वसईत विहिरींचे तीन प्रकार आढळतात. पहिला प्रकार म्हणजे बांधलेली विहीर. ज्याचे आणखी तीन उपप्रकार आहेत. जे विहिरीचे पाणी वापरण्याच्या पद्धतीवरून पडतात. पिण्यासाठी, शेती-बागायतीसाठी आणि दोन्हींसाठी.
जगामध्ये सर्वात प्राचीन आणि प्रगत समजल्या जाणाऱ्या हडप्पा, इजिप्तिशियन संस्कृतींमध्ये विहिरींचे अस्तित्व असल्याचे उत्खननातून दिसून आलेले आहे. पाणी जीवन असल्यामुळे, विहिरींचे महत्त्व आजही गावा-गावांत टिकून आहे. वसईत विहिरींचे तीन प्रकार आढळतात. पहिला प्रकार म्हणजे बांधलेली विहीर. ज्याचे आणखी तीन उपप्रकार आहेत. जे विहिरीचे पाणी वापरण्याच्या पद्धतीवरून पडतात. पिण्यासाठी, शेती-बागायतीसाठी आणि दोन्हींसाठी. दुसरा प्रकार म्हणजे न बांधलेली विहीर आणि तिसरा प्रकार म्हणजे पोर्तुगीजकालीन विहीर होय. मॉन्सेनियर फादर फ्रान्सिस कारिया सांगतात की, ‘‘वसई भागात पूर्वीपासून मुबलक प्रमाणात गोड पाणी आहे. इथे पाण्याची टंचाई कधीच भासली नाही. २०-२५ फूट जमीन खोदली की पाणी आढळते.’’ तीन ते चार शतकांपूर्वी गावातील तळ्यातले पाणी पिण्यासाठी वापरले जात होते. नंतर जागोजागी बावखले बनवण्यात आली, मग विहिरी बांधण्यात आल्या. यांवर रहाट बसवण्यात येऊ लागले.
पूर्वी शेती, बागायतीसाठीचे आणि पिण्याचे पाणी वेगळ्या विहिरीतून घेतले जाई. काही ठिकाणी एकाच विहिरीचा वापर दोन्ही कामांसाठी होत असे. अशा वेळी ते प्रथम शेती-बागायतीचे पाणी काढल्यानंतर पिण्याचे पाणी भरत असत. हे पाणी पन्हळ्यातून निघत असल्यामुळे त्यातील पाणी लोक पिण्यासाठी वापरत नसे. पिण्याचे पाणी काढण्यासाठी पोहऱ्याचा वापर करत असे, तर शेती-बागायतीचे पाणी काढण्यासाठी रहाट किंवा कप्पीचा वापर करण्यात येत असे.
वसईतील रहाटाला ‘पर्शियन व्हील’ असेदेखील म्हणतात. कारण अठराव्या शतकात पारशी मेसेपोटेमियामधून भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर गुजरातमध्ये आले, त्या वेळी त्यातील काही लोक या भागातही वसले आणि त्यांनी त्यांच्या देशातील रहाट संस्कृतीची येथे स्थापना केली. कालांतराने या रहाट पद्धतीला उत्तर कोकणाचे वैशिष्टय़ समजले जाऊ लागले.
वसईतल्या विहिरींची आगळीवेगळी रचना
९०च्या दशकापर्यंत बांधलेल्या विहिरी या दगड-विटांच्या होत्या, नंतर अलीकडच्या काळात बांधलेल्या विहिरी सिमेंट-काँक्रीट-विटांनी बांधलेल्या होत्या. बांधलेल्या विहिरींच्या खालील झरे बंद होऊ नयेत म्हणून तळाला एकमेकांवर लाकडे ठेवत असे. त्यामुळे विहिरीचे वजन लाकडांवर येई. ही ऐनाची लाकडे असल्यामुळे ती कुजत नसत. झऱ्यांचे पाणी विहिरीच्या आत येण्यासाठी मदत होत असे. विहिरीचा पृष्ठभाग हा लाकडाचा ठेवण्यात येत असे. विहिरीमध्ये ३० ते ३५ फुटी खांब रोवले जातात, त्याला लाकडांच्या साहाय्याने आधार दिला जातो. या लाकडांवर २५ ते ३० फुटांचे गोलाकार लाकूड बसवतात, ज्यास सात असे म्हणतात. याच्या दुसऱ्या टोकाला दोतेरी किंवा टोकेरी चाक बसवले जात असे. त्याच्यासह आणखी एक चाक बसवले जाते, यास बैल जुंपून पाणी काढले जाते. विहिरीवरील चाकाला ८ ते १० फुटांचे चक्र बसवले जाते ज्यास दभडा म्हणतात. त्यावर केळीच्या पानांपासून बनवलेले दोन ताग (दोरखंड) बांधतात. यांमध्ये मातीचे मडके (बांडी) लावतात आणि मडक्यांची साधारण चाळीस फुटांची माळ बनवतात. अशा प्रकारचे रहाट पूर्वी बनवले जात असत. विहीर गोल असते हेच समीकरण आपल्याला माहिती आहे, परंतु पोर्तुगीजकालीन विहिरी या चौकोनी असत. या विहिरी दगड, चुना, मध, गूळ इत्यादींपासून बनवलेल्या असत. आजही त्या काळातील विहिरी वसईतील वटार आणि मालाडमधील मार्वे (एरंगळ) या गावांत पाहायला मिळतात. एका आळीत एक किंवा जास्तीत जास्त दोन ते तीन विहिरी असत. धर्मातरानंतर ख्रिस्ती समाजाने नवीन विहिरी बांधल्या. त्या विहिरींना लोकांकडून नव्या बावी असे संबोधले जाऊ लागले. नंतरच्या काळात घरोघरी विहिरी दिसू लागल्या. खासगी विहिरी या ८ ते १० फूट व्यासाच्या असत, तर सार्वजनिक विहिरी २५ ते ३० फूट व्यासाची असत.
बावखले
जी बांधलेली आहे ती विहीर आणि जी बांधलेली नाही, नुसता पाण्याचा साठा करण्यासाठी खड्डा बनवलेला असतो त्यास वसईतल्या बोलीभाषेत बावखळ किंवा बावखले असे म्हणतात. बाव म्हणजेच विहीर होय. बावखले गावाची शान समजली जातात. आजही आपल्याला वसईतील गावांमध्ये बावखले पाहायला मिळतात, परंतु ही बावखले आता वापरात नाहीत. पूर्वी रहाट बसवून वाडी, शेतीसाठी आणि इतर कामांसाठी तसेच पाणी पिण्यासाठीही याचा वर्षभर वापर केला जात असे. उत्तर कोकणातील काही भागांत आजही याचा वापर होतो. वसईचा भू प्रदेश चारही बाजूंनी खाडी आणि समुद्राने वेढलेला आहे. त्यामुळे गोडय़ा पाण्याच्या साठय़ासाठी त्या काळात बावखलांची संकल्पना राबवण्यात आली. पर्यावरण अभ्यासक जोसेफ तुस्कानो सांगतात की, ‘बावखलामुळे जमिनीत ओलसरपणा राहतो, त्यामुळे आजूबाजूच्या विहिरींतील पाण्याची पातळी टिकून राहते.’ बावखलाच्या पाण्यात आजूबाजूला झाडेझुडपे फुलत. पूर्वी मुले बावखलात पोहोण्यासाठीही जात असत. बावखले ही वसईच्या पारंपरिक संस्कृतीची ओळख आहे. बावखलाजवळील गर्द हिरव्या झाडांमुळे पर्यावरणाचे संतुलन राखले जाई. बावखले हीच प्रामुख्याने पाणी अडवून जिरवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. वसईत पूर्वी ५००च्या आसपास बावखले होती. ती आता ३०० पर्यंत येऊन पोहोचली आहेत. प्रदूषणामुळे आता बावखलातील पाण्यात क्षारांचे प्रमाण वाढले आहे, मात्र आता हीच बावखले नष्ट होऊ लागली आहेत. त्यामुळे बावखले वाचवण्याची मोहीम वसईत विविध सामाजिक संघटनांनी सुरू केलेली आहे.
दिशा खातू @Dishakhatu
disha.dk4@gmail.com