अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे वाटचाल करण्यासाठी ग्रंथांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळेच ज्याच्याकडे पुस्तकांचा संग्रह जास्त त्या व्यक्तींकडे समृद्ध ज्ञान असे सर्वसाधारण समीकरण असते. कारण  विविध प्रकारच्या पुस्तकांच्या वाचनाने व्यक्ती ज्ञानाने आणि विचाराने मोठी होत असते. पूर्वीच्या काळी लेखणीचा, पुस्तकांचा शोध लागण्याआधी संत अभंग, ओव्या, भारुडाच्या माध्यमातून जनमानसापर्यंत अध्यात्माचा संदेश पोहोचवीत असत. मनोरंजनाच्या माध्यमातून लोकांपर्यंत प्रबोधनाचा आणि खऱ्या धर्माचा अर्थ संतांनी पोहोचविला. कित्येक शतके मौखिक परंपरेने हे वाङ्मय पिढय़ान्पिढय़ा जतन केले. पुढे कालांतराने संतांनी रचलेल्या या ओव्या, भजने कागदावर उतरवली जाऊ लागली. धर्माचा अर्थ पुस्तकांच्या माध्यमातून लोकांना सांगितला जाऊ लागला. पूर्वीचे अनेक धार्मिक ग्रंथ, पुराणे यांचा आताही अभ्यासासाठी उपयोग होत असतो. प्रत्येक ग्रंथालयात धार्मिक पुस्तकांचा एक विभाग असतो. त्यात कमी-अधिक प्रमाणात धार्मिक आणि आध्यात्मिक विषयाची पुस्तके असतात. मात्र या विभागाला मर्यादा असतात. सर्वच धार्मिक पुस्तके या त्यात नसतात. त्यामुळेच काही ठिकाणी खास धार्मिक विषयांच्या पुस्तकांचा संग्रह असलेल्या विशेष ग्रंथालयांची स्थापना झाली. डोंबिवली शहरातील श्री स्वामी समर्थ धार्मिक ग्रंथालय हे त्यापैकीच एक. सद्गुरू भालचंद्र दत्तात्रय लिमये यांनी २० ऑक्टोबर १९८८ रोजी स्वत:कडील ५०० पुस्तकांच्या संग्रहाने ग्रंथालयाची स्थापना केली. सुरुवातीला आफळेराम मंदिर येथे मंदिराच्या आवारातच त्यांनी पुस्तके मांडली आणि तेथून ग्रंथप्रसाराला सुरुवात झाली.
१९९० मध्ये श्री स्वामी समर्थ सेवा मंडळाने रामदर्शन सोसायटी येथे ४५० चौरस फुटांच्या जागेत हे ग्रंथालय स्थलांतरित केले. सुरुवातीच्या काळात ५०० पुस्तक संख्या असलेल्या या ग्रंथालयात आता १३ हजार  ५०० एवढी अमूल्य ग्रंथसंपदा आहे. केवळ धार्मिक पुस्तकांचा साठा करणे हेच या ग्रंथालयाचे वैशिष्टय़ नसून इतर ठिकाणी सहसा उपलब्ध न होणारे, परंतु वाचकांच्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे असलेले अनेक गं्रथ या गं्रथालयाने आपल्या संग्रहात ठेवले आहेत. अध्यात्माची आवड असणाऱ्या वाचकांसाठी या ग्रंथालयात पुस्तकांचा दुर्मिळ खजिना उपलब्ध आहे. तसेच अध्यात्म विषयासंबंधित अनेक संदर्भग्रंथ नांदिवली येथील मठात ठेवण्यात आले आहेत. प्रौढांसाठीच हे ग्रंथ उपयोगाचे नसून लहान मुलांना वाचनाची गोडी निर्माण व्हावी, लहान मुलांमध्येही अध्यात्म किंवा धार्मिक विषयांबद्दल माहिती कळावी यासाठी ग्रंथालयात स्वतंत्र बाल विभाग आहे. ज्यात रामायण, महाभारत यासोबत काही विनोदी पुस्तके, राजकारण अशा विषयासंबंधीचा संग्रह आहे. ज्योतिष, वैद्यकीय, ऐतिहासिक या विषयांची पुस्तके, ब्रह्मपुराण, मत्स्यपुराण, स्कंदपुराण, लिंगपुराण, गरुडपुराण अशी १८ पुराणे तसेच वेदसंग्रह, दत्त संप्रदाय, वारकरी संप्रदाय असे विभाग ग्रंथालयात आहेत.
१९९३ मध्ये या ग्रंथालयास शासनाची मान्यता मिळाली. शासनाच्या नियमाप्रमाणे दरवर्षी या ग्रंथालयात ५० हजार रुपयांच्या नवीन पुस्तकांची खरेदी होत असते. काही वाचक मंडळी त्यांच्याजवळील पुस्तके, दुर्मिळ ग्रंथ नीट जतन व्हावेत या हेतूने ग्रंथालयास भेट देतात.  धार्मिक विषयांना वाहिलेली नियतकालिके, मासिकेही ग्रंथालयात उपलब्ध आहेत. ग्रंथालयाच्या वाचकांसोबत दरवर्षी वर्धापन दिन साजरा केला जातो. १२ ऑगस्ट रोजी ग्रंथालयाचे जनक रंगनाथन यांची जयंती बालवाचकांसोबत साजरी करतात. या दिवशी पुस्तकांबद्दल माहिती दिली जाते. लहान मुलांकडून काही कथा, कविता सादर केल्या जातात. तसेच मराठी दिन दरवर्षी वेगवेगळ्या पद्धतीने साजरा होतो. गेल्या वर्षी मराठी भाषेचा इतिहास, सद्य:स्थिती यावर चर्चा करून या दिवशी मराठी भाषेचा आढावा घेण्यात आला. शिवाय ग्रंथालयातील पुस्तके वाचून त्यावर वाचकांचे मत, वाचकांना संबंधित पुस्तकातून काय समजले याबाबत चर्चात्मक कार्यक्रम घेतला जातो.
दुर्मिळ कात्रणांचा संग्रह
ग्रंथालयात अनेक जुन्या कात्रणांचा संग्रह केलेला आहे. ज्या कात्रणांचा उपयोग आज संबंधित विषयाच्या अभ्यासासाठी होत असतो, यात काही आयुर्वेदासंबंधित कात्रणे संग्रही ठेवण्यात आली आहेत. अनेक औषधी वनस्पतींची सचित्र माहिती संग्रहात आहे. काही वृत्तपत्रांत आलेले लेख त्या दिवसापुरते मर्यादित असतात, पण या ग्रंथालयाने अनेक वर्षांपूर्वीचे हे लेख आपल्याकडे जतन करून ठेवले आहेत. जुने दिवाळी अंक बाइंडिंग करून ग्रंथालयात ठेवले आहेत.
ग्रंथालयाचे वैशिष्टय़ म्हणजे
धार्मिक आणि अध्यात्म या विषयांकडे अभ्यास म्हणून पाहणारा तरुण वर्ग मोठय़ा प्रमाणात ग्रंथालयाचा सभासद आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दा. कृ. सोमण, यशवंत पाठक, शंकर अभ्यंकर, वामनराव देशपांडे यांसारखी मान्यवर मंडळी ग्रंथालयास भेट देऊन गेली आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Religious books valued stocks
First published on: 02-09-2015 at 03:07 IST