‘ठाणे तिथे काही नाही उणे’च्या सादरीकरणाला उणेपुरे दोन तास विलंब
नाटय़ संमेलनाच्या पूर्वारंभ कार्यक्रमांच्या सांगता सोहळ्यातही आयोजकांच्या सावळ्यागोंधळाने अक्षरश टोक गाठल्याचे चित्र गुरुवारी सायंकाळी पाहावयास मिळाले. हा सांगता सोहळा प्रमुख आयोजकांपैकी एक असलेले नरेंद्र बेडेकर यांच्या ‘ठाणे तिथे काही नाही उणे’ या कार्यक्रमाने संपन्न होणार होता. आयोजक असलेले बेडेकरच व्यासपीठावर सादरीकरणाची हौस भागवून घेणार असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या असतानाच सायंकाळी साडेसहा वाजता आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम तब्बल दोन तास उशिराने सुरू झाला. पूर्वारंभ सोहळ्यात जागोजागी लेटलतीफ कारभाराचा आविष्कार दाखविणाऱ्या आयोजकांनी सांगता सोहळ्यातही हीच परंपरा कायम ठेवल्याने रसिक अक्षरश खडे फोडताना नजरेस पडत होते.
आतापर्यंत पार पडलेल्या पूर्वारंभ सोहळ्याच्या जवळपास प्रत्येक कार्यक्रमात आयोजकांच्या ढिसाळ कारभाराचे प्रदर्शन घडले होते. शिवसेनेच्या ठाणे शाखेने मोठा उत्साह दाखवीत पूर्वारंभाचे सोहळे आयोजित केले खरे, मात्र ठाणेकरांनी या सोहळ्यांना अत्यल्प अशी उपस्थिती दाखवली. पूर्वारंभ सोहळ्याचा शुभारंभ सोहळ्यात ठाणे शाखेचे अध्यक्ष खासदार राजन विचारे दोन तास उशिराने अवतरले आणि तेथूनच ढिसाळ नियोजनाचा पाया रचला गेला. मुख्य संमेलनापूर्वी पूर्वारंभ सोहळ्याचा सांगता कार्यक्रम गुरुवारी दादोजी कोंडदेव क्रीडांगणावर मुख्य आयोजकांपैकी एक असलेले नरेंद्र बेडेकर यांच्या ‘ठाणे तिथे काही नाही उणे’ या सादरीकरणाद्वारे होणार होते. मुळात मुख्य आयोजकांनाच अशा सादरीकरणाला परवानगी देण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. असे असताना हा कार्यक्रम नियोजित वेळेपेक्षा दोन तास उशीर झाल्यामुळे उपस्थित नाटय़प्रेमींची पुरती निराशा झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले.
कार्यक्रम स्थळी पोहचल्यावर चुकीच्या स्थळावर पोहचलो की काय, असे भाव प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर दिसू लागले होते. इतके गलथान नियोजन या ठिकाणी दिसत होते.
प्रेक्षकांच्या समोरच रंगरंगोटी
व्यासपीठाची उभारणी, वीज व्यवस्था करणारे कारागीर, रंगरंगोटी काम करणारे कामगार या ठिकाणी पूर्वतयारीत गुंतले होते. आयोजकांनी प्रथम येणाऱ्यास प्राध्यान दिले जाईल असे आवाहन केले होते. त्यामुळे सायंकाळी सहापासूनच नाटय़रसिक या ठिकाणी येऊ लागले होते. परंतु कार्यक्रम आता सुरू होईल, नंतर सुरू होईल अशा टोलवाटोलवीच्या उत्तरांना कंटाळून बऱ्याचशा रसिकांनी कार्यक्रमस्थळावरून काढता पाय घेतला. त्यानंतर चक्क रात्री ८.३० वाजता अर्धवट तयार झालेल्या रंगमंचावर कार्यक्रम सुरू झाला, परंतु हा कार्यक्रम पाहण्यासाठी येथे अत्यल्प प्रेक्षकांची उपस्थिती होती.