ठाण्यात पाच रिक्षाचालकांची दंडेली; दोघे ताब्यात
सुट्टे पैसे देण्यावरून झालेल्या वादातून पाच रिक्षाचालकांनी प्रवाशाला बेदम मारहाण केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी गावदेवी भागात घडली. या घटनेनंतर नागरिकांनी एका रिक्षाचालकास चोप देत पोलिसांच्या हवाली केले. मात्र, चार रिक्षाचालक पसार झाले. त्यातील एकास पोलिसांनी नंतर ताब्यात घेतले. या घटनेमुळे रिक्षाचालकांच्या मुजोरीविरोधात प्रवाशांत संताप व्यक्त होऊ लागला आहे.
तुषार म्हात्रे (२७) असे मारहाण झालेल्या प्रवाशाचे नाव आहे. तुषार हे मुंबईतील गोवंडी परिसरात रहातात. ते ठाण्यातील वागळे इस्टेट भागातील एका खासगी कंपनीत काम करतात. या कंपनीच्या परिसरात असलेल्या कामगार रुग्णालयाजवळ शेअर रिक्षांचा थांबा आहे. या थांब्यावरून ते दररोज गावदेवी ते कंपनीपर्यंत प्रवास करतात. नेहमीप्रमाणे मंगळवारी सायंकाळी कामावरून सुटल्यानंतर ते रिक्षा थांब्यावर गेले आणि तेथून गावदेवी परिसरात जाणाऱ्या रिक्षामध्ये जाऊन बसले. त्यानंतर त्यांच्यासोबत अन्य प्रवाशांना घेऊन रिक्षाचालक गावदेवी परिसरात आला. या प्रवासाचे १२ रुपये भाडे देण्यासाठी त्यांनी ५० रुपयांची नोट रिक्षाचालकास दिली. त्यावेळी रिक्षाचालकाने त्यांच्याकडे दोन रुपये सुट्टे मागितले. मात्र, सुट्टे पैसे नसल्याचे त्यांनी चालकास सांगितले. त्यावरून रिक्षाचालकाने त्यांच्याशी वाद घालत त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या अन्य चार रिक्षाचालकांनीही त्यांच्यावर हल्ला चढवून मारहाण सुरू केली.
भररस्त्यात सुरु असलेला हा प्रकार पाहून काही नागरिक तुषार यांच्या मदतीसाठी धावले. चार रिक्षाचालकांनी तेथून पळ काढला तर एक रिक्षाचालकाला मात्र नागरिकांनी पकडले. नागरिकांनी त्याला चोप देत नौपाडा पोलिसांच्या ताब्यात दिले. या प्रकरणी रात्री उशीरापर्यंत नौपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. पोलिसांनी आणखी एका रिक्षाचालकाला ताब्यात घेतले.
पोलीस मूकदर्शक;बहिणीचा आरोप
तुषार यांना मारहाण होत असताना त्याठिकाणी पोलिस उभे होते. मात्र, एकही पोलिस मदतीसाठी धावून गेला नाही, असा आरोप तुषारची बहिण दर्शना गाणार यांनी पत्रकारांशी बोलताना केला.