जागृत भारत संस्थेची न्यायाधीशांकडे तक्रार
मुंबई परिसरात बेकायदा फलकबाजी करणाऱ्या राजकीय नेते, पदाधिकाऱ्यांना मुंबई उच्च न्यायालयाने दंडाच्या शिक्षा ठोठावण्यास सुरुवात केली आहे. अशाच प्रकारची कारवाई उच्च न्यायालयाने कल्याण, डोंबिवली, टिटवाळा परिसरातील बेकायदा फलकबाजीबाबत सुरूकरावी, अशी मागणी जागृत भारत सेवाभावी संस्थेचे प्रशांत रेडीज यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांकडे केली आहे.
या पत्रासोबत संस्थेने कल्याण, डोंबिवली परिसरात राजकीय नेते, नवतरुण पुढाऱ्यांनी शहरातील मुख्य रस्ते, त्यावरील फलकावर लावलेली बेकायदेशीर फलकांची माहिती दाखल केली आहे. कल्याण शिळफाटा रस्त्यावर काही राजकीय नेत्यांनी केलेल्या फलकबाजीची माहितीही न्यायालयाला देण्यात आली आहे, असे संस्थेचे रेडीज यांनी सांगितले.
कल्याण, डोंबिवलीतील मुख्य रस्ते, गल्लीबोळात काही उठवळ पुढारी, नेते, स्वयंघोषित तरुण पुढारी यांनी आपला वाढदिवस, नगरसेवकांना शुभेच्छा देणारे बेकायदा फलक लावले आहेत. या फलकांवर कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही. या राजकीय मंडळींवर कोणाचाही वचक राहिलेला नाही. ऊठसूट फलकबाजी करण्यात ही मंडळी आघाडीवर असतात. त्यामुळे शहर मात्र विद्रुप होत आहे, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या तक्रारीसोबत कल्याण, डोंबिवलीतील काही फलकांची छायाचित्रे जोडण्यात आली आहेत. मुंबईत राजकीय नेत्यांवर न्यायालयाने बेकायदा फलकबाजी केली म्हणून कारवाई सुरू केली आहे, तशीच कारवाई कल्याण, डोंबिवलीतील नगरसेवक, उठवळ तरुण पुढाऱ्यांवर सुरू करावी, असे जागृत भारत संस्थेने म्हटले आहे.