‘आंबिवलीजवळील इराणी वस्तीत कारवाईसाठी जायचे आहे’ असा संदेश पोलिसांना मिळाला की पोलिसांना पण धस्स व्हायचे आणि पोलीस कारवाईसाठी येणार याची खबर इराणी वस्तीमधील रहिवाशांना मिळाली की येथील रहिवासी आक्रमक भूमिका घेऊन प्रतिकार करण्यासाठी सज्ज व्हायचे. वर्षांनुवर्षांचे हे इराणी वस्तीमधील दृश्य.
कल्याणजवळील आंबिवली येथील इराणी वस्ती ही नेहमीच वाद्ग्रस्त आणि चर्चेचा विषय राहिली आहे. ठाणे, मुंबई, भिवंडी, कल्याण, डोंबिवली परिसरात चोऱ्या करायच्या आणि इराणी या सुरक्षित वस्तीत येऊन राहायचे. या ठिकाणी पोलीस ससेमिरा करीत आले तरी, थेट गुन्हेगाराचा पाठलाग करीत वस्तीत घुसण्याची पोलिसांनी कधीच हिंमत केली नाही. अनेक वेळा फौजफाटा घेऊन या वस्तीमधील गुन्हेगारांना पकडण्याचे प्रयत्न वेळोवेळी पोलिसांकडून करण्यात आले. परंतु, पोलीस आले की, या वस्तीमधील महिला मोठय़ा संख्येने पुढे येऊन पोलिसांना प्रतिकार करण्यासाठी सज्ज राहत असत.
ठाण्यापासून इराणी वस्ती अध्र्या तासावर, कल्याण डोंबिवलीपासून १५ मिनिटावर. त्यामुळे चोरी केली की लपायच्या ठिकाणी दहा मिनिटात पोहचण्याची सोय. महिलेच्या गळ्यातील ऐवज चोरीस गेला की गुन्हेगारांचा चेहरा दिसण्याची सोय नव्हती. पाठीमागून यायचे आणि गळ्याला हिसका देऊन पळायचे ही चोरीची पद्धत. वर्षांनुवर्ष या गुन्हेगारांच्या मागे किती पळायचे असा विचार शासन पातळीवर झाला. पोलीस महासंचालकांच्या एका बैठकीत इराणी गुन्हेगारांचे मन परिवर्तन करता येईल का असा विचार करण्यात आला. ठाणे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी त्या दृष्टीने विचार करण्यास सुरुवात केली. कल्याण परिमंडळाचे पोलीस उपायुक्त संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सोनसाखळी चोरी रोखण्यासाठी एक पथक स्थापन करण्यात आले. हे पथक सोनसाखळी चोरीची घटना, त्याचा मागोवा, आरोपीचा ससेमिरा करण्याच्या मागे लागत असे.
इराणी वस्तीमधील गुन्हेगारांसह तेथील वस्तीचे मनपरिवर्तन करण्याचा, त्यांना गुन्हेगारी विश्वातून बाहेर आणण्याचा निर्धार पोलीस आयुक्तांनी केल्यानंतर उपायुक्त जाधव, त्यांचे पथक नियमित या वस्तीमध्ये जाऊ लागले. त्या ठिकाणी आरोपी लपले असतील तर त्यांना अटक करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करू लागले. जे निदरेष आहेत. त्यांना तात्काळ सोडण्यात येऊ लागले. पोलिसांनी इराणी वस्तीमधील रहिवाशांशी संवाद, आरोपींना पकडण्याचे निमित्त करून येजा वाढवली. तेथील रहिवाशांशी संवाद साधण्यास सुरुवात केली.
गुन्हेगार मुलांच्या पालकांशी संवाद साधला. त्यांना तुम्ही किती काळ असे गुन्हेगारीवर मिळणाऱ्या ऐवजातून उपजीविका करणार. गुन्हेगारी पाश्र्वभूमीमुळे संपूर्ण घर उद्ध्वस्त होते. घरात सततची अस्वस्थता, मुलांना शिक्षण नाही. ही अस्वस्थता कायमची घालविण्यासाठी आपण नियमित दोन पैसे मिळतील यासाठी किरकोळ वस्तू विक्रीचे दुकान टाका, शाळेजवळ शालेय वस्तूंचे दुकान काढा, पोळी भाजी केंद्र सुरू करा. या माध्यमातून तुम्हाला दोन पैसे मिळतील. सतत बाहेरच्या पैशावर राहण्याची वेळ येणार नाही, असे पोलिसांनी इराणी वस्तीमधील रहिवाशांना सांगण्यास सुरुवात केली.
आपली मुले गुन्हे करतात म्हणून पोलीस त्यांना पकडण्यासाठी येतात. अन्यथा, पोलिसांचा विचार किती चांगला आहे. ते आपल्या कुटुंबाची उन्नती व्हावी असाच विचार करीत आहेत, हा विचार इराणी वस्तीमधील रहिवासी करू लागले. पोलिसांनी जुळवाजुळव करून वस्तीमधील गुन्हेगारी पाश्र्वभूमी असलेल्या निर्दोष सुटलेल्या तरुणांना वस्तीत गोळ्या बिस्कीट, अत्यावश्यक वस्तूंची दुकाने सुरू करून दिली. जेणेकरून हे तरुण गुन्हेगारी करण्यापेक्षा नियमित आपल्या दुकानात बसून राहतील. हा यामागील उद्देश. इराणी वस्तीत चूल कधी पेटवली जात नाही. बाहेरून जे काही आणले जाईल त्यावरच उपजीविका करायची. पोलिसांनी हा प्रकार बंद करण्यासाठी वस्तीमधील महिलांना पोळी भाजी केंद्र सुरू करण्यासाठी प्रोत्साहित केले. एका महिलेने पोलिसांच्या सूचनेवरून हे केंद्र सुरू केले आहे. वस्तीमधील रहिवासी रास्त दरात या पोळी भाजी केंद्रावर येऊन भोजन करतात. या केंद्राचे महत्त्व वाढावे म्हणून पोलीसही मुद्दाम या पोळी भाजी केंद्रात येऊन पैसे देऊन भोजन करतात. पोलिसांची ही विधायक भूमिका पाहून इराणी वस्तीमधील रहिवाशांचे मन परिवर्तन होण्यास सुरुवात झाली आहे. एरव्ही पोलीस इराणी वस्तीच्या बाहेर गेले की शंभरहून अधिक महिला प्रतिकार करण्यासाठी सज्ज राहायच्या. तो प्रकार बंद झाला आहे. जो कोणी आरोपी असेल त्याचाच पोलीस वस्तीत शोध घेऊ लागले आहेत. जे निर्दोष तरुण या भागात फिरतात त्यांना रोजगाराचे साधन तयार करण्याच्या दृष्टीने पोलिसांनीच हालचाली सुरू केल्या आहेत.
इराणी वस्तीमध्ये शिक्षण, रोजगाराचे साधन तयार करून देणे हे पोलिसांनी मुख्य उद्दिष्ट ठरविले आहे. वस्तीमधील गुन्हेगारांच्या छावण्या कायमच्या बंद करून नवीन पिढीला शिक्षित करून नोकरी, रोजगाराच्या प्रवाहात आणण्यात येणार आहे. एकदा येथील पीढी शिकली की या भागातील गुन्हेगारीचे अड्डे हळूहळू कमी होतील अशी पोलिसांची धारणा आहे. या वस्तीमधील काही खतरनाक गुन्हेगार फरार आहेत. त्यांच्या मागावर पोलीस आहेतच, पण त्यांच्यामुळे आता नवीन पिढी बिघडू नये या दृष्टीने पोलिसांनी हालचाली सुरू केल्या आहेत.
– भगवान मंडलिक