एकत्रित सवलत दहा टक्क्यांपर्यंतच; ठाणे पालिकेच्या कर विभागाचा प्रस्ताव

ठाणे महापालिकेने आखलेल्या वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून मालमत्ताधारकांवर कर सवलतींचा वर्षांव करणाऱ्या धोरणाला अखेर प्रशासनाने आवर घालण्याचा निर्णय घातला आहे. सौर ऊर्जा, पर्जन्य जलसंधारण, अंतर्गत घनकचरा व्यवस्थापन अशा विविध योजना एकत्रितपणे राबविणाऱ्या गृहसंकुलांना यापूर्वी मालमत्ता करामध्ये तब्बल ३२.५ टक्के इतकी एकत्रित सवलत देय होती. ही सवलत मोठय़ा प्रमाणात असल्याने ती रद्द करत यापुढे मालमत्ता करातील सामान्य करात जास्तीत जास्त १० टक्क्य़ांपर्यंत सवलत मर्यादित करण्याचा प्रस्ताव मालमत्ता कर विभागाने तयार केला आहे. याशिवाय संपूर्ण मालमत्ता करावर देण्यात येणारी सवलत रद्द करण्याच्या निर्णयाचाही या प्रस्तावात समावेश करण्यात आला आहे.

ठाणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत यापूर्वी अनेकदा विविध ठरावांनुसार मालमत्ता करावर सवलतींचा वर्षांव करण्यात आला आहे. पालिकेच्या योजनांची चांगल्या पद्धतीने अंमलबजावणी व्हावी यासाठी या सवलती आखण्यात आल्या असल्या तरी त्याचे एकत्रित प्रमाण फारच जास्त होत असल्याची उपरती महापालिका प्रशासनाला आता होऊ लागली आहे. सर्वसाधारण सभेत करण्यात आलेल्या ठरावांनुसार महापालिका क्षेत्रातील ज्या निवासी मिळकती सन २००० तसेच त्यापुर्वी अस्तित्वात किंवा वापरात आल्या आहेत अशा इमारतींमध्ये सौर ऊर्जा यंत्रणा बसविण्यात आल्यास मालमत्ता करात (शासनाचे कर वगळून) १० टक्क्यांची सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय सन २००० पूर्वी बांधण्यात आलेल्या इमारतींमध्ये पर्जन्य जलसंचनाची योजना राबविणाऱ्या वसाहतींना मालमत्ता करात पाच टक्क्य़ांची सवलत देय करण्यात आली आहे. घनकचरा व्यवस्थापन योजनेत आखण्यात आलेल्या विविध योजनांसाठी मालमत्ता करात तीन टक्क्य़ांपासून पाच टक्क्य़ांची सवलत असून जे गृहसंकुले इतर संकुलांतील कचऱ्यावर प्रक्रिया करतील अशा ठिकाणी ७.५ टक्क्य़ांची सवलत लागू करण्यात आली आहे. या सर्व योजना एकत्रित राबविणाऱ्या गृहसंकुलांची संख्या महापालिका हद्दीत कमी असली या एकत्रित सवलतींचे प्रमाण मालमत्ता कराच्या ३२.५ टक्के इतके होत आहे. तसेच काही सवलती संपूर्ण मालमत्ता करावर लागू करण्यात आल्या आहेत.

ही बाब विचारात घेता मालमत्ता कर विभागाने या सवलतींना आवर घालण्याचा निर्णय घेतला असून यापुढे संपूर्ण मालमत्ता कराऐवजी सामान्य करात सवलत देय राहील असा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. तसेच एखाद्या गृहसंकुलाने महापालिकेच्या सर्व योजनांची अंमलबजावणी केली तरी मालमत्ता करातील सामान्य करात कमाल १० टक्के इतकीच सवलत लागू राहील, असे ठरविण्यात आले आहे. तसेच महापालिकेच्या ‘डीजी ठाणे’ या महत्त्वाकांक्षी योजनेच्या माध्यमातून मालमत्ता कर भरणाऱ्या करदात्यांना सामान्य करात दोन टक्के सवलत द्यावी, असा प्रस्ताव आहे. याशिवाय पर्यावरण, वृक्षारोपण योजनेत सक्रिय सहभाग घेणाऱ्या गृहनिर्माण संस्था तसेच सदनिकाधारकांना वैयक्तिक मालमत्ता करात सवलत देण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे महापालिकेतील सूत्रांनी सांगितले. या सवलती सामान्य करापेक्षा १० टक्क्य़ांपेक्षा अधिक असणार नाही, असेही प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे. यासंबंधीचा एकत्रित प्रस्ताव येत्या सर्वसाधारण सभेपुढे मांडण्यात आला आहे.