भारतात प्रथमच दिसल्याचा पक्षीतज्ज्ञांचा दावा; पक्षीशास्त्राच्या दृष्टीने महत्त्वाची नोंद

उत्तम समुद्रकिनारा आणि निसर्गरम्य वातावरण लाभलेल्या वसई-विरार पट्टय़ात हिवाळ्यामध्ये अनेक स्थलांतरित पक्षी येतात. यंदा चक्क लाल छातीचा मर्गेसर (red breasted marganse) या पक्ष्याचे दर्शन पक्षिप्रेमींना झाले आहे. सहसा हा पक्षी भारतात आढळत नसल्याने पक्षीतज्ज्ञांनी आनंद व्यक्त केला आहे. भारतात हा पक्षी सर्वप्रथम आढळला असल्याचा दावा करून पक्षीशास्त्राच्या दृष्टीने ही अत्यंत महत्त्वाची नोंद असल्याचे पक्षी अभ्यासकांनी सांगितले.

वसई पूर्वेला राजीवली गावानजीक पावसाळी पाण्याची तळी तयार झाली आहेत. त्यामुळे तिथे अनेक प्रकारचे पाणपक्षी दिसून येतात. हिवाळ्यात स्थलांतर करणारे पक्षीही या भागात आवर्जून भेट देतात. त्यामुळे अनेक पक्षिमित्र, अभ्यासक येथे येऊन पक्षिनिरीक्षण, सर्वेक्षण करीत असतात. पालघर जिल्ह्यातील नेस्ट संस्थेचे सदस्य डॉ. रजनीश घाडी व डॉ. मंगेश प्रभुलकर यांनी नुकतीच या भागास भेट दिली. पक्षिनिरीक्षण करताना त्यांना ‘लाल छातीचा मर्गेसर’ या पक्ष्याचे दर्शन झाले. सुरुवातीला हा मोठय़ा टिबुकलीसारखा पक्षी असल्याचे त्यांना वाटले. त्यांनी तो नेस्टच्या ग्रुपवर ओळख पटण्यासाठी टाकला असता पक्षी अभ्यासक व नेस्टचे अध्यक्ष सचिन मेन यांनी हा लाल छातीच्या मर्गेसरची मादी असल्याचे सांगितले. भारतात यापूर्वी हा पक्षी कधीच दिसल्याची नोंद नसल्याने भारतीय पक्षिशास्त्राच्या दृष्टीने महत्त्वाची नोंद असल्याचे त्यांनी सांगितले.  नेस्ट संस्थेचे सदस्य डॉ. विनोद वर्मा यांना ९ डिसेंबरला सर्वप्रथम या पक्ष्याचे दर्शन घडले; परंतु त्या वेळेस हा नेमका लाल छातीचा मर्गेसर आहे हे त्यांच्या लक्षात आले नाही. त्यामुळे अनवधानाने त्यांनी या पक्ष्याकडे दुर्लक्ष केले. मात्र त्याचे छायाचित्र प्रसारित झाल्यानंतर हा लाल छातीचा मर्गेसर असल्याचे समजले.

पक्ष्याची वैशिष्टय़े

*  लाल छातीचा मर्गेसर याचे शास्त्रीय नाव ‘मर्गस सिरॅटर’ आहे.

*  मूळचा टुंड्रा प्रदेश, उत्तर अमेरिका, ग्रीनलँड येथे हा पक्षी नेहमी आढळतो. तो हिवाळ्यात स्थलांतर करून मुख्यत: पाकिस्तानच्या किनारी भागात तसेच मोठय़ा नद्या व तळ्यांच्या ठिकाणी येतो.

*  मासे, छोटे जलीय जीव, बेडूक हे त्यांचे मुख्य खाद्य.

*  सर्वाधिक वेगाने उडणारे बदक म्हणून त्यास ओळखले जाते.

*  लांब तांबूस चोच, करडा वर्ण, तांबूस मान व आकाराने साधारणपणे पाणकावळ्या एवढा ही शारीरिक वैशिष्टय़े.

लाल छातीच्या मर्गेसर पक्ष्याची मादी एकटीच उदरभरण करताना येथे आढळून आली. भारतात हा पक्षी प्रथमच दिसल्याने पक्षिप्रेमींना आनंद झाला आहे. या पक्ष्याच्या शोधार्थ जाणाऱ्या पक्षीमित्र आणि छायाचित्रकारांनी या पक्ष्याला कोणतीही बाधा पोहोचवू नये.

– सचिन मेन, पक्षी अभ्यासक, नेस्ट संस्था.