प्रा. वैभव सोनारकर, लेखक, कवी

वसईच्या अभियांत्रिकी वर्तक महाविद्यालयात प्राध्यापक असणारे वैभव सोनारकर हे कवी आणि विचारवंत आहेत. त्यांची ‘ब्लू प्रिंट’ आणि ‘काषाय अक्षरे’ हे दोन कवितासंग्रह प्रकाशित झाले असून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावरील १२५ कवितांचे संपादन ते करत आहेत. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी १५ शोधनिबंध सादर केले असून अभियांत्रिकी विषयावर त्यांनी लिहिलेली १५ पुस्तके अभ्यासक्रमात आहेत. नागपूर विद्यपाठीत त्यांच्या कवितांचा समावेश आहे.

AMU gets its first woman VC Naima Khatoon
व्यक्तिवेध : नईमा खातून
Vidya Prabodhini students from Kolhapur top in the UPSC final result
युपीएससीमध्ये कोल्हापूरचा झेंडा; विद्या प्रबोधिनीच्या विद्यार्थांची अंतिम निकालात बाजी
20 people have recorded their testimony in the suicide case of nursing student in Nagpur
नागपुरात बी. एस्सी. विद्यार्थिनीच्या आत्महत्या प्रकरणात २० जणांनी नोंदवली साक्ष
Prof. Rupesh Mahadik
ठाणे महाविद्यालयाचे प्राध्यापक रुपेश महाडीक यांचा आदर्श अध्यापक पुरस्काराने सन्मान

पुस्तके हा माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. माझे घर चळवळीचे केंद्र होते. आजोबा राजकारणात तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीत सक्रिय होते. मामाही उच्चशिक्षित होते. घरात चळवळ आणि वाचण्याचे वातावरण होते. घरातील याच चळवळीच्या वातावरणामुळे मी खऱ्या अर्थाने वाचनाकडे वळलो. लहानपणासापासून वाचनाची आवड निर्माण झाली. मी सहावीत असताना माझ्या आजीने मला ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ हे पुस्तक वाचायला दिले. वाचनातून माझ्यातील कविता फुलत गेली. शाळेत असताना मी शिवाजी महाराजांवरील ‘श्रीमान योगी’ ही कादंबरी तसेच धनंजय कीर यांचे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ यांचे चरित्र वाचून काढले होते. त्यातून आयुष्याची समज येत गेली. दहावीपर्यंत मी अफाट वाचन केले. एमए साहित्याचा विद्यार्थी जेवढी पुस्तके वाचणार नाही, तेवढी पुस्तके मी दहावीपर्यंत वाचलेली होती.

महाविद्यालयात आल्यापासून मी वेडय़ासारखा झपाटून वाचन करू लागलो. लायब्ररीतील पुस्तके वाचताना मर्यादा येतात. ती पुस्तके वेळेत परत करावी लागतात. त्यामुळे पुस्तके विकत घ्यायची, असे ठरवले. आतापर्यंत मी २० लाखांची पुस्तके विकत घेतली आहेत. मी अभियांत्रिकी पेशात आहे. त्यामुळे माझ्या घरातील एक कपाट केवळ अभियांत्रिकी पुस्तकांसाठी आहे. पुस्तके हीच माझी संपत्ती आहे.

फुले-आंबेडकरी पुस्तकांचा माझ्या जीवनावर प्रभाव आहे. त्याचप्रमाणे शिवाजी महाराजांनी मला झपाटून टाकले आहे. मला कथा-कांदबऱ्यांपेक्षा वैचारिक पुस्तके जास्त भावतात. गोखले यांचे ‘डॉ. बाबासाहेब व्यक्ती आणि विमर्श’ , योगिराज बागूल यांचे ‘बाबासाहेबांच्या सहवासात’ ही प्रभाव टाकणारी पुस्तके. मानवी दु:खासाठी झगडणारे साहित्य मला आवडते. माझ्या कवितांमध्येही त्याचेच प्रतिबिंब उमटते.  कविता हा माझा जिव्हाळ्याचा प्रांत. नामदेव ढसाळ, ग्रेस, सुखदेव ढाकणे हे माझे आवडते कवी आहेत.

सध्या प्रकाश खरात यांचं ‘यशोधरा’ हे पुस्तक वाचतोय. ‘अनहिलिएशन ऑफ कास्ट’, ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ ही आयुष्य घडविणारी पुस्तके. सध्या मी बुद्ध तत्त्वज्ञानावर लक्ष केंद्रित केले असून त्या दृष्टीने वाचन होत आहे.

पुस्तकांसाठी मी सर्वत्र भटकंती करत असतो. वाचन हे सर्वव्यापी असावे हे माझे मत आहे. त्यानुसार मी कथा, कांदबऱ्यांपासून सर्व प्रकारचे साहित्य वाचतो. पण आता बुद्ध साहित्याकडे वळलोय. दादरचे ‘मॅजेस्टिक’, ‘आयडियल’ ही माझ्या आवडीची पुस्तके विकत घेण्याची ठिकाणे आहेत. चळवळीची पुस्तके दादरच्या चैत्यभूमीला मिळत असतात त्यामुळे सतत तिथे जाऊन पुस्तके विकत घेत असतो.

वाचनाचा वेग आजही कायम आहे. परंतु वाचल्यावर चिंतन होते ही जास्त सुखदायक गोष्ट आहे. दैनंदिन कामाची व्यस्तता ही वाचनात कधी अडचण बनत नाही हे मला आवर्जून नमूद करावेसे वाटते. वाचनाची खास वेळ ठरवलेली नाही. जसा वेळ मिळेल तसे वाचन होत राहते. वाचनामुळे माणसे जोडली जातात. माझ्या कवितांमुळे आणि वाचनाच्या आवडीमुळे माझ्या आयुष्यात अशीच माणसे जोडली गेली आहेत.

पुस्तकांचा संग्रह हा असाच वाढत जाणार आहे आणि वाचनाचा वेगही वाढत जाणार आहे.

शब्दांकन- सुहास बिऱ्हाडे