गेल्या वर्षभरात रेल्वे अपघातात तसेच नैसर्गिकरीत्या मृत पावलेल्या १०० हून अधिक बेवारस मृतदेहांची अद्याप ओळख पटलेली नसून त्यांच्या नातेवाईकांचा शोध घेण्यासाठी ठाणे लोहमार्ग पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेकरिता मृत पावलेल्या व्यक्तींच्या फोटोंचा अल्बम तयार करण्यात आला असून ठाणे रेल्वे स्थानकात सोमवारी सुमारे शंभरहून अधिक नागरिकांनी या छायाचित्रांची पाहणी केली. मात्र, त्यात एकाही मृतदेहाची अद्याप ओळख पटू शकलेली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा आणि ऐरोली आदी स्थानके ठाणे रेल्वे पोलिसांच्या हद्दीत येतात. गेल्या वर्षी या हद्दीमध्ये रेल्वे अपघातात तसेच नैसर्गिकरीत्या मृत पावलेल्या सुमारे १०३ मृतदेहांची अद्याप ओळख पटलेली नाही. याशिवाय, यंदाच्या वर्षांत अशाच प्रकारे १२ मृतदेहांचेही वारसदार अद्याप सापडलेले नाहीत. नातेवाईक सापडत नसल्यामुळे शासकीय नियमांची पूर्तता करून पोलिसांनी या मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले आहेत. मात्र, मृत पावलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना याविषयी माहिती मिळावी म्हणून ठाणे लोहमार्ग पोलिसांनी वारस शोधमोहीम हाती घेतली आहे. मृतदेहांचे फोटो नातेवाईक किंवा ओळखीच्या व्यक्तींच्या नजरेत पडले तर त्या मृतदेहाचे वारसदार सापडू शकतात, असे पोलिसांना वाटते. यामुळे या मोहिमेकरिता गेल्या वर्षभरात आणि यंदाच्या वर्षांत मृत पावलेल्या सुमारे ११५ बेवारस मृतदेहांच्या फोटोंचा अल्बम पोलिसांनी तयार केला असून हा अल्बम सोमवारी ठाणे स्थानक परिसरात नागरिकांना पाहण्यासाठी ठेवण्यात आला होता. सुमारे शंभरहून अधिक नागरिकांनी अल्बममधील एक-एक फोटोचे निरीक्षण केले, मात्र त्यामध्ये एकाही मृतदेहाचे नातेवाईक सापडलेले नाहीत. यामुळे ठाणे स्थानकापाठोपाठ कळवा, मुंब्रा, दिवा आणि ऐरोली स्थानकातही अशाच प्रकारे फोटो अल्बम दाखविण्याची योजना हाती घेण्यात आली आहे, अशी माहिती लोहमार्ग पोलिसांनी दिली.