ठाणे शहरात वारंवार खंडीत होणारा वीजपुरवठा आता सुरळीत होण्यासाठी प्रशासनाने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. भांडुपवरून वागळे इस्टेटमध्ये येणारी सालशेत वाहिनी ५० वर्षांहून अधिक जुनी असल्याने त्यावर अनेक तांत्रिक अडचणी निर्माण होतात. या वीज वाहिनीतील बिघाडामुळे ठाणे शहराला होणारा पुरवठा वारंवार खंडीत होत आहे. हे टाळण्यासाठी  महावितरणच्या वतीने पुढील १५ दिवसांत या वाहिनीच्या दुरूस्तीचा कृती आराखडा राबवला जाणार आहे. जंपर उडणे, वाहिनी तुटणे असे बिघाड टाळण्यासाठी नवे जंपर बसवण्यात येणार असून त्यामुळे या वाहिनीवरील ७५ टक्के अडचणी दूर होतील, असा दावा महावितरणच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. या दुरुस्तीमुळे ठाण्यातील औद्योगिक पट्टय़ात विजेचा पुरवठा सुरळीत होऊ शकेल, असा दावा महावितरणचे भांडुप शहर परिमंडळाचे मुख्य अभियंता सतीश कर्पे यांनी केला.
गेल्या दोन वर्षांपासून सतत खंडीत होणाऱ्या वीज पुरवठय़ामुळे वागळे इस्टेट तसेच ठाण्यातील सुमारे ५२ औद्योगिक वसाहतींमधील लघू उद्योजकांनी महावितरणच्या या कारभारापुढे हात टेकले आहेत. या प्रकारामुळे अनेक उद्योजकांना आठवडय़ाच्या एक दिवस तरी उत्पादन बंद ठेवावे लागत आहे. विजेच्या अनियमित पुरवठय़ामुळे उद्योजक कमालीचे संतापले आहेत. गेल्या काही दिवसांपासून महावितरणच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून उद्योजकांनी यातून मार्ग निघावा यासाठी प्रयत्न केले, तरीही विजेचा पुरवठा वारंवार खंडीत होत असल्यामुळे उद्योजक नाराज होते. दरम्यान, ठाणे बेलापूर उद्योजक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच यासंबंधी महावितरणच्या अधिकाऱ्याची भेट घेतली. यावेळी वागळे इस्टेट पट्टय़ातील सुमारे ५० हून अधिक उद्योजक सहभागी झाले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महावितरणचा ‘कृती आराखडा’
’ठाण्यातील महावितरणच्या कार्यालयात झालेल्या बैठकीमध्ये अधिकाऱ्यांनी पुढील १५ दिवसांचा कृती आराखडा उद्योजकांसमोर सादर केला.
’या आराखडय़ामध्ये भांडुपवरून वागळे इस्टेटमध्ये येणाऱ्या सालशेत वीजवाहिनीच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर घेतले जाणार आहे.
’या वाहिन्यांवरील सर्व जंपर बदलण्यात येणार असून त्यामुळे ७५ टक्क्यांहून अधिक अडचणी दूर होणार आहेत.
’शहरातील ग्राहकांचा विजेचा प्रश्न मिटवण्यासाठी कलरकेम तसेच पातलीपाडा फीडरवरून स्वतंत्र अंतर्गत वाहिनीचे काम सुरू आहे.
’वीजयंत्रणेत मोठय़ा प्रमाणात दुरूस्ती करायची असल्यास किमान दोन दिवस आधी शहरातील सर्व ग्राहकांना शिवाय टिसाला माहिती देण्याचे महावितरणने आश्वासन दिले.
’५० वर्ष जुन्या सालशेत वाहिनीवर पुढील पंधरा दिवसांमध्ये दुरुस्ती करून घेण्यात येत असली तरी
ही वाहिनी पूर्णपणे बदलण्यासाठी महावितरणचे प्रयत्न आहेत.
’ही वाहिनी पूर्णपणे बदलल्यास मात्र ९५ टक्क्यांहून अधिक प्रश्न सुटतील, असा महावितरणचा दावा आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Power crisis in thane city may soon find a solution
First published on: 29-07-2015 at 01:29 IST