बांधकामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह; नाल्यावर उद्यान बांधल्याचा प्रकार

भाईंदर : भाईंदर पूर्व परिसरातील साईबाबा नगर परिसरात असलेल्या उद्यानातील पादचारी मार्गच कोसळून खाली वाहत असलेल्या नाल्यात एकरूप झाला आहे. सुदैवाने जीवितहानी झाली नाही.

मीरा-भाईंदर शहराची लोकसंख्या झपाटय़ाने वाढत असल्यामुळे अधिकाधिक उद्याने निर्माण करण्याचे काम पालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधींद्वारे करण्यात येते. परंतु अनेक परिसरातील वास्तूचा अभ्यास न करता  निर्माण करण्यात येणाऱ्या उद्यान व वास्तूंची दुरवस्था होत असल्याचे या प्रकारावरून स्पष्ट होत आहे. भाईंदर पूर्व परिसरातील साईबाबा नगर परिसरात चक्क भल्या मोठय़ा नाल्यावरच स्लॅब टाकून उद्यानाची निर्मिती करण्यात आली होती. मंगळवारी या उद्यानातील स्लॅबसह इतर साहित्यदेखील कोसळून नाल्यात एकरूप होऊन छोटा डोह निर्माण झाला आहे.

या उद्यानात सकाळ आणि संध्याकाळच्या सुमारास अनेक नागरिक हजेरी लावत असतात. मातोश्री आणि श्री साई गणेश सोसायटीच्या मधला हा नाला असून सदर नाल्यावर नगरसेवक निधीतून स्लॅब बांधण्यात आला होता.  नंतर या ठिकाणी सुशोभीकरण करून नाल्यावरच चक्क उपनगराध्यक्ष स्व. दिलीप बाबर यांच्या नावाने उद्यान बांधण्यात आले. परंतु नाल्याच्या स्लॅबच्या कामातील निकृष्ट आणि सदोष बांधकाम तसेच स्लॅबवर सुरू केलेले उद्यान यामुळे सदर स्लॅब कमकुवत होऊन कोसळल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

२५ वर्षांपूर्वी या उद्यानाच्या स्लॅबचे बांधकाम करण्यात आले होते. त्यामुळे आता या उद्यानात नव्याने काम करून लवकरच नागरिकांच्या सोयीकरिता मार्ग मोकळा करून दिला जाईल.

– दीपक खांबित, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग