कल्याण, डोंबिवली आणि टिटवाळा शहरांचे झपाटय़ाने नागरीकरण होत आहे. येथे राहायला येणारा मोठा वर्ग नोकरदार आणि व्यावसायिक आहे. त्यामुळे या शहरांतून मुंबई-ठाण्याकडे ये-जा करणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे. याशिवाय कल्याण, डोंबिवली परिसरात उच्च शिक्षणाच्या पुरेशा सुविधा नसल्याने शिक्षणासाठी आसपासच्या शहरांत जाणाऱ्या विद्यार्थीवर्गाचे प्रमाण लक्षणीय आहे. या सर्व प्रवाशांच्या गर्दीचा भार कल्याण, डोंबिवली आणि टिटवाळा, विठ्ठलवाडी, ठाकुर्ली रेल्वे स्थानकांवर येऊ लागला आहे. एकीकडे रेल्वेतील गर्दी नियंत्रणात येत नसल्याने होणाऱ्या अपघातांची संख्या वाढत असताना रेल्वे स्थानकापर्यंत पोहोचेपर्यंत प्रवाशांची उडणारी तारांबळ हीदेखील मोठी समस्या आहे. शहरातील १४ लाख लोकसंख्येपैकी ४० टक्क्यांहून अधिक प्रवासी रेल्वे स्थानकाच्या दिशेने दररोज प्रवास करत असतात. याचा ताण रस्ते वाहतुकीवर जाणवू लागला आहे. परिवहन उपक्रमांच्या बसगाडय़ांसोबत रिक्षा हे सार्वजनिक वाहतुकीसाठीचे साधन आहे. मात्र, ही दोन्ही साधने विविध कारणांमुळे प्रवाशांना त्रासदायक ठरत आहेत. तर दुसरीकडे स्वत:च्या वाहनांनी प्रवास करायचा म्हटले तर, वाहतूक कोंडी, वाहनतळांचा अभाव आणि रस्त्यांची दुरवस्था अशा अडचणींना नागरिकांना तोंड द्यावे लागते. या पाश्र्वभूमीवर कल्याण, डोंबिवलीला ‘स्मार्ट सिटी’च्या धर्तीवर विकसित करताना शहरांतील वाहतूक व्यवस्थेत सुसूत्रता आणण्याला महापालिकेने प्राधान्य दिले आहे. कल्याण-डोंबिवली, टिटवाळा परिसरात स्मार्ट सिटी उपक्रमांतर्गत नागरी सुविधांचे विविध प्रकल्प राबवायचे आहेत. कोणत्या रेल्वे स्थानकांचा क्रमवार विकास करावा, असे सव्र्हेक्षण एका खासगी संस्थेने कल्याण, डोंबिवली आणि टिटवाळा शहराच्या विविध भागांत केले. यावेळी सव्र्हेक्षणात कल्याण रेल्वे स्थानक प्रथम, डोंबिवली आणि त्यानंतर टिटवाळा रेल्वे स्थानक परिसराचा विकास करण्यात यावा, अशी मते सर्वसामान्यांनी व्यक्त केली आहेत. त्यानुसार स्मार्ट सिटी योजना राबताना खालील मुद्दय़ांना प्राधान्य देण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बंगळूरूच्या वाहतूक व्यवस्थेचा अभ्यास
बंगळूरू शहरात वाहतुकीचे नियोजन एका ठिकाणाहून केले जाते. तेथे शहराच्या एखाद्या भागात वाहतूक कोंडी निर्माण झाली असेल तर, तात्काळ ती वाहतूक अन्य मार्गाने तात्काळ वळविण्यात येते. या वाहतूक पद्धतीचा अभ्यास करून ती पद्धत शहरात कशा प्रकारे अमलात आणता येईल त्याचा अभ्यास करण्यात येत आहे. ही पद्धत अमलात आली तर वाहतूक कोंडी हा प्रश्न निर्माण होणार नाही.

आणखी वाहनतळ उभारणार
कल्याण रेल्वे स्थानकाच्या दिशेने दररोज जुन्या कल्याण शहराबरोबर आधारवाडी, गांधारे, बारावे, खडेगोळवली, नेतिवली, नेवाळी या नव्याने विकसित झालेल्या परिसरातील रहिवासी येत असतात. या रहिवाशांचे येण्याचे साधन रिक्षा, स्वत:चे दुचाकी वाहन किंवा बस हे असते. कल्याण रेल्वे स्थानक भागात महापालिकेची, रेल्वेची वाहनतळ आहेत. मात्र, वाढत्या वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे ती कमी पडू लागली आहेत. त्यामुळे वाहनांचा भार शहरातील अंतर्गत रस्त्यांवर पडू लागला आहे. अशीच परिस्थिती डोंबिवलीत आहे. डोंबिवलीत शिळफाटा, लोढा हेवन, २७ गावे, पश्चिमेतील नव्याने विकसित झालेल्या भागातून प्रवासी रेल्वे स्थानकाच्या दिशेने येत असतात. डोंबिवली पश्चिमेत महापालिकेचे एकही वाहनतळ नाही. त्यामुळे वाहतूक विभागाने निश्चित केलेल्या सम, विषम तारखांना रस्त्याच्या कडेला दुचाकीस्वार वाहने उभी करतात. पश्चिमेत कोपर उड्डाण पुलाजवळ मध्य रेल्वेचे एक वाहनतळ आहे. ते वाहनांसाठी अपुरे पडू लागले आहे. पूर्व भागात पालिकेजवळ एक वाहनतळ आहे. तेथे पैसे भरा आणि वाहने उभी करा तत्त्वावर वाहने उभी करण्याची सोय आहे. डोंबिवली पूर्व भागात वाहनतळासाठी तीन ते चार भूखंड राखीव आहेत. त्या जागा पालिकेने ताब्यात घेऊन विकसित केल्या तर, डोंबिवलीतील वाहनतळांचा प्रश्न सुटू शकतो. काही खासगी जमीन मालकांनी आपल्या मोकळ्या जागा वाहनतळांसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. पैसे द्या आणि वाहने उभी करा तत्त्वावर अनेक जमीन मालक व्यवसाय करीत आहेत.
टिटवाळा भागात परिसरातील गावांमधून, मुरबाड परिसरात नोकरदार वर्ग आपल्या खासगी वाहनाने रेल्वे स्थानक भागात येतो. कल्याण, डोंबिवली आणि टिटवाळा रेल्वे स्थानकांच्या परिसरात वाहनतळ ही मोठी समस्या आहे. त्यामुळे स्मार्ट सीटी उपक्रमाच्या अंतर्गत या तिन्ही रेल्वे स्थानकांच्या भागात वाहनतळ उभारणीला प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे.

पदपथ रुंद करणे
स्मार्ट शहराचा आराखडा जाहीर करताना आयुक्त ई.रवींद्रन यांनी कल्याण-डोंबिवली या दोन्ही रेल्वे स्थानकांचा परिसर फेरीवालामुक्त करण्याचे आव्हान स्वीकारले आहे. यासाठी पादचाऱ्यांना चालण्यासाठी रुंद पदपथ तयार करण्यात येणार आहेत. रस्त्यावरून वाहनांची ये-जा होईल आणि पादचाऱ्यांना चालण्यासाठी पदपथाचा वापर करावा, या दृष्टीने पदपथांचे नियोजन करण्यात येणार आहे. पदपथावर कोणीही व्यावसायिक, फेरीवाला बसू नये म्हणून पदपथांच्या रस्त्याकडील बाजूला लोखंडी जाळ्या लावण्याचा विचार आहे. त्यामुळे पादचारी आणि वाहने एकमेकांना अडथळा येणार नाहीत. पादचारी हा पदपथावरून पुढच्या प्रवासाला जाईल. आणि वाहने रस्त्यात पादचारी नसल्याने त्याच्या मार्गाने विनाअडथळा जातील. अशी व्यवस्था कल्याण, डोंबिवली, टिटवाळा रेल्वे स्थानकांच्या परिसरात प्राधान्याने करण्यात येणार आहे.

कचऱ्याचे नियोजन व विल्हेवाट

रेल्वे स्थानक परिसर कचराकुंडी मुक्त करण्यात येणार आहे. रेल्वे स्थानक भागात कचरा तयार होणार नाही. तयार झालेला कचरा लगतच्या लहान कुंडय़ांमध्ये जमा झाल्यानंतर तो तात्काळ उचलला जाईल, अशी व्यवस्था करण्याचा विचार आहे. एकही मोठी कचराकुंडी रेल्वे स्थानक परिसरात असणार नाही. सध्या रेल्वे स्थानक भागातील कचराकुंडय़ा या वाहतूक कोंडीला आमंत्रण देत आहेत. कचराकुंडी आहे म्हणून आजूबाजूला नाहक कचरा तयार होत आहे. हा कचरा तयार झाला तरी तो तात्काळ उचलला जाईल, अशी व्यवस्था करण्यात येणार आहे. कचराकुंडी मुक्त रेल्वे स्थानक परिसर झाला म्हणजे दरुगधी, घाण हा प्रकार नजरेस पडणार नाही. शहरात तयार होणाऱ्या कचऱ्याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. टिटवाळा, बारावे, उंबर्डे परिसरातील कचराभूमीच्या आरक्षित जागांवर हे प्रकल्प राबविण्यात येणार आहेत.

पूर्व-पश्चिम प्रवास सोयीस्कर
कल्याण, डोंबिवली, टिटवाळा रेल्वे स्थानक भागात पूर्व आणि पश्चिम भाग जोडणारे उड्डाण पूल, पादचारी पूल, स्कायवॉकसारख्या नवीन मार्गाची उभारणी करण्याचा प्रस्ताव आहे. यामुळे उपलब्ध स्कायवॉक, पुलांवर येणारा ताण रेल्वे जिन्यांवरील गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे. गर्दीचे विविध मार्गावर विभाजन झाल्यावर रेल्वे स्थानक परिसरात नियमित होणारी गर्दीची कोंडी, वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.

भूमिगत वीजवाहिन्या
रेल्वे स्थानक परिसरात महावितरणच्या वीजवाहिन्या, विविध सेवा देणाऱ्या वाहिन्या उंचावरून टाकण्यात आल्या आहेत. या वाहिन्या जमिनीखालून टाकण्याचा प्रस्ताव आहे. जुने विजेचे खांब, त्यावरील वाहिन्या, अन्य सेवा वाहिन्यांमुळे उन्नत ठिकाणाहून नवीन मार्गिका करणे अवघड झाले आहे.

आधारवाडीत उद्यान
आधारवाडी कचराभूमी बंद करण्यात आल्यानंतर त्या जागेवर सर्व सुविधांनी युक्त खेळ, मनोरंजन मैदान विकसित करण्यात येणार आहे. शहरातील इतर ठिकाणांबरोबर पाहण्यासारखे ठिकाण असेल अशा पद्धतीने हे उद्यान विकसित करण्यात येणार आहे.

राखीव भूखंडांचा विकास
उद्याने, मैदाने, मनोरंजन, चौपाटी अशा उपक्रमांसाठी अनेक भूखंड पालिकेच्या विकास आराखडय़ात आरक्षित आहेत. हे भूखंड विकसित करून रहिवाशांना त्या भागात मनोरंजन, विरंगुळा केंद्रसारख्या सुविधा देण्याचा प्रयत्न आहे.

समूह विकास योजनेचा समावेश
ठाणे, कळवा तसेच मुंब्रा या तिन्ही शहरांमध्ये गेल्या काही वर्षांत मोठय़ा प्रमाणात बेकायदा बांधकामे उभी राहिली असून यामुळे शहराला बेकायदा बांधकामांचे आगार म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. शीळ-डायघरमधील लकी कंपाऊंडमधील, कळवा, मुंब्रा तसेच वागळे भागात बेकायदा इमारती कोसळल्याच्या घटना गेल्या काही वर्षांत घडल्या असून त्यामध्ये नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. या घटनेनंतर शहरातील काही इमारती धोकादायक असल्याचीही बाब पुढे आली आहे. तसेच महापालिका अस्तित्वात नव्हती म्हणजेच ग्रामपंचायतीच्या काळात शहरामध्ये काही इमारती उभ्या राहिल्या आहेत. नौपाडा भागात अशीच एक इमारत कोसळल्याची घटना काही महिन्यांपूर्वी घडली असून त्यातही नागरिकांना जीव गमवावा लागला. त्यामुळे जुन्या इमारतीही धोकादायक असल्याचेही महापालिकेच्या तपासणीत पुढे आले आहे. या पाश्र्वभूमीवर शहरातील बेकायदा इमारती तसेच चाळींचा समूह विकास योजना (क्लस्टर) योजना राबविण्याची मागणी होऊ लागली आहे. त्यामुळे स्मार्ट सिटीच्या आराखडय़ामध्ये महापालिकेने समूह विकास योजनेचा समावेश केला असून त्यासाठी आराखडय़ामध्ये २९०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

सौर शेती प्रकल्प

केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी योजनेचा एक भाग म्हणून शहरात ‘सौरशेती’ प्रकल्प राबविण्यात येणार असून त्याचा स्मार्ट सिटी आराखडय़ात समावेश करण्यात आला आहे. डायघर भागातील पाच एकर मोकळ्या जागेवर सुमारे एक मेगावॅट क्षमतेचा वीज प्रकल्प त्यातून दर वर्षी १५ लाख युनिट विजेची निर्मिती होणार आहे. याशिवाय शहरातील विविध मोकळय़ा भूखंडांवर छोटे सौरवीज प्रकल्प राबविण्याचाही महापालिकेचा विचार आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Priority to make effective public transport
First published on: 11-12-2015 at 04:45 IST