनलने जिंकल्या, तर बहुजन विकास आघाडीने २ जागा जिंकल्या. शिवसेनेचे प्रकाश सापटे हे सरपंचपदी विजयी झाले. कळंब ग्रामपंचायतीत गेल्या ३० वर्षांपासून भाजपाची सत्ता होती. इतर ग्रामपंचातीच बविआविरोधात परिवर्तन पॅनल असताना या ग्रामपंचायतीत भाजपाला हटवण्यासाठी बविआ, काँग्रेस आणि शिवसेनेची युती झाली होती. या ग्रामपंचायतीमधील १३ जागांपैकी ३ जागेवर बहुजन विकास आघाडी, ३ जागेवर काँग्रेस, ३ जागेवर शिवसेनेचा विजय झाला. भाजपला केवळ २ जागेवर समाधान मानावे लागले. या ग्रामपंचायतीत बहुजन विकास आघाडीचे हरिश्चंद्र घरत हे सरपंच म्हणून निवडून आले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Parivartan panel win gram panchayat elections 2017 in vasai
First published on: 18-10-2017 at 01:29 IST