बदलापूर नगरपालिकेच्या निवडणुकांनी यंदा फार वेगळे वळण घेतले असून बदलापुरातले राजकारण दिवसेंदिवस हे महत्त्वाकांक्षी व खुनशी होत चालले आहे. नुकतेच एका भाजप कार्यकर्त्यांने राजकीय फायद्यासाठी शिवसेना उपशाखाप्रमुखाची हत्या केली. त्यामुळे शहरातील वातावरण गढूळ झाले आहे. त्यातच माजी उपनगराध्यक्ष व राष्ट्रवादीचे उमेदवार आशीष दामले व शिवसेना पुरस्कृत अपक्ष उमेदवार व विद्यमान नगरसेवक प्रभाकर पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या झटापटीमुळे निवडणुकीचे वातावरण पुन्हा गढूळ झाले आहे. त्यामुळे या निवडणूकांच्या पाश्र्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे ही कायदा व सुव्यवस्था धोक्यात येऊ नये म्हणून पोलिसांनी प्रतिबंधात्मक पावले उचलली आहेत.
उमेदवारांना पोलीस संरक्षण
राजकीय पक्षाच्या अनेक उमेदवारांनी पोलीस संरक्षणाची मागणी केली असून अपक्ष उमेदवार प्रभाकर पाटील, राष्ट्रवादीचे उमेदवार आशीष दामले, भाजप उमेदवार किरण भोईर, शिवसेनेचे श्रीधर पाटील आदी बदलापूर पश्चिमेकडील तर, पूर्वेकडे शिवसेनेचे वामन म्हात्रे, प्रकाश मरगज, साक्षी भोसले तर भाजपच्या अविनाश पातकर, सूरज मुठे आदी उमेदवारांना स्टेनगनधारी पोलीस अंगरक्षक देण्यात आले आहेत.
पोलिसी कारवाईला वेग
निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून आत्तापर्यंत १४४ (१) नुसार १२ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या असून बदलापूर पश्चिमेला शस्त्र परवानाधारकांची ४८ शस्त्रे जमा करण्यात आली आहेत. बदलापूर पूर्वेला ४२ परवानाधारकांची शस्त्रे जमा करण्यात आली आहेत. तसेच येथे ३४ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या असून कलम १४९ प्रमाणे ५४ लोकांना नोटिसा बजविण्यात आल्या आहेत. तसेच १५ जणांवर दोन दिवसांसाठी शहरबंदी लागू करण्यात येणार आहे.
संवेदनशील प्रभाग
बदलापूर पश्चिमेकडे प्रभाग क्रमांक ७, ८ व ९ तसेच बदलापूर पूर्वेकडे प्रभाग क्रमांक २६, २७, ३५, ३६, १५, ३७, ४१, ४२, ४४, ४७, ३४ व ३८ आदी प्रभाग संवेदनशील करावे असे पोलिसांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना सुचविले असून अद्याप हे प्रभाग संवेदनशील असल्याचे घोषित झालेले नाही. निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर बदलापुरात पोलीस शहरातील प्रत्येक घडामोडींवर लक्ष ठेवून असून शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात येणार आहे. अवैध शस्त्रे, शस्त्र वाहतूक व पसे वाटपासारख्या प्रकारांना आळा घालण्यासाठी अचानकपणे नाकाबंदी करण्यात येणार असून काळ्या काचा असलेल्या गाडय़ांवर विशेष लक्ष देण्यात येणार असल्याचे बदलापूर पूर्वेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ईश्वर आंधाळकर यांनी स्पष्ट केले.