हजार शब्द जे सांगू शकणार नाहीत, त्याच्यापेक्षा अधिक आशय एक समर्पक छायाचित्र सांगू शकते. छायाचित्र हे अतिशय ताकदवान माध्यम आहे. डिजिटल तंत्रज्ञानामुळे छायाचित्रण घराघरात पोचले आहे. पुढील काळातही या क्षेत्राला हौशी आणि व्यावसायिक या दोन्ही क्षेत्रांत उज्ज्वल भवितव्य आहे. हे लक्षात घेऊन ज्ञानसाधना माहाविद्यालयातील बी.एम.एम. विभागाच्या वतीने दर वर्षी जागतिक छायाचित्र दिनानिमित्त ‘पिक्चरेस्क’ या छायाचित्र स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यंदा बुधवार, १९ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या पी. सावळाराम सभागृहात या स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. निसर्ग, रस्त्यावरचे जीवन, कलाकार आदी दर्जेदार विषयांवरील छायाचित्रे या प्रदर्शनात मांडण्यात येणार आहेत. यानिमित्ताने दर्जेदार विषयांची मांडणी छायाचित्रांच्या माध्यमातून केली जाते. छायाचित्रण ही एक कला आहे. केवळ हातात कॅमेरा घेतला म्हणजे छायाचित्रकार होता येत नाही. त्यासाठी विषयाची निवड, कम्पोझिशन, छाया-प्रकाशाचा योग्य वापर आणि अचूक क्षण टिपण्याचे कौशल्य असावे लागते. मात्र या क्षेत्रात मोठय़ा संयमाची गरज असते. आज व्यावसायिक क्षेत्रातही युवकांना मोठी संधी उपलब्ध आहे. यासाठी महाविद्यालयांच्या माध्यमातून पहिले पाऊल पडावे या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महाविद्यालयाचे अध्यक्ष सतीश प्रधान यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे, अशी माहिती प्रा. जितेंद्र हळदणकर यांनी दिली. या वेळी दिग्दर्शक विजू माने, छायाचित्रकार दिनेश पाटील आणि संजीव राणे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

विद्यार्थिनींची हिमोग्लोबीन व एचआयव्ही तपासणी

प्रतिनिधी, बदलापूर
शिक्षणासोबतच विद्यर्थ्यांचे आरोग्यही निरोगी राहावे या हेतूने जीवनदीप शैक्षणिक संस्थेच्या गोवेली महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत महाविद्यालयातील विद्यार्थिनींसाठी हिमोग्लोबीन आणि एचआयव्ही तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. गोवेली ग्रामीण रुग्णालय आणि गोवेली महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडलेल्या या शिबिराचा महाविद्यालयातील ५०० हून अधिक विद्यार्थिनींनी लाभ घेतला. महाविद्यालयातर्फे शिक्षणासोबतच विद्यार्थिनींच्या आरोग्याकडेही लक्ष देणे आमचे कर्तव्य आहे, असे मत शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष रवींद्र घोडविंदे यांनी व्यक्त केले. या वेळी गोवेली महाविद्यालयाचे प्राचार्य के. बी. कोरे, गोवेली ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. राजश्री साहणीकर, डॉ. मंगला पवार, कार्यक्रम अधिकारी प्रा. भाग्यश्री पवार आणि महाविद्यालयाचा प्राध्यापकवर्ग आणि रुग्णालयाचे कर्मचारी उपस्थित होते.

भ्रूणहत्येविरोधात महाजागर

प्रतिनिधी, ठाणे</strong>
गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला विद्या प्रसारक मंडळाच्या बांदोडकर विज्ञान महाविद्यालयात ‘भ्रूणहत्या’ या विषयावर जागर जाणिवांचा अभियानांतर्गत एका प्रबोधनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. माधुरी पेजावर यांनी ‘भ्रूणहत्या’ रोखण्यासंदर्भात जीवशास्त्रीय तत्त्वज्ञानाचा आधार घेत श्रोत्यांना दृक्श्राव्य माध्यमातून समाजातील दाहक वास्तवाचा परिचय करून दिला.
‘जागर जाणिवांचा- अभियान २०१५’चे उद्घाटनपर व्याख्यानाचे पहिले पुष्प गुंफताना डॉ. माधुरी पेजावर यांनी भ्रूणहत्येविषयीची माहिती उपस्थितांना दिली. ‘भ्रूण तयार होताना, घडताना त्याला असंख्य दिव्य परीक्षांमधून तावून सुलाखून जावे लागते. शरीरांतर्गत अतिसूक्ष्म अशा पेशी-पेशिका, विविध स्राव, जनुके, गुणसूत्रे या सर्वाचा संयोग होऊन मातेच्या उदरात एक जीव आपला आपणच आकार घेत असतो व काही ठरावीक कालावधीनंतर आपल्या या भौतिक विश्वात पदार्पण करतो,’ असे सांगून ‘मग आपण मुलगा-मुलगी असा भेद करून जीवाची हत्या का करतो,’ असा सवाल त्यांनी उपस्थित केला. निसर्गनियमामध्ये ढवळाढवळ करणारे व संकुचित मानसिकता बाळगून खोटी प्रतिष्ठा प्राप्त करून घेणारे आपण जैविक, सामाजिक आणि नैतिक जबाबदारी मानणार आहोत की नाही, असा परखड प्रश्नही त्यांनी केला.
भ्रूण तयार होण्यापासून तो आईच्या उदरामध्ये वाढताना व नंतर जन्म घेताना कोणकोणत्या अवस्थांमधून जातो याचे या वेळी दृक्श्राव्य माध्यमातून दर्शन घडवण्यात आले. दीड तास चालू असणाऱ्या या ‘दृक्श्राव्य माध्यमाची’ जादू पतंजली सभागृहातील अडीचशे विद्यार्थी, शिक्षकेतर सहकाऱ्यांनी अनुभवली. ‘जागर जाणिवांचा अभियाना’चे या वेळी औपचारिक उद्घाटन झाले व या प्रसंगी भौतिकशास्त्र विभागाच्या सहयोगी प्राध्यापिका संगीता मेश्राम यांनी छोटय़ाशा प्रस्तावनेस ‘जागर गीताने’ सर्वाना भारावून टाकले व मुलींमध्ये स्त्री-अभिमानजागृती केली. विद्या प्रसारक मंडळाचे बांदोडकर विज्ञान महाविद्यालय हे अशा प्रकारच्या सर्जनशील व्याख्यानाचे नेहमीच आयोजन करीत असते, अशी माहिती अभियानाचे समन्वयक प्रा. अनिल आठवले व प्रा. बिपिन धुमाळे यांनी दिली.

संकलन: श्रीकांत सावंत

अग्रवाल महाविद्यालयात जागतिक ग्रंथालय दिन

प्रतिनिधी, ठाणे
कल्याणच्या के. एम. अग्रवाल महाविद्यालयात गुरुवारी जागतिक गं्रथालय दिनाचे औचित्य साधून एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ग्रंथालयशास्त्राचे जनक डॉ. शियाली रामामृत रंगनाथन यांचा १२ ऑगस्ट हा जन्मदिवस जागतिक ग्रंथालय दिन म्हणून साजरा केला जातो. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना या दिवसाचे महत्त्व कळावे, रंगनाथन यांच्या कार्याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती मिळावी यासाठी के. एम. अग्रवाल महाविद्यालयाच्या ग्रंथालयातर्फे दर वर्षी हा कार्यक्रम आयोजित केला जातो.
याप्रसंगी आयटी, बी.एम.एस. यांसारख्या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना ग्रंथालयातर्फे एकाच वेळी अभ्यासक्रमाच्या पुस्तकांचा संच देण्यात आला. कार्यक्रमासाठी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. अनिता मन्ना आणि ग्रंथपाल आशीष कमाविसदार उपस्थित होते. डॉ. रंगनाथन यांनी १९२८ मध्ये ग्रंथशास्त्राचे पाच सिद्धांत सांगितले. तसेच ग्रंथालयात आवश्यक असणाऱ्या कृत्रिम वर्गीकरण प्रणालीचा (कोलन वर्गीकरण) विकास रंगनाथन यांनी केला. ग्रंथालयशास्त्रात त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल रंगनाथन यांना भारत सरकारतर्फे १९५७ मध्ये रावसाहेब आणि पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

इतिहास दस्तऐवजावर आधारित असावा!’

प्रतिनिधी, कल्याण</strong>
इतिहासलेखनासाठी संशोधन, लेखन, विश्लेषण आणि भाष्य ही चार सूत्रे आवश्यक असून ‘दस्तऐवज नसेल तर इतिहासही नाही’ असा शास्त्रशुद्ध पद्धतीने इतिहासाचा अभ्यास व्हायला हवा, असे मत निवृत्त पुराभिलेख संघाचे संचालक भास्कर घाटावकर यांनी येथे व्यक्त केले.
कल्याण येथील मुथा महाविद्यालयामध्ये इतिहासलेखनातील नवीन विचारप्रवाह या राज्यस्तरीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. व्यासपीठावर बिर्ला महाविद्यालयाच्या उपप्राचार्य स्वप्ना समेळ, प्रगती महाविद्यालयाच्या प्रा. मानसी भागवत, डॉ. किरण चव्हाण, प्रा. शहाजी कांबळे, प्रवीण बोरकर, जितेंद्र भामरे, मुथा महाविद्यालयाचे प्रकाश मुथा, प्रा. श्रुती वाईकर आदी मान्यवर उपस्थित होते. ‘स्त्रीवादी लेखनामध्ये महात्मा फुले यांचे योगदान’ या विषयावर प्रा. सुनील सूर्यराव यांनी संशोधनपत्र सादर केले. इतिहास विभागाच्या प्रमुख प्रा. कविता मते यांनी ‘उपेक्षित इतिहास हा’ निबंध सादर केला.

युवा महोत्सवात कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाची बाजी

प्रतिनिधी, ठाणे
मुंबई विद्यपीठातर्फे आयोजित करण्यात आलेल्या युवा महोत्सवामध्ये ठाण्यातील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाने ‘स्किट’मध्ये द्वितीय क्रमांक पटकावला आहे. या स्पर्धेमध्ये ठाणे परिसरातील चाळीसहून अधिक महाविद्यालयांनी सहभाग नोंदवला होता. वागळे इस्टेटमधील मुलांमध्ये उच्च शिक्षणाबरोबर कलाही जोपासण्याचा प्रयत्न नेहमीच या महाविद्यालयातर्फे केला जातो आणि याच प्रयत्नांना युवा महोत्सवाच्या माध्यमातून आज यशाची जोड मिळाली, असे मत संस्थेचे अध्यक्ष सचिन मोरे यांनी व्यक्त केले.
कुटुंबात कोणतेही नाटकाचे वातावरण नसतानाही किंबहुना घरातून विरोध असताना मोठय़ा जिद्दीने व अथक प्रयत्नांनी विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल प्राचार्य संतोष गावडे यांनी समाधान व्यक्त केले. अस्मित शिगवण, गौरव बोले, अजय विश्वकर्मा, अंकिता काचोळे, भैरवी गोरेगावकर व आरती माहीमकर या विद्यार्थ्यांनी दिग्दर्शक राहुल इंगळे व संदीप लबडे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘इमोशनल अत्याचार’ हे स्किट सादर केले.
महाविद्यालयाच्या स्थापना दिनी रक्तदान
अंबरनाथ : अंबरनाथच्या साऊथ इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या महाविद्यालयाच्या स्थापना दिनानिमित्त १० ऑगस्ट रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाच्या एन.एस.एस. विभागातर्फे आयोजित केलेल्या या शिबिराचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. महाविद्यालयातील ६० विद्यार्थ्यांसह शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी हे या शिबिरात सहभागी झाले होते. महाविद्यालयाच्या स्थापना दिनानिमित्त ग्रंथालयातर्फे पुस्तकप्रदर्शनदेखील आयोजित केले गेले होते. यामध्ये सुमारे अडीच हजार पुस्तके ठेवण्यात आली होती. विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनालाही भेट दिली. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी भविष्याचा विचार करून संघटित होऊन कृती करावी, असा सल्ला सेंट्रल मरीन फिशरी रिसर्च इन्स्टिटय़ूटचे प्राचार्य डॉ. वीरेंद्र सिंह यांनी केले. एस. आय. सी. ई. एस. पदवी महाविद्यालयामध्ये विज्ञान विभाग सुरू करण्यात आला. त्याचे उद्घाटन करताना डॉ. सिंह यांनी वरील सल्ला दिला. संस्थेचे अध्यक्ष एम. एस. नायर, प्रा. डॉ. पाटील यांचीही या वेळी भाषणे झाली. प्रा. डॉ. डी. एम. सपकाळ यांनी आभार मानले.
भारतीय फुलपाखरांची विविधता
ठाणे : फुलपाखरांकरिता आपल्या जीवनातील अनेक वर्षे कारणी लावणाऱ्या डॉ. आयझ्ॉक किहिमकर, उपसंचालक बीएनएचएस यांचे ‘भारतीय फुलपाखरांची विविधता’ या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. आपल्या सादरीकरणात त्यांनी फुलपाखरांच्या विविध प्रजातींची छायाचित्रे व त्यांच्या अस्तित्वाची ठिकाणेदेखील नमूद केली.