ठाणे : ठाणे येथील लोकमान्यनगर भागात उभारण्यात आलेल्या तरण तलावाचे दोन वर्षांपुर्वी म्हणजेच विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठा गाजावाजा करत उद्घाटन करण्यात आले. मात्र, करोना निर्बंधांमुळे बंदावस्थेत असलेल्या या तरण तलावाच्या देखभाल दुरुस्तीकडे पालिका प्रशासनाने कानाडोळा केल्याने येथील जलशुद्धीकरण यंत्रणा नादुरुस्त झाल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे दोन वर्षांपुर्वी उभारण्यात आलेल्या तरण तलावाची वापराविनाच दुरावस्था झाल्याचे चित्र असून यामुळे पालिकेच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रात उत्तम जलतरणपटू तयार व्हावेत यासाठी पालिकेकडून शहराच्या विविध भागात तरण तलावांची उभारणी करण्यात येत आहे. अशाचप्रकारे लोकमान्यनगर भागात दोन वर्षांपुर्वी तरण तलाव बांधण्यात आला असून आकृती विकासकाने हा तरण तलाव बांधून पालिकेच्या ताब्यात दिला आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठा गाजावाजा करत उद्घाटन करण्यात आले. स्वर्गीय रामचंद्र ठाकूर तरण तलाव असे नामकरण करण्यात आले आहे. या तरण तलावाच्या संचलनासाठी पालिकेने निविदा काढून संस्था निश्चित केलेली नव्हती. तरीही पाचशे रुपये घेऊन तरण तलावात सरावासाठी प्रवेश दिला जात होता. राजकीय वरदहस्तातून हा प्रकार सुरु असल्याचा आरोप सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी केला होता. बेकायदेशीरपणे सुरु असलेला हा प्रकार बंद करण्याची मागणी नगरसेवकांनी केली होती. ही मागणी मान्य करत पालिकेने हा तरण तलाव वापरासाठी बंद केला होता. त्यानंतर करोनाचा संसर्ग सुरु झाला आणि निर्बंधामुळे हा तलाव पालिकेला बंद ठेवावा लागला होता. परंतु या काळात पालिकेने तलावाच्या देखभाल दुरुस्तीकडे पालिका प्रशासनाने कानाडोळा केला असून यामुळे येथील जलशुद्धीकरण यंत्रणा नादुरुस्त झाल्याची बाब समोर आली आहे. याठिकाणी पालिका सार्वजनिक बांधकाम विभागाने दुरुस्तीचे काम सुरु केले आहे. वापराविनाच तरण तलाव नादुरुस्त झाल्याच्या मुद्द्यावरून पालिका प्रशासनावर आता टिका होऊ लागली आहे.




वर्तकनगर, लोकमान्य नगर, शिवाई नगर, शास्त्रीनगर, चिराग नगर, भिमनगर या आजूबाजूच्या परिसरातील जलतरण पटूांना सराव करता यावा यासाठी स्वर्गीय रामचंद्र ठाकूर तरण तलावाची उभारणी करण्यात आली आहे. परंतु करोना काळाआधी उद्घाटन होऊनही त्यांना आजतागायत तलावाचा लाभ घेता आलेला नाही.
वास्तू धूळखात
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मतदारांना आकर्षित करण्यासाठी स्वर्गीय रामचंद्र ठाकूर तरण तलावाचे उद्घाटन करण्यात आले. परंतु पालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे परिसरातील नागरिकांना त्याचा लाभ घेता आलेला नाही. वर्तकनगर प्रभाग समिती अंतर्गत अशाच पध्दतीने अनेक वास्तूंचे केवळ अनावरण केले जाते. त्यानंतर या वास्तू धूळखात पडण्याची मोठी मालिकाच या समिती परिसरात दिसून येते. त्यामुळे या वास्तूंचे अनावरण होताच त्या नागरिकांसाठी खुल्या कराव्यात. जेणेकरून सर्वसामान्यांना त्याचा वापर करता येईल.
– संदीप पाचंगे, विभाग अध्यक्ष, मनसे
करोना निर्बंधामुळे हा तरण तलाव बंदावस्थेत होता. वापर झालेला नसल्यामुळे तेथील जलशुद्धीकरण यंत्रणा नादुरुस्त झाली असून तिच्या दुरुस्तीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरु आहे. तसेच स्थावर मालमत्ता विभागाने चार महिन्यांपुर्वी हा तरण तलाव क्रीडा विभागाकडे हस्तांतरीत केला असून त्याच्या संचलनासाठी सर्वसाधारण सभेच्या ठरावानुसार निविदा काढण्याचे काम सुरु आहे.
– मीनल पालांडे क्रीडा अधिकारी, ठाणे महापालिका