आता वासुदेवाच्या मुखी प्रचाराचे सोंग ; मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी भाजपची नवी क्लृप्ती

निवडणुकांमध्ये मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी विविध राजकीय पक्ष वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवीत आहेत. निवडणुकीला उभे राहिलेल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आता सकाळच्या पारी दारोदारी जाणाऱ्या वासुदेवांचा एक गटही उतरला असून तब्बल ४० वासुदेव शहरात प्रचारासाठी उतरले आहेत. पक्षाचा विकासाचा दृष्टिकोन समजावून सांगण्याबरोबरच स्थानिक उमेदवारांची ओळख करून देण्यासाठी या वासुदेवांनी जनसंपर्क सुरू केला आहे. सकाळच्या वेळात मैदाने, उद्याने, सकाळच्या चालण्याच्या ठिकाणी गाठून वासुदेव उमेदवारांचा प्रचार करू लागले आहेत. मात्र प्रचाराचे सोंग घेऊन फिरणाऱ्या या वासुदेवांना फक्त राजकीय पक्षाचे चिन्ह माहिती आहे. उमेदवार कोण हे त्यांना माहिती नाही. त्यामुळे कुणी उमेदवाराविषयी विचारले तर त्यांना निरुत्तर व्हावे वाटते.
कल्याण-डोंबिवली निवडणुकीत प्रचाराचे विविध प्रकार अवलंबले जात असून भाजपच्या वतीने ४० वासुदेवांची नेमणूक या भागामध्ये करण्यात आली आहे. यापुढील टप्प्यात शिवसेना, मनसे आणि काही अपक्ष उमेदवारही अशाच प्रकारे प्रचारासाठी वासुदेव उतरवणार असल्याचे समजते. मात्र सध्या तरी भाजपच्या वासुदेवांची चर्चा शहरात पसरली आहे. विकासाची स्वप्ने, स्मार्ट सिटी आणि निवडणुकीच्या इतर पारंपरिक मुद्दय़ांभोवती या वासुदेवांची गाणी असून शेवटी मताचा जोगवा मागण्यात येत आहे.
वासुदेव हा पारंपरिक वेशभूषेमध्ये असल्याने आबालवृद्धांना त्यांच्या विषयी आकर्षण वाटते. त्याचप्रमाणे समाजामध्ये जागृती करण्याचे पारंपरिक काम ते करत असल्याने त्यांच्याविषयी नागरिकांमध्ये आपुलकीची भावना असते. त्या पारंपरिक आपुलकीच्या भावनेचा राजकीय फायदा करून घेण्यासाठी राजकीय पक्षांनी सकाळच्या वेळी प्रचाराची ही खेळी अवलंबली आहे.