सागर नरेकर
अंबरनाथ : अंबरनाथ शहरात प्रस्तावित असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या उभारणीसाठी फेब्रुवारी महिन्यात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या १५२ व्या बैठकीत महाविद्यालयासाठी जागेचे आरक्षण बदलाचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर मार्च महिन्याच्या अखेरीस शासकीय वैद्यकीय महाविद्यालयसाठी आवश्यक ११ हेक्टर जागेवरील आरक्षण बदलण्याच्या निर्णयावर नागरिकांकडून सूचना व हरकती मागवण्यात आल्या आहेत. येत्या २१ एप्रिलपर्यंत या सूचना व हरकती नोंदवल्या जातील.
अंबरनाथ आणि परिसर मोठय़ा प्रमाणावर विकसित होत असून येथे आरोग्य सुविधा मर्यादित आहेत. रुग्णांना पुढील उपचारासाठी मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे शहरांत जावे लागते. अंबरनाथ शहरात राज्य शासनाच्या अखत्यारीतील उपजिल्हा रुग्णालय अद्ययावत होण्याच्या मार्गावर आहे. करोनाच्या संकटात येथील आरोग्य सुविधांची कमतरता अधिक जाणवली.
स्थानिक खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि आमदार डॉ. बालाजी किणीकर वैद्यकीय क्षेत्रातील असल्याने त्यांनी यात लक्ष देऊन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची मागणी राज्य शासनाकडे केली होती. गेल्या वर्षांत वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी या महाविद्यालयाला मंजुरी दिल्यानंतर राज्याच्या वैद्यकीय शिक्षण सहसंचालकांनी अंबरनाथ शहरातील सव्‍‌र्हे क्रमांक १०२ पैकी, १०३ पैकी, १०४, १०६ पैकी व १६६ पैकी ११ हेक्टर क्षेत्र वैद्यकीय महाविद्यालयासाठी आरक्षित करण्याची मागणी केली होती. हा प्रस्ताव पुढे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या १५२ व्या बैठकीत सादर करण्यात आला होता.
या बैठकीत अंबरनाथ, कुळगाव-बदलापूर आणि परिसर या अधिसूचित क्षेत्राच्या मंजूर विकास योजनेतील अंबरनाथ नगर परिषद हद्दीत येणाऱ्या आरक्षण क्र. १८० सार्वजनिक उद्यान हे ११ हेक्टर क्षेत्र महाराष्ट्र शासन वैद्यकीय शिक्षण विभाग या नावे आरक्षित करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. या आरक्षण बदलाला मंजुरी मिळताच याबाबत जनतेकडून सूचना व हरकती मागविण्याची प्रक्रिया २२ मार्च रोजी एमएमआरडीएकडून सुरू करण्यात आली आहे. ३० दिवस अर्थात येत्या २१ एप्रिलपर्यंत नागरिकांकडून या सूचना व हकरती स्वीकारल्या जाणार आहेत.
सूचना सादर करण्याची ठिकाणे
एमएमआरडीएच्या नगर रचना विभागप्रमुख यांचे कार्यालय, एमएमआरडीएचे वरिष्ठ नियोजक, ठाणे जिल्हाधिकारी आणि अंबरनाथ नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांच्याकडे मंजूर विकास योजना आणि नकाशा निरीक्षणासाठी ठेवण्यात आला आहे. या आरक्षणबदलावर सूचना व हरकती सादर करायच्या असल्यास त्या एमएमआरडीएच्या ठाण्यातील उपप्रादेशिक कार्यालयात कराव्या लागणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Plot reservation change process underway medical college ambernath mumbai metropolitan region development authority amy
First published on: 13-04-2022 at 01:46 IST