शहापूर तालुक्यातील माळ आणि विहिगाव या डोंगराळ भागात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वणवे पेटण्याच्या घटना घडत असून त्यामध्ये दुर्मीळ वनौषधी नष्ट होत आहे. गेल्या काही दिवसांतील वणव्यांमध्ये माळपठार, आटाळा, मोरवगण, खोकरतळा, महामार्गाजवळील भाग येथील जवळपास २०० हेक्टर क्षेत्र जळून खाक झाले आहे. डोंगराळ भागांमध्ये विविध प्रकारच्या आढळून येणाऱ्या वनौषधीमुळे पर्यावरणाचे संवर्धन होऊन नैसर्गिक समतोल राखला जातो. या भागातील डोंगरावर वणवे पेटण्याचे प्रकार दरवर्षी होत असून अलीकडच्या दिवसांत रोजच या डोंगरांवर वणवे पेटत आहेत. मध्यरात्री किंवा दुपारच्या सुमारास हे वणवे पेटत आहेत. डोंगराळ भागातील जंगलात बहावा, सोनचाफा, आघाडी, अर्जुन, गुळवेल, कडुनिंब, कोकम, तिसल (शिकेकाई), शेंबार्डी, करवंद, मोह, आवळा, बोर, भोकर, बिबवा, निवडुंग, कोरफड, अडुळसा, कुडा, उंबर, खैर, बांबू, चिंच, पिंपळ यांसारखी अनेक वनौषधी वणव्यांमध्ये जळून जात आहेत.