राजीव गांधी वैद्यकीय सहायता योजनेसारख्या योजना मागील सरकारच्या काळात सुरू झाल्या असून त्यांची मुदत अद्याप संपलेली नाही. त्यामुळे अशा योजना पुढे कायम सुरू ठेवण्यासाठी त्यांना मुदतवाढ देण्यात येणार आहे. शिवाय वेगवेगळ्या आजारांवरील उपचाराची चांगली सोय मिळावी, यासाठी नव्या योजनांची तयारी करणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दिपक सावंत यांनी ठाण्यात दिली. ठाण्यातील घोडबंदर रोड येथे सुरू करण्यात आलेल्या पटनी हेल्थ केअरच्या क्युरे गायनेक, आयव्हीएफ व प्रसूती रूग्णालयाच्या उदघाटनप्रसंगी आरोग्यमंत्री सावंत ठाण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे, आमदार संजय केळकर, पटनी हेल्थ केअरचे संचालक अपूर्व पटनी उपस्थित होते.
ठाण्यात आलेले आरोग्यमंत्री डॉ. दिपक सावंत यांनी उपस्थितांशी संवाद साधला. सरोगसी संदर्भात सर्वाची मते घेऊन नवीन कायदा आणण्याच्या प्रस्तावावर सरकार गांभीर्याने विचार करीत असल्याचे सांगितले. सार्वजनिक ठिकाणी तंबाखू बंदी कायद्याची अंमलबजावणी अजून कठोरपणे कशी होऊ शकेल यासाठी अभ्यास सुरू असल्याचे त्यानी सांगितले. ग्रामीण भागात आरोग्याच्या चांगल्या सोयी उपलब्ध होण्यासाठी खाजगी कंपन्यांनी, संस्थांनी पुढे येण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. ठाणे येथील सिव्हील रूग्णालयात नवजात अर्भकांवरील उपचारासाठी पटनी हेल्थकेअर सारख्या संस्थांनी एनएसयुजे विभाग (नवजात अर्भकांवरील उपचारांसाठी वेगळा कक्ष) उभारावा तसेच त्याची देखभालही क्युरेकडील तज्ज्ञ डॉक्टरांनी करावे असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी यावेळी केले. त्याला पटनी हेल्थकेअरच्या वतीने सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला. ठाण्याची वाढती लोकसंख्या लक्षात घेता केवळ महिलांसाठी एका दर्जेदार रूग्णालयाची गरज होती.
ज्यामध्ये एकाच छताखाली अनेक आजारांवर उपचार करता येऊ शकतील, ती गरज क्युरे गायनेक, आयव्हीएफ व प्रसूती रूग्णालयातून पूर्ण होत आहे. घोडबंदर पट्टा हा नवीन ठाणे म्हणून ओळखला जातो. त्या ठिकाणी अशा प्रकारचे रूग्णालय सुरू झाले ही चांगली बाब असल्याचे मत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. या रूग्णालयात २४ तास उपलब्ध रक्तपेढी, नवजात शिशूंसाठी आधुनिक एनआयसीयू, कॅन्सर पूर्व तपासणी आदींची सोय या रूग्णालयात असेल. पटनी समुहाने सुरू केलेले हे देशातील हे दुसरे आधुनिक रूग्णालय आहे.