रोज रोज तेच खाऊन कंटाळा आल्यावर आपली पावलं वळतात ती काहीतरी नवीन आणि झटपट मिळणाऱ्या पदार्थाकडे. अशावेळी तुमच्यासमोर प्रथमेश स्नॅक्स कॉर्नरचा पर्याय असला तर उत्तमच. वडापाव, पावभाजी आणि मिसळपावबरोबरच पनीर चिली, स्प्रिंग रोल, ग्रिल सँडविच असे नावीन्यपूर्ण आणि झटपट फ्यूजन पदार्थ इथे उपलब्ध आहेत..
सध्या आपण सगळे कमीत कमी वेळेत मिळणाऱ्या चमचमीत आणि चटकदार खाद्यपदार्थाच्या शोधात असतो. दररोजचा वडापाव, पावभाजी आणि मिसळपावबरोबरच पनीर चिली, स्प्रिंग रोल, ग्रिल सँडविच अशा नावीन्यपूर्ण आणि झटपट मिळणाऱ्या फ्यूजन पदार्थाकडे आपला अधिक ओढा असतो. अशाप्रकारची पोटपूजा करण्यासाठी प्रथमेश फास्ट फूड हे नवे केंद्र सध्या ठाण्यात लोकप्रिय आहे. इथे पिझ्झा तसेच निरनिराळ्या प्रकारचे ज्यूस मिळतात.
रोजचा वडापाव, चायनीज किंवा सँडविचमध्ये नवीन प्रयोग करून काहीतरी नावीन्यपूर्ण पदार्थ खाद्यरसिकांच्या भेटीस आणण्यासाठी सतीश कोटियन आणि दिनेश शेट्टी यांनी ४ वर्षांपूर्वी हे कॉर्नर सुरू केले. एका ज्यूस प्लाझापासून कॉर्नरची सुरुवात झाली. पुढे कालांतराने खवैय्यांच्या आग्रहावरून इथे फूड कॉर्नर सुरू करण्यात आला. पावभाजी, सँडविच, गार्लिक ब्रेड टोस्ट, ग्रिल सँडविच, चायनीज, पिझ्झा, सॅलेड, चॉप्सी, मिसळ, ज्यूस आणि मिल्कशेक अशा एकूण २१५ ज्यूस आणि खाद्यपदार्थाची चव येथे चाखायला मिळते. येथे मिळणाऱ्या पदार्थाचे वैशिष्टय़ म्हणजे सकाळच्या नाश्त्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत हे पदार्थ आपण कधीही खाऊ शकतो. सर्वाना आवडणाऱ्या चहा आणि कॉफीबरोबरच मिसळ पाव, बटर मिसळ पाव, पनीर तवा पुलाव, मशरूम तवा पुलाव तसेच मराठमोळ्या पुरी-भाजीची चव आपल्याला येथे चाखायला मिळते. पावभाजीमध्ये जैन पावभाजी किंवा आपल्या दररोजच्या बटर पावभाजीबरोबरच येथे आपल्याला जैन पावभाजी, पावभाजीच्या भाज्या आणि त्यात मशरूम किंवा पनीर टाकून तयार केलेली नावीन्यपूर्ण पनीर किंवा मशरूम पावभाजी, त्याचबरोबर पावाचे विविध पदार्थ आवडणाऱ्यांसाठी मसाला पाव, कॉर्न मसाला पाव, मशरूम मसाला पाव, पनीर मसाला पाव आणि सोबतीला मसाला किंवा फ्राईड पापडही येथे उपलब्ध आहे.
शाळकरी मुले आणि तरुणांना आवडणाऱ्या २५ ते ३० प्रकारच्या वैविध्यपूर्ण सँडविचची चव येथे आपल्याला चाखायला मिळते. ब्रेड बटर, जॅम टोस्ट, चटणी सँडविच, मसाला टोस्ट अशा सर्वपरिचित सँडविचबरोबरच चिली चीज टोस्ट, मेयॉनीज टोस्ट, फ्रुट सॅलेड आणि मेयॉनीज यांचं मिश्रण असलेलं रशियन सलाड सँडविच, चॉकलेट टोस्ट सँडविच त्याचबरोबर स्पायसी गार्लिक टोस्ट, जिलेपिनो, ब्लॅक ऑलिव्स, मका, पनीर आणि विविध भाज्यांच्या मिश्रणापासून तयार केलेलं एक्सॉटिक गार्लिक टोस्ट, सिमला मिरची आणि चीजचे मिश्रण असलेला हराभरा टोस्ट, भाज्या आणि चटणीचे मिश्रण असलेलं पहाडी ग्रिल अशा प्रकारचे वैशिष्टय़पूर्ण सँडविच आणि गार्लिक ब्रेड टोस्ट मिळत असल्याने ‘प्रथमेश’ म्हणजे तरुणाईसाठी खाद्यचंगळच आहे. मशरूम पिझ्झा, व्हेज चीज पिझ्झा, कॉर्न चीज पिझ्झा, पनीर पिझ्झा असे विविध प्रकारचे पिझ्झा आणि फ्रुट सलाड, अॅपल सलाड, फ्रुट सलाड विथ व्हॅनिला, आईसक्रीम ग्रीन सलाड असे हेल्थी सलाडसुद्धा येथे उपलब्ध आहेत.
हल्ली बहुतेकांना आवडणाऱ्या चायनीजमध्ये पनीर शेजवान ड्राय, पनीर स्प्रिंग रोल, पनीर चिली, पनीर आणि व्हेज मन्चुरिअन, पनीर आणि भाज्यांच्या मिश्रणापासून तयार केलेलं तिखट असं क्रिस्पी व्हेजिटेबल, कोबी-६५, मुलांची आवडती चायनीज भेळ अशा हलक्याफुलक्या स्टार्टर्सबरोबरच व्हेज आणि पनीर मन्चुरिअन, मशरूम चिली, मशरूम मन्चुरिअन व व्हेज हक्का नूडल्स, व्हेज हॉंकॉंग नूडल्स, बन्र्ट गार्लिक नूडल्स, चिली गार्लिक नूडल्स, बन्र्ट गार्लिक राईस, कॉम्बिनेशन राईस, मन्चुरिअन राईस, अमेरिकन किंवा चायनीज चॉप्सी असे अनेक चिनी खाद्यपदार्थ येथे मिळतात.
नाश्ता किंवा जेवण झाल्यावर गोड पदार्थ आवडणाऱ्यांसाठी स्वीट लस्सी, रोझ आणि केसर फालुदा, मुलांची आवडती हॉट सिझलिंग ब्राऊनीसुद्धा येथे उपलब्ध आहे. या कॉर्नरचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे येथे मिळणारे विविध प्रकारचे ज्यूस. मोसंबी, कलिंगड, द्राक्ष कॉकटेलबरोबरच जिंजर ऑरेंज, स्ट्रॉबेरी ऑरेंज, सफरचंद, बिट आणि लिंबू यांचं मिश्रण करून तयार केलेलं लाईव्ह बूस्टर ज्यूस, मारामारी, स्ट्रॉबेरी, अननस आणि संत्र्याचे मिश्रण करून तयार केलेलं अमेरिकन कॉकटेल, लिची, काला जामून, पिंक स्पार्कल असे अनेकविध प्रकारच्या ज्यूस आणि कॉम्बिनेशन ज्यूस येथे मिळतात. ज्यूसबरोबरच विविध स्वादांची मिल्क शेक येथे मिळतात. त्यात चिकू-चॉकलेट, चॉकलेट, सीताफळ, काजू, अंजीर, सीताफळ- चॉकलेट, स्विस मॅजिक, सीताफळ आणि आंब्यांचं मिश्रण असलेलं ग्लिटर मिल्कशेक, स्ट्रॉबेरी आणि किवीचे मिश्रण असलेलं डबल ट्रीट मिल्कशेक येथे मिळते.
प्रथमेश स्नॅक्स कॉर्नरचे वैशिष्टय़ म्हणजे येथे मिळणारे गार्लिक चीज टोस्ट आणि मुंबई मिसळ टोस्ट. ब्रेडवर मोझोरोला चीज टाकून गार्लिक चीज टोस्ट तयार केले जातात. पनीर, मका आणि विविध भाज्यांचे मिश्रण स्मॅश करून त्यात मेयॉनीज टाकून नावीन्यपूर्ण असा मुंबई मिसळ टोस्ट तयार केला जातो.
प्रथमेश स्नॅक्स कॉर्नर
- शॉप नं २१, मोनालिसा बिल्डिंग, हरी निवास सर्कलजवळ, ठाणे (प).