मीरा-भाईंदर महापालिकेच्या निर्णयाबाबत आश्चर्य

आपल्या वरिष्ठांना सार्वजनिक ठिकाणी बेधडक अपशब्द वापरा आणि दंड म्हणून एक हजार रुपये भरा, असा अनोखा पायंडा मीरा-भाईंदर महानगरपालिकेत पडला आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यासाठी शिवराळ भाषेचा खुलेआम वापर करणाऱ्या प्रभाग अधिकाऱ्याला शिक्षा म्हणून एक हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

गेल्या वर्षी मीरा रोड येथील एका अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याची मोहीम प्रभाग सहाचे प्रभाग अधिकारी अविनाश जाधव यांनी हाती घेतली होती. या वेळी अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे प्रमुख किरण राठोड हे अधिकारी होते. कारवाई सुरू असताना मोठय़ा संख्येने जमावदेखील जमला होता. राठोड हे अन्य ठिकाणी असल्याने कारवाईच्या स्थळी उपस्थित नव्हते. अचानकपणे अविनाश जाधव यांनी राठोड यांच्या नावे शिव्यांची लाखोली वाहायला सुरुवात केली. जाधव यांचे हे कृत्य उपस्थितांपैकी एकाने आपल्या मोबाइलमध्ये बंदिस्त केले आणि समाजमाध्यमांवर टाकले. अवघ्या काही वेळातच शहरात ते सर्वत्र पसरले.

महापालिका अधिकाऱ्याने भररस्त्यात एवढी खालची पातळी गाठल्याने महापालिकेची सर्वत्र नाचक्की झाली. किरण राठोड यांनी या प्रकरणी जाधव यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही केली, परंतु जाधव यांची इतर विभागांत बदली होण्याव्यतिरिक्त कोणतीही ठोस कारवाई झाली नाही.

त्यानंतर हे प्रकरण विधान परिषदेपर्यंत जाऊन पोहोचले. विधान परिषद सदस्य परिणय फुके यांनी या प्रकरणी अविनाश जाधव यांच्यावर काय कारवाई करण्यात आली, असा तारांकित प्रश्न नुकत्यात पार पडलेल्या विधिमंडळ अधिवेशनादरम्यान उपस्थित केला होता. त्यानंतर मीरा-भाईंदर महानगरपालिकेचे उपायुक्त विजयकुमार म्हसाळ यांनी या प्रकरणी अविनाश जाधव हे दोषी असल्याचे जाहीर केले तसेच त्यांना १ हजार रुपयांचा दंड करण्यात असल्याचे घोषित केले. महापालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याची भर रस्त्यात बदनामी करण्याची अवघी १ हजार रुपयेच शिक्षा असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.