बेस्टमधून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यासह सहा-सात जणांची फसवणूक करणाऱ्या आरोपी महिलेची कल्याण बाजारपेठ पोलीस पाठराखण करीत असल्याचा आरोप होत असून गुन्हा दाखल होऊन दहा दिवस उलटूनही अटक का होत नाही, असा सवाल तक्रारदार करीत आहेत. बाजारपेठ पोलिसांच्या या कृतीविषयी ठाणे पोलीस आयुक्तांकडे तक्रार करण्यात येणार आहे, असे तक्रारदारांनी सांगितले.
प्रकाश तिकवडे हे पत्नी वंदना व दोन मुलांसह खडकपाडा येथील कशीश पार्कमध्ये राहतात. वंदना तिकवडे यांच्या जयश्री बांगर गेल्या अनेक वर्षांपासून परिचित असून बांगर यांनी कल्याणमधील बेतुरकर पाडय़ातील त्रिवेणी रेसिडेन्सी येथे राहणाऱ्या अलका प्रकाश कुटे यांच्या दामदुप्पट गुंतवणूक योजनेविषयीची माहिती वंदना यांना दिली.
आपण या गुंतवणूक योजनेत ६० हजारांच्या पटीत पैसे गुंतवले तर गुंतवणूकदारास सहा लाखापर्यंत लाभ मिळतो. तसेच, दरमहा ६० हजार मुद्दल व १० हजार रुपये व्याज मिळते, दरमहा ७० हजार रुपये मिळतात असे आश्वासन दिले.
सहा लाखांची रक्कम तिकवडे कुटुंबीयांनी ती कुटे दाम्पत्याच्या गुंतवणूक योजनेत गुंतवली. डिसेंबर २०१५ मध्ये हा सगळा कागदोपत्री व्यवहार झाला.
कुटे दाम्पत्याकडून मिळालेल्या आश्वासनाप्रमाणे महिन्याचा ७० हजाराचा हप्ता तिकवडे दाम्पत्याला मिळाला.ोाचवेळी अलका कुटे यांनी तक्रारदार वंदना तिकवडे यांना आणखी गुंतवणुकीचे आमिष दाखवून तीन लाख रुपये एका योजनेत भरण्याची मागणी केली. त्यावर विश्वास ठेवून वंदना यांनी ती रक्कम अलका यांना दिली.
मार्च २०१६ नंतर अलका कुटे या वंदना यांना ७० हजारांची मुद्दल, व्याजाची रक्कम देण्यास टाळाटाळ करू लागल्या. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर तिकवडे दाम्पत्याने बाजारपेठ पोलीस ठाण्यात अलका कुटे व प्रकाश कुटे या दाम्पत्याविरुद्ध तक्रार दाखल केली.
आर्थिक फसवणुकीचा गुन्हा असल्याने पोलिसांनी कुटे दाम्प्त्याला तात्काळ अटक करणे आवश्यक असूनही अद्याप या दाम्पत्याला ताब्यात घेण्यात आलेले नाही, असे तक्रारदारांनी सांगितले.