बदलापुरात होणाऱ्या निवडणुकीत अनेक उमेदवार नवनव्या संकल्पना लढवत आपले नशीब आजमावत आहेत. अशीच एक वेगळी संकल्पना राबवत येथील प्रभाग क्र १२ मध्ये एक अपक्ष महिला उमेदवार ‘जनकल्याण ऋणसंकलन’ या लोकवर्गणीतून निवडणूक लढविण्याच्या संकल्पनेवर मतांचा जोगवा मतदारांकडे मागत आहेत.
कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू आहे. त्यानिमित्ताने उमेदवार पाटर्य़ा आणि अन्य ‘अर्थपूर्ण मार्गाचा’ वापर करत मतदारांवर प्रभाव पाडत आहेत. या परिस्थितीत अपक्ष महिला उमेदवार मंगला रायजाधव या मतदारांच्या घरोघरी जाऊन निवडणुकीसाठी वर्गणी गोळा करत आहेत. मतदारांकडून एक रुपयाचे ऋण मागून त्याची परतफेड जनहिताची कामे करून देईन, याची ग्वाही त्या देत आहेत. निवडणुकांमध्ये धनदांडग्या उमेदवारांकडून पैशाचा वापर होत असतो. मतदारांना पैशाचे अमिष दाखवले जाते. या अमिषाला भुलून मतदार उमेदवार निवडतात. परंतु निवडणुकीनंतर मतदाराला सन्मान मिळत नाही. या आजच्या वास्तवाबद्दल रायजाधव यांनी राबविलेल्या संकल्पनेची चर्चा सध्या शहरात होत आहे.

व्यंगचित्रे व ताळेबंद..
रायजाधव यांनी त्यांच्या पत्रकात उमेदवाराकडून पैसे घेतानाच्या व्यंगचित्रांचा परिणामकारक वापर केला आहे. निवडणुकीपूर्वी पैसे घ्या, मत द्या’ असे व्यंगचित्र तर उमेदवार निवडणुकीनंतर ‘मी काय फुकट निवडून आलो आहे का? चल उठ’ असे मतदाराला सुनावताना दिसत आहे, तर पुढे लोकवर्गणीतून निवडणूक लढविणाऱ्याचे व्यंगचित्र देण्यात आले आहे. पत्रकात अशा व्यंगचित्रांचा अनोखा वापर करत असतानाच उमेदवाराकडून निवडणुकीपूर्वी घेतलेल्या पैशांचा ताळेबंद मांडण्यात आला आहे. यात ५०० ते २००० रुपये मताला घेतल्यास पाच वर्षांत दिवसाला काही पैसे ते एक रुपया अशी मताची किंमत होणार असल्याचे त्यांनी मांडले आहे.