उपवन परिसरात वेगवेडय़ा मोटारसायकलस्वारांच्या अचाट कसरतींमुळे स्थानिक नागरिक हैराण झाले होते. या संदर्भात ‘लोकसत्ता ठाणे’ मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच वाहतूक पोलिसांनी कारवाई केल्याने मोटारसायकलस्वारांच्या कसरतींना लगाम बसला आहे. ऐन दहावी आणि बारावी परिक्षेच्या तोंडावर उपवनमधील शांतता पुन्हा परतली आहे. यामुळे स्थानिक रहिवाशांनी कारवाईचे समाधान व्यक्त करत लोकसत्ता ठाणेला खूप धन्यवाद दिले आहेत.

    tv05बाईकर्सच्या धिंगाण्यामुळे उपवनच्या शांत आणि निसर्गरम्य परिसरात लहान मुलांना घेऊन फिरायला जाण्यास भीती वाटायची. शनिवार आणि रविवार  या सुट्टीच्या दिवशी बाईकस्वारांचा सर्वाधिक त्रास असायचा. शनिवारी ‘लोकसत्ता ठाणे’ मधून आमची ही समस्या मांडण्यात आली आणि उपवन परिसर अनेक दिवसानंतर ‘बाईकर्स’ मुक्त झाला. उपवन परिसरात मोठय़ा संख्येने येणाऱ्या मोटारसायकलस्वारांमुळे ध्वनीप्रदुषण वाढले आहे. मात्र, कारवाईमुळे आता ते कमी होईल. दहावी-बारावी परिक्षेच्या तोंडावर या प्रकाराला पायबंद बसल्याने परिसरातील विद्यार्थ्यांना त्याचा फायदा झाला आहे.                                   -राजेश गावित, कोकणीपाडा, गावंडबाग

tv06बाईकर्सची बातमी दिल्याबद्दल आम्ही लोकसत्ताचे आभारी आहोत. ‘बाईकर्स’ सोबतच चारचाकी गाडय़ा घेऊन उपवन परिसरात काही तरुण मंडळी येतात. कोकणीपाडाच्या चढणीकडे ही चारचाकी वाहने भरधाव वेगात जातात. अशा चालकांना रोखण्याचा प्रयत्न केला तर ते उन्मत्त वाहनचालक रहिवाशांच्या अंगावर गाडी घालून पळून जातात. त्यांना रोखण्यासाठी वाहतूक पोलीसांनी उपाययोजना कराव्यात अशी आमची मागणी आहे. उपवन परिसरात नवशिकाऊ वाहनचालक मोठय़ा संख्येने येतात. या वाहनचालकांचे गाडीवरील नियंत्रण सुटुन अपघात घडतात. त्यामुळे स्थानिक नागरिक जायबंदी होतात. असे प्रकारही बंद करावेत ही आम्हा रहिवाशांची मागणी आहे.                                     
-अनंत गावित, कोकणीपाडा, गावंडबाग

tv07‘लोकसत्ता ठाणे’ मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच वाहतूक पोलिसांनी ‘बाईकर्स’ विरोधात कारवाई केली. यामुळे लोकसत्ताचे खूप आभारी आहोत. मात्र, ही कारवाई काही दिवसांपुरती मर्यादीत न राहता पुढेही अशाच पद्धतीने सुरू रहावी. अन्यथा ‘नव्याचे नऊ दिवस’ असे या कारवाईचे होऊ नये म्हणून पोलिसांनी ही मोहीम सतत चालू ठेवावी. ठाणे परिवहन उपक्रमाच्या कोकणीपाडा बस थांब्याजवळ वाहतूक पोलिस नेमावेत, अशी स्थानिक रहिवाशांची मागणी आहे. तसेच गेल्यावर्षी उपवन परिसरात घडलेल्या एका अपघातानंतर येथे कायम स्वरुपी पोलीस चौकी उभारण्याची मागणी नागरिकांकडून होत असून तिची पुर्तता अद्याप झालेली नाही.
विलास गावित, कोकणीपाडा, गावंडबाग

tv08बाईकर्सवर अंकूश रहावा आणि सुरक्षा व्यवस्था चोख रहावी याकरिता उपवन परिसरात सी.सी.टिव्ही कॅमेरे बसवावेत, अशी आमची मागणी आहे. तसेच या परिसरातील रस्त्यांवर सलग गतिरोधक बसवावेत. जेणेकरून वेगवेडय़ा मोटारसायकलस्वारांना वेगावर मर्यादा ठेवता येईल.  
 – विशाल गावित, कोकणीपाडा, गावंडबाग

tv09उपवन भागात रस्ता ओलांडणे म्हणजे एकप्रकारचे दिव्यच पार करावे लागते. एकटय़ादुकटय़ा महिलांना या भागात फिरणे ‘बाईकर्स’ च्या धिंगाण्याने अशक्य होते. मात्र, लोकसत्ताच्या वृत्तानंतर कारवाई झाल्याने या बाईकर्सला काहीसा लगाम बसला आहे. यामुळे लोकसत्ताचे धन्यवाद.
-भारती गावित,  कोकणीपाडा, गावंडबाग