पालिकेकडून मालमत्ता जप्ती आणि लिलाव करण्याच्या प्रक्रिया सुरू

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वसई: शहरातील मालमत्ता थकबाकीदारांविरोधात शुक्रवारपासून पालिकेने कडक कारवाई सुरू केली आहे. त्यानुसार त्यांच्या मालमत्ता जप्त करण्याबरोबर त्यांचा लिलाव करण्याची प्रक्रियादेखील सुरू करण्यात आली आहे. मालमत्ता कराच्या वसुलीचे अपेक्षित उत्पन्न गाठू न शकल्याने पालिकेने हा निर्णय घेतला आहे.

वसई-विरार शहर महापालिकेचे चालू आर्थिक वर्षाच्या मालमत्तेचे एकूण अपेक्षित उत्पन्न हे ५३० कोटी रुपये आहे. याशिवाय पाणीपट्टी कराचे अपेक्षित उत्पन्न हे ६६ कोटी रुपये एवढे आहे. आतापर्यंत पालिकेने मालमत्ता करापोटी (शुक्रवार, २९ जानेवारीपर्यंत) केवळ १५५ कोटी रुपये, तर पाणीपट्टीपोटी केवळ ४१ कोटी १३ लाख रुपये वसूल केले आहेत. वारंवार  आवाहन करूनही नागरिक मालमत्ता कर आणि पाणीपट्टी कर भरत नसल्याने पालिकेने कडक कारवाई करायचे ठरवले आहे. त्यानुसार प्रत्येक प्रभागातील पहिले ५० मोठे कर थकबाकीदार शोधून त्यांच्या जंगम मालमत्ता जप्त करण्यास सुरुवात केली जाणार आहे.  प्रत्येक प्रभागातील पहिल्या ५० मोठ्या कर थकबाकीदारांची पालिकेने यादी तयार केली आहे. त्यांना यापूर्वी पालिकेने नोटीस बजावल्या होत्या. मात्र तरी त्यांनी करभरणा न केल्याने त्यांच्या जंगम मालमत्ता जप्त करण्यात येत आहेत. जेवढ्या रकमेची थकबाकी असेल तेवढ्या रकमेच्या घरातील वस्तू पालिकेने जप्त करण्यास सुरुवात केली आहे. त्यात फ्रिज, टीव्ही, फर्निचर आदींचा समावेश आहे.

नावे जाहीर करणार

पालिकेने सर्व नागरिकांना कराच्या नोटिसा पाठवून कर भरण्याचे आवाहन केले आहे. मात्र तरीदेखील अनेक मालमत्ताधारक कर भरत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे त्यांची नावे वर्तमानापत्रात प्रसिद्ध  केली जाणार आहेत, तसेच चौकाचौकांत त्यांच्या नावांचे फलक लावले जाणार आहे. नागरिकांनी कर भरावा यासाठी पालिकेने जनजागृती मोहीम सुरू केली आहे. त्यासाठी प्रत्येक प्रभागातून मोटारसायकल रॅली, उद्घोषणा करण्यात येत आहेत.

१०० कोटींच्या मालमत्ता निर्लेखित

पालिकेच्या चालू आर्थिक वर्षाच्या मालमत्ता कराचे उत्पन्न ५३० कोटी रुपयांचे असले तरी त्यातील १०० कोटींच्या मालमत्ता या निर्लेखित आहेत. म्हणजे अनेक मालमत्ताधारक स्थलांतरित झाले आहे, त्या मालमत्ता अतिक्रमणविरोधी कारवाईत जमीनदोस्त झाल्या आहेत, त्यात कुणी राहात नाहीत तरी त्यांना कर आकारणी होत आहे. अशा निर्लेखित मालमत्ता निकाली न काढल्याने त्यामुळे मालमत्ता थकबाकीचा आकडा दिवसेंदिवस फुगीर होत असतो. त्यामुळे आता पालिकेने अशा निर्लेखित मालमत्तांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत १३ हजार निर्लेखित मालमत्तांची प्रकरणे निकाली काढण्याचे प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत.

५१८ नळजोडण्या खंडित, ११० मालमत्तांचा लिलाव

पाणीपट्टी करापोटी पालिकेला  ६६ कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे. मात्र केवळ ४१ कोटी १३ लाख रुपयांचा पाणीपट्टी कर जमा झाला आहे. त्यामुळे पालिकेने नळजोडण्या खंडित करण्यास सुरुवात केली आहे. शुक्रवारपर्यंत पालिकेने ५१८ पाणीपट्टी कर थकबाकीदारांच्या नळजोडण्या खंडित केल्या आहेत. याशिवाय ११०  मालमत्तांचा लिलाव केला जाणार आहे. या ११० मालमत्ता करदात्यांनी पालिकेचा कर बुडवला आहे. या मालमत्तांचे मू्ल्यांकन बाजारभावाप्रमाणे नगररचना विभाग करत आहे. रेडी रेकनर दरानुसार या मालमत्तांचे सध्याचे दर ठरवून त्यांचा जाहीर लिलाव केला जाणार आहे.

मालमत्ता आणि पाणीपट्टी कर थकविणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. या थकबाकीदारांना यापूर्वी नोटिसा देण्यात आल्या होत्या. त्यामुळे नाइलाजाने आम्हाला नळजोडण्या खंडित करणे, मालमत्ता जप्त करणे तसेच लिलाव करणे आदी मार्गांचा अवलंब करावा लागत आहे.

– प्रदीप जांभळे-पाटील, उपायुक्त (कर) वसई-विरार महापालिका

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Process of confiscation and auction of property by the municipality is underway akp
First published on: 30-01-2021 at 00:13 IST