कल्याण डोंबिवलीतील वाहतूक कोंडी दिवसेंदिवस वाढत असल्याने शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी महापालिका प्रशासनाने वाहतूक पोलिसांच्या सहकार्याने प्रयत्न सुरू केले आहेत. वाहतुकीत सुसूत्रता कशी आणता येईल, यासाठी येथील रहिवाशांची एक समिती स्थापन करावी आणि या समितीच्या माध्यमातून वाहतूक नियोजनाचा आढावा घेतला गेल्यास हा प्रश्न सोडविता येऊ शकतो, असा विश्वास पोलीस आयुक्त विजय कांबळे यांनी व्यक्त केला.
कल्याण डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर परिसरांतील वाहतूक समस्येवर विचार करण्यासाठी ठाणे पोलिसांनी एका बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला सहआयुक्त व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण, वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्त डॉ. रश्मी करंदीकर, कल्याण डोंबिवली महापालिकेतर्फे शहर अभियंता पाटीलबुवा उगले, कार्यकारी अभियंता दीपक भोसले, परिवहन विभागाचे साहाय्यक निरीक्षक संदीप भोसले उपस्थित होते.
* कल्याण रेल्वे स्थानकाबाहेर असलेल्या आगारातून बसची ये-जा होत असताना वाहतुकीची सर्वाधिक कोंडी होते. त्यामुळे बस आगाराबाहेर जाण्यासाठी आर्चिस इमारतीकडील नाल्यावर दुसरे प्रवेशद्वार ठेवावे.
* बससाठी दोन स्वतंत्र मार्ग राहिल्याने मुख्य रस्त्यावर वाहतूक कोंडी होणार नाही. यासाठी परिवहन विभागाला दुसरे प्रवेशद्वार तयार करण्यासाठी सूचित करण्यात येणार आहे.
* शहरात १६ वर्षांहून अधिक काळ झालेल्या रिक्षा धावत आहेत. त्या प्रथम भंगारात काढाव्यात. या रिक्षा वाहतुकीतील मोठा अडथळा आहेत. सकाळ, संध्याकाळ शहरातील काही रस्ते, चौक वाहतूक मुक्त केले तर कोंडी सुटण्यास साहाय्य होईल,
* कल्याण, डोंबिवलीत महापालिकेचे सिमेंटचे रस्ते तसेच खोदाई सुरू असलेल्या ठिकाणी प्रत्येक ठेकेदाराने दोन वाहतूक सेवक नेमावेत. महापालिकेने या कामासाठी ५० वाहतूक सेवक द्यावेत.
* कल्याण, डोंबिवली रेल्वे स्थानक भागांतील फेरीवाले हटविण्यासाठी पालिकेच्या अतिक्रमण विभागाने दिवसभर कारवाई करावी. रेल्वे स्कायवॉकवरील फेरीवाले हटवावेत. या कारवाईत महापालिकेकडून सातत्य राहिले तर वाहतूक कोंडी होणार नाही.