ठाणे : जिल्ह्यात गुरुवारी सकाळी तापमानाचा पारा ३४ अंश डिग्री सेल्सिअस वर होता. कडाकाच्या उन्हामुळे नागरिक हैराण झाले असतानाच, सायंकाळी अचानक ठाणे, डोंबिवली, कल्याण, नवी मुंबई तसेच काही ग्रामीण भागात सोसाट्याचा वारा त्यासह आभाळ भरून आले. त्यानंतर साडेपाच वाजण्याच्या सुमारास पावसाच्या सरी कोसळल्या. उष्णतेमुळे त्रासलेल्या नागरिकांना या वळीवाच्या पावासामुळे काहीसा दिलासा मिळाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे जिल्ह्यात सोमवारी झालेल्या वादळी वाऱ्यांसह जोरदार पावसानंतर दोन दिवस उष्णतेची लाट पाहायला मिळाली. जिल्ह्यातील तापमानाचा पारा वाढला होता. त्यामुळे तापमानात उष्णता जाणवत होती. या उष्णतेमुळे नागरिकांच्या जिवाची काहिली झाली होती. ठाणे शहरात गुरुवारी ३७ अंश डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली होती.

हेही वाचा >>> वीज वाहिन्यांवर झाडे कोसळल्याने कल्याण, डोंबिवलीचा वीज पुरवठा खंडित

गुरुवारी सायंकाळी पावसाच्या हलक्या सरी ठाणे शहरात कोसळण्यास सुरुवात झाली. ठाणे शहरात गुरुवारी १.०२ मिमी पावसाची नोंद ठाणे महापालिका आपत्ती विभागाकडून करण्यात आली आहे. तर, कल्याण -डोंबिवलीमध्येही सायंकाळी ५ वाजल्यापासून सोसाट्याचा वारा आणि ढगाळ वातावरण झाले होते. एक तासानंतर याठिकाणी पाऊस झाला. त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. तर, बदलापूर अंबरनाथ तसेच शहापुरमध्येही पाऊस झाला. तर, नवी मुंबईतही पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या.

ठाकरेंच्या सभे दरम्यान पाऊस

उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची डोंबिवलीतील भागशाळा मैदानात गुरुवारी सायंकाळी ६ वाजता जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी पाच वाजल्यापासून डोंबविलीत सोसाट्याचा वारा आणि ढगाळ वातावरण होते. त्याचवेळी कार्यकर्ते आणि नागरिकांनी सभास्थळी गर्दी केली होती. सभेवेळी अचानक पाऊस कोसळू लागल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. पावसात नागरिक खुर्च्या डोक्यावर घेऊन उभे सभा ऐकत होते.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rain in thane district bring respite from rising temperature zws