ठाणे, कल्याण, बदलापूर : ठाणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी गुरुवारी सायंकाळी सोसाट्याचा वारा आणि विजेच्या कडकडाटासह पहिल्या पावसाच्या सरी बरसण्यास सुरुवात झाली. यामुळे कामावरून घरी परतणाऱ्या नोकरदार वर्गाची तारंबळ उडाली. पूर्व द्रुतगती महामार्गावर कॅडबरी जंक्शन ते तीन हात नाका पर्यंत वाहतूक कोंडी झाली होती. अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्याने गेल्या दोन दिवसांपासून उकड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला.

 ठाणे शहरात गुरुवारी सायंकाळी सोसाट्याचा वारा सुटला होता. काही वेळातच विजेच्या कडकडाटासह पहिल्या पावसाच्या सरी बरसण्यास सुरुवात झाली. नोकरदार वर्ग कामावरून घरी परतण्याच्या वेळेस पाऊस सुरु झाला. त्यामुळे नोकरदार वर्गाची तारंबळ उडाली. पावसात भिजून नये म्हणून काहींनी शहरातील उड्डाणपुलाखालील जागा, रस्त्यालगतच्या शेड याठिकाणी आसरा घेतला. तर, काहीजण आसरा न मिळाल्याने पावसात भिजले.

 कल्याण-डोंबिवली शहराच्या अनेक भागातील वीज पुरवठा बंद झाला. अचानक पाऊस आल्याने घरी परतणाऱ्या नोकरदारांची फिरेवाले, विक्रेत्यांची दाणादाण उडाली. पाऊस सुरू असल्याने नोकरदारांनी कल्याण-डोंबिवली रेल्वे स्थानकात थांबणे पसंत केले होते. स्थानकांमध्ये गर्दी ओसंडून वाहत होती. पाऊस थांबल्यानंतर ही वीज पुरवठा सुरळीत झाला नव्हता. त्यामुळे रहिवाशांमध्ये अस्वस्थता पसरली होती.

 अंबरनाथ, बदलापूर शहरात दुपारनंतर आकाशात काळे ढग यांची गर्दी जमू लागली होती. सायंकाळी सहानंतर एकाएकी आकाश काळे झाले. त्यानंतर सातच्या सुमारास रिमझिम पावसाला सुरुवात झाली. काही वेळातच विजांच्या कडकडाटासह पाऊस पडू लागला. बदलापूर, अंबरनाथ आणि उल्हासनगर शहरात एकाच वेळी पावसाला सुरुवात झाली. पावसाची चाहूल लागताच महावितरणकडून वीज पुरवठा बंद करण्यात आला. खबरदारी म्हणून हा वीज पुरवठा बंद करण्यात आल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली. शहरांप्रमाणेच अंबरनाथ, कल्याण आणि मुरबाड तालुक्याच्या ग्रामीण भागातही विजांच्या कडकडाटासह पाऊस पडला. शहरी भागात अचानक आलेल्या पावसामुळे घरी परतणार चाकरमान्यांची एकच धावपळ झाली. गेल्या काही दिवसांपासून हुलकावणी देणाऱ्या पावसाने गुरुवारी सायंकाळी हजेरी लावल्यानंतर तापमानात मोठी घट दिसून आली. त्यामुळे समाधान व्यक्त केले जात होते. पावसामुळे पूर्व द्रुतगती महामार्गावरील ठाण्याच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या मार्गिकेवर कॅडबरी जंक्शन ते तीन हात नाकापर्यंत वाहतूक कोंडी झाली होती. पाच मिनीटांचे अंतर पार करण्यासाठी चालकांना २० ते २५ मिनीटे लागत होती. त्यामुळे रात्री मुंबईहून घरी परतणाऱ्यांचे हाल झाले.