कल्याण स्थानकातील घटना; इंद्रायणी एक्स्प्रेसमध्ये चढताना दुर्घटना

एमआयएससी परीक्षेसाठी पुण्याहून मुंबईला आलेल्या तरुणीला रेल्वे अपघातात पाय गमवावा लागला. सायली ढमढेरे अशी तिचे नाव आहे. परीक्षा आटोपून पुण्यात परतण्यासाठी कल्याण स्थानकात इंद्रायणी एक्स्प्रेसमध्ये चढताना हा अपघात झाला. तिच्यावर ठाण्यातील एका रुग्णालयात उपचार सुरू  आहेत.

पुणे जिल्ह्य़ातील जुन्नर येथील इंदापूर गावात सायली ढमढेरे राहते. बीएस्सी पूर्ण केल्यानंतर तिच्या पोलीस खात्यात असलेल्या बहिणीने तिला लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन आयएएस अधिकारी बनण्याचा सल्ला दिला. त्यानुसार सायलीने अभ्यास सुरू केला.

आयोगाची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना सरकारकडून अनुदान प्राप्त होते. त्यासाठी त्यांना स्टेट इन्स्टिटय़ूट फॉर अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह करिअर परीक्षा द्यावी लागते. हीच परीक्षा देण्यासाठी सायलीने रविवारी मुंबई गाठली होतीसायली तिच्या एका मैत्रिणीच्या घरी थांबली होती. गुरुवारी दुपारी ती मैत्रिणीसह पुन्हा पुण्याला जाण्यासाठी कल्याण रेल्वे स्थानकात गाडी पकडण्यासाठी आली. तिने धावत्या गाडीत चढण्याचा प्रयत्न केला; परंतु गाडीत चढताना तिचा हात निसटला आणि ती फलाट व गाडी यांच्यातील मोकळय़ा जागेत पडली. तिच्या दोन्ही पायांना दुखापत झाली. त्यानंतर तिच्या नातेवाईकांनी तिला ठाणे येथील खासगी रुग्णालयात भरती केले. या अपघातात सायली हिला एक पाय गमवावा लागला असून तिच्या दुसऱ्या पायाचीही स्थिती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सायलीचे वडील हे गावी एका शाळेत शिक्षक असून सायलीच्या उपचारासाठी त्यांच्याकडे पुरेसे आर्थिक पाठबळ नाही.