ठाणे : बनावट कागदपत्रांच्या आधारे बांगलादेशी नागरिकांना भारतात वास्तव्यास ठेवून  त्यांना पारपत्र काढून देणाऱ्या   टोळीला शनिवारी ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली. फारूक मोल्ला (२९), श्रीती मोल्ला ( २६), मोहम्मद खान (३८), मोहम्मद मोल्ला (३६) अशी अटकेत असलेल्या आरोपींची नावे असून पोलिसांनी त्यांच्याकडून बनावट कागदपत्रे, बांगलादेशी सिमकार्ड, डेबिट कार्ड आणि १२ पारपत्रे जप्त केली. पारपत्राच्या आधारे ही टोळी बांगलादेशी महिलांना वेश्या व्यवसायासाठी परदेशात पाठवित असल्याचे समोर आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या युनिट एकने कळवा येथे सापळा रचून फारूक याला ताब्यात घेतले. पोलिसांना त्याच्याकडे काही बनावट कागदपत्रे आणि पारपत्र आढळून आले. त्याची चौकशी केली असता त्याने सुरत येथे राहणाऱ्या श्रीती, मोहम्मद खान, मोहम्मद मोल्ला यांच्या मदतीने काही बांगलादेशी नागरिकांना  भारतात आणुन त्यांना वास्तव्य करण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार करून दिल्याचे उघड झाले.

त्यानंतर गुजरात पोलिसांच्या मदतीने पोलिसांनी श्रीती, मोहम्मद खान आणि मोल्ला यांनाहू ताब्यात घेऊन अटक केली. त्यांची कसून चौकशी केली असता बांगलादेशी महिलांना ही टोळी पारपत्र काढून देत असल्याचे समोर आले. ही टोळी बांगलादेशींना बनावट कागदपत्रांच्या आधारे भारतात वास्तव्यास ठेवतात. त्यानंतर या कागदपत्रांच्या आधारे त्यांचे बँकखाते तयार केले जाते. काही वर्ष हे नागरिक आयकर भरतात. पारपत्रासाठी लागणार्या कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर त्यांना पारपत्र मिळत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या पारपत्राच्या आधारे बांगलादेशी महिला परदेशात वेश्या व्यवसाय करण्यास जात असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Passport gang arrested in bangladesh akp
First published on: 15-08-2021 at 01:01 IST