भगवान मंडलिक

कल्याण, भिवंडीतील ४५० मुलांच्या शिक्षणापुढे प्रश्नचिन्ह

कल्याण, भिवंडी तालुक्यातील वाडेघर, पिंपळास, कोन आणि खारबाव गावांच्या हद्दीत वीटभट्टीवर काम करणारी ४५० मुले शिक्षण, भोजन आणि आरोग्य सुविधांपासून वंचित आहेत. योजना केवळ कागदावर राहिल्या आहेत, अशी पालकांची तक्रार आहे.

वीटभट्टी परिसरातील जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षक या भागात येतात. मुलांची नावे घेऊन जातात. कधीतरी फेरी मारतात. या मुलांना क्रमिक अभ्यासक्रमाप्रमाणे शिक्षण दिले जात नाही, असे त्यांच्या पालकांचे म्हणणे आहे. वीटभट्टीवरील मुलांचा माती, चिखलाशी जास्त संबंध येतो. त्यामुळे त्यांची नियमित आरोग्य तपासणी होणे आवश्यक आहे, ती होत नाही, अशी खंत कामगारांनी व्यक्त केली.

भिवंडी हद्दीत पिंपळास, खारबाव, कोन येथील वीटभट्टय़ांवर ४१० मुले आहेत. कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील वाडेघर येथे ४० मुले आहेत. कल्याण डोंबिवली महापालिका शिक्षण मंडळाकडून या मुलांना शिक्षण वा भोजन दिले जात नाही.

जिल्हा परिषद शाळांत पुरेसे शिक्षक नाहीत. या मुलांना नियमित शाळेत कोण, कसे घेऊन जाणार असे प्रश्न शिक्षकांकडून उपस्थित केले जातात. वाडेघर येथील पालिका शाळेतील शिक्षक एकदाही या वीटभट्टी मुलांकडे फिरकले नसल्याचे कळते. ही मुले शाळेत आली तर त्यांना शैक्षणिक, भोजन सुविधांचा लाभ देता येईल, असे शिक्षण मंडळ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

नोव्हेंबर ते मे असे दरम्यान मुले वीटभट्टीवर असतात. जून ते ऑक्टोबर दरम्यानमूळ गावी जातात.

संस्थांचे साहाय्य

या मुलांना कल्याणमधील ‘प्रेमसेवा महिला मंडळा’च्या अध्यक्ष स्टेला मोराईस आणि पडघा येथील ‘नाईक फाऊंडेशन’च्या माध्यमातून शिक्षण व भोजन दिले जाते. या मुलांची नियमित आरोग्य तपासणी, त्यांना सण, उत्सव काळात गोड खाऊ, कपडे संस्थांच्या माध्यमातून देण्यात येतात, असे स्टेला मोराईस यांनी सांगितले.

वीटभट्टीवरील मुलांची नोंद स्थानिक शाळेत असते. त्याप्रमाणे मुलांना शालेय साहित्य, शिक्षण आणि माध्यान्ह भोजन नियमित दिले जाते. शाळेतील सर्व मुलांप्रमाणेच वीटभट्टीवरील मुलांच्या प्रगतीचा आढावा घेतला जातो.

– संगीता भागवत, शिक्षणाधिकारी, जि.प. ठाणे</p>

वाडेघर वीटभट्टीवरील मुले नियमित शाळेत आल्याशिवाय त्यांना शैक्षणिक उपक्रम, माध्यान्ह भोजन योजनेचा लाभ देता येणार नाही. मुले शाळेत येत नसल्याने अडचणी येतात. मुलांना माध्यान्ह भोजन देण्याचा प्रस्ताव आला तर त्यासंदर्भात विचार केला जाईल.

– जे. जे. तडवी, प्रशासनाधिकारी, कडोंमपा