पैtvlog03से कमाविणे हे प्रत्येकाचेच ध्येय असते. पण सध्याच्या आधुनिक युगात झटपट पैसा मिळावा, अशीच आजकालच्या तरुणांची आशा असते. मग हा पैसा मिळविण्यासाठी काहीही करण्याची त्यांची तयारी असते. काहीही..अगदी गुन्हाही! मग या गुन्ह्याची चटक लागली तर गुन्ह्यामागून गुन्हे घडतात आणि गुन्हे विश्वात या तरुणांचा दबदबा निर्माण होतो.. मग सराईत झालेले हे गुन्हेगार पोलिसांनाही सहज गुंगारा देऊ शकतात. पण चाणाक्ष पोलिसांपुढे त्यांना हात टेकवावे लागतात आणि त्यांच्या गुन्हे विश्वाचा चक्काचूर होतो..विनोद ऊर्फ बिंदे कमलेश्वर यादव (४४) या सराईत गुन्हेगाराची कहाणीही अशीच काहीशी..
विनोद यादव मूळचा उत्तर प्रदेशातील आझमगड जिल्ह्य़ाचा रहिवासी. या जिल्ह्य़ातील चक्रवारा हे त्याचे गाव. सुमारे १८ वर्षांपूर्वी झटपट पैसे कमाविण्याच्या नादात त्याने गुन्हेगारी विश्वात पाऊल टाकले आणि मागे वळून पाहिलेच नाही. पैशासाठी वाटेल ते काम तो करू लागला, अगदी खूनही. हळूहळू त्याने स्वत:ची टोळी तयार केली आणि त्या माध्यमातून दहशत माजवू लागला. खून, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, शस्त्र बाळगणे आदी गुन्ह्यांची नोंद आणि गुंडा कायद्याखाली (महाराष्ट्र मोक्का कायद्याप्रमाणे) त्याच्याविरोधात उत्तर प्रदेशातील विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले. या प्रकरणात पोलिसांनी त्याच्यावर अटकेची कारवाई केली. गुंडा कायद्याखाली त्याच्याविरोधात दोनदा कारवाई झाली. पण, त्याचा त्याच्यावर काहीच परिणाम झाला नाही. उलट गुन्हेगारी विश्वात त्याच्या नावाचा दबदबा आणखी वाढला.  
आझमगड जिल्ह्य़ातील देवईत उष्मापूर गावात राहणारे श्रीपत यादव हे बाजार घेऊन मोटारसायकलने घरी परतत असताना ६ फेब्रुवारी २०१५ रोजी त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. नवेगाव परिसरात विनोद आणि त्याच्या साथीदारांनी श्रीपत यांना घेरले आणि त्यांच्यावर गोळय़ा झाडल्या. या हत्येप्रकरणी सहा जणांना मेहनगर पोलिसांनी अटक केली. चौकशीदरम्यान श्रीपत यांच्या हत्येसाठी त्यांच्या मुलाने विनोदला दीड लाखांची सुपारी दिल्याचे उघड झाले. या गुन्ह्य़ात विनोद मुख्य आरोपी असून तो महिनाभरापासून पोलिसांना गुंगारा देत आहे. या गुन्ह्य़ानंतर त्याने मुंबई गाठली. त्याचे बरेचसे नातेवाईक मुंबईत राहत असून त्यांच्याकडे तो येत-जात असे. यामुळे मुंबई शहर त्याच्यासाठी तसे नवे नव्हते. उत्तर प्रदेशात पुन्हा परतलो तर पोलीस खून आणि गुंडा कायद्याखाली कारवाई करतील अशी भीती त्याला सतत वाटत होती. यामुळे त्याने मुंबई, ठाणे व नवी मुंबई शहरातील गुन्हेगारी जगतामध्ये बस्तान बसविण्याचे ठरविले. पण, या शहरातील गुन्हेगारी विश्व त्याच्यासाठी नवीन होते. यामुळे तो या विश्वात पाऊल टाकण्याची संधी शोधत होता. तसेच उत्तर प्रदेशप्रमाणेच टोळी तयार करण्याचा विचार करत होता. विनोदच्या हालचालींविषयी ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाला माहिती मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र डोईफोडे आणि त्यांच्या पथकाने विनोदची माहिती गोळा केली. एका खुनाच्या गुन्ह्य़ात तो फरार असल्याची माहिती पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे विनोदचा माग काढण्याचे ठरविले.
पोलीस आयुक्त परमवीर सिंग, सहपोलीस आयुक्त व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण, गुन्हे अन्वेषण शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त शिवाजी बोडखे, पोलीस उपायुक्त पराग मणेरे, सहायक पोलीस आयुक्त नागेश लोहार आदी अधिकाऱ्यांचे डोईफोडे यांनी मार्गदर्शन घेतलेआणि सहायक पोलीस निरीक्षक चिवडशेट्टी, पोलीस उपनिरीक्षक शेडगे आणि त्यांच्या पथकाने कळवा नाका परिसरात सापळा रचून विनोदला अटक केली. त्यावेळी त्याच्याकडे एक गावठी कट्टा आणि एक जिवंत काडतुस सापडले. मुंबई, ठाणे व नवी मुंबई शहरातील गुन्हेगारी जगतामध्ये बस्तान बसविण्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरले असते तर तो मुंबई, ठाणे व नवी मुंबई पोलिसांसाठी डोकेदुखी ठरला असता. पण, ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने त्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरण्याआधीच उधळून लावले.
नीलेश पानमंद